प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

पार्गिटेरच्या संशोधनाचा निष्कर्ष.- या सर्वाचा सारांश असा.- कलियुगांतील राजघराण्यांचा इतिहास प्रथम भविष्यपुराणामध्यें ग्रंथित झाला. मग मत्स्य, वायु व ब्रह्माण्ड यांनीं तो इतिहास त्या पुराणांतून घेतला. कौरव-पांडवांमधील महायुद्धानंतर उत्तरहिंदुस्थानांत जीं घराणीं झालीं, त्यांचा इतिहास श्लोकबद्ध प्राकृतांत होता; व भाट, चारण इत्यादि लोक तो म्हणत असत. हिंदुस्थानामध्यें लेखनकला ख्रि. पू. ७०० च्या सुमारास उदय पावली, व हा इतिहास नंतर लेखनिविष्ट केला गेला. हा इतिहास बहुतेक मगधामध्येंच लिहिला गेला. आणि ज्या प्राकृतमध्यें तो लिहिला गेला, ती प्राकृत बहुधा मागधी किंवा पाली असली पाहिजे. भविष्यामध्यें भविष्यात् गोष्टींचा इतिहास सांगावयाचा असल्यामुळें प्राकृतचें संस्कृतमध्यें भाषांतर करतांना भविष्यरूपच मुख्यत्वें वापरलें आहे.

प्रथम इतिहास लिहिला गेला तेव्हां कौरवपांडवांच्या महायुद्धानंतरच्या कालापासून आंध्रांच्या विनाशकाळापर्यंतचा इतिहास रचला गेला, व तोच भविष्यामध्यें तिस-या शतकाच्या मध्याला घेतला गेला. ही गोष्ट इ. स. २६० च्या पूर्वींच झाली असली पाहिजे असें मानावयास चांगला आधार आहे. तो इतिहास मूळ खरोष्टीमध्यें लिहिलेला होता, व तिस-या शतकाच्या चरमपादांत मत्स्यानें तो भविष्यांतून घेतला. भविष्यपुराणांतील इतिहासाची तपासणी इ. स. ३१५ व ३२० या काळाच्या दरम्यान झाली व तोच भविष्याचा पाठ इ-वायुमध्ये घेतला गेला. इ. स. ३२५ व ३३० याच्या दरम्यान भविष्याचीं पुन्हां तपासणी झाली, व ही सुधारलेली हकीकत वायु, ब्रह्माण्ड वगैरेंनीं घेतली. विष्णुपुराणानें तो इतिहास घेऊन त्याचें (शेवटचा भाग खेरीज करून) संस्कृत गद्यामध्यें थोडक्यांत रूपांतर केलें. भगवतानेंहि इतिहासाचा तसाच उपयोग करून नवीन संस्कृत श्लोकांमध्यें त्याचें संक्षिप्त रूपांतर केलें. गरुडामध्यें फक्त राजांची नांवनिशी दिली आहे. यानंतर या सर्व पुराणांमध्यें हळूहळू थोडीथोडी सुधारणा होत चालली; परंतु भविष्याच्या मूळ पाठामध्यें मात्र बरेच फेरफार घडून आलेलें आहेत (उ. वेंकटेश्वर प्रत पहा). त्यांत १९ व्या शतकापर्यंतचें भविष्य अंतर्भूत केलें गेलें आहे!