प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

पुराणांचा अर्थ कसा लावावयाचा - पुराणांतील या राजघराण्यांच्या इतिहासाचा अर्थ लावतांना हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, तो प्रथम प्राकृतमध्यें लिहिलेला होता. ही एक गोष्ट लक्षांत बाळगली म्हणजे ब-याचशा अडचणी दूर होतात. संख्यादर्शक शब्दांचा अर्थ करतांना ही गोष्ट विशेषेंकरून लक्षांत ठेविली पाहिजे. उदाहरणार्थ, लिहिणाराच्या निष्काळजीपणामुळें विंशाच्या जागीं त्रिश किंवा अब्दाच्या जागीं अष्ट अशा चुका होऊन निरनिराळे पाठसमूह होण्याचा संभव असतो. पुष्कळदां नांवामध्यें फरक पडतो. अशा वेळीं अत्यंत विश्वसनीय अशा हस्तलिखितामध्यें जें नांव आढळते तेंच घेतलें पाहिजे. आंकडे ओळखण्यामध्येंहि कित्येकदां बरीच अडचण पडते. उदाहरणार्थ १८ शक राजे 'शतानि त्राण्यशीतिंच' वर्षें राज्य करतील असें म्हटलेलें आहे. ही रचना संस्कृत आहे असें मानलें असतां, शक राजे इ. स. ७८ पासून राज्य करूं लागले असल्यामुळें पुराणांतील हकीकत इ. स. (७८+३८०=) ४५८ पर्यंत आणली गेली आहे असें होतें. परंतु वस्तुस्थिति तशी असती तर त्यांत त्याच वेळीं राज्य करीत असलेल्या ब्राह्मण संस्कृतीच्या पुरस्कर्त्या गुप्त राजांचा उल्लेख आल्याशिवाय राहिला नसता. शिवाय पुराणांच्या काळासंबंधानें जे मागे विवेचन केलें आहे त्यावरूनहि इ. स. ३३० नंतरच्या काळाचा त्यांत उल्लेख येणें असंभवनीय दिसतें. अर्थात् उपर्युक्त लिखित उता-याचा अर्थ संस्कृतप्रमाणें ३८० न करतां प्राकृतप्रमाणें १८३ असाच केला पाहिजे.