प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
कथनाची त-हा.- या पुराणांत ही जी घराण्यांची माहिती दिली आहे ती भविष्यकथनरूपानें सांगितलेली आहे. परंतु ही वंशावळीची हकीकत सुरुवात करण्याची त-हा, व वंशावळीचा आरंभपुरुष (म्हणजे कोणत्या राजापासून वंश मोजावयाचा हा प्रश्न) यासंबंधीं मात्र या पुराणांमध्यें बराच फरक दिसून येतो. उदाहरणार्थ, विष्णुपुराण पाराशर मैत्रेयाला सांगतो आहे व त्यांतील वंशावळ अभिमन्यूच्या मुलापासून सुरू केली आहे. बाकीचीं पुराणें नैमिषारण्यांत सूतानें ॠषींनां कथन केली आहेत असें म्हटलें आहे. मत्स्य व वायु हीं अधिसो [सां] मकृष्णापासून सुरुवात करतात, भागवतांत परीक्षितापासून सुरुवात आहे व गरुडांत जनमेजयापासून आहे. त्यामुळें शब्दांचीं 'भविष्यरूपें' सर्व ठिकाणीं उपयोजिलेलीं नाहींत व 'अभवत्' 'स्मृत' असे शब्द कांहीं कांहीं ठिकाणीं आढळतात.
मुख्य महत्त्व मगधालाच दिलेले दिसतें. कारण मगधाचें बार्हद्रथ घराणें बरेंच विस्तरशः म्हणजे राजे व त्यांच्या कारकीर्दीचीं वर्षें सांगून दिलें आहे.
डॉ० फ्लीटनें कृष्णाच्या मृत्युदिवसापासून कलियुग सुरू झालें असें दाखविलें आहे. परंतु वरील पुराणांत कलियुगांतील राजे म्हणजे महायुद्धानंतरच्या कालांतील राजे असा अर्थ धरला आहे, आणि असाच अर्थ घेणें सोईस्कर आहे.