प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
अजातशत्रु आणि साम्राज्याची स्थापना.- अजातशत्रु हा ह्या घराण्यांतील एक प्रख्यात राजा झाला. काशी येथेंहि एक अजातशत्रु होऊन गेला. ह्या वेळीं काशी हें एक हिंदुस्थानांतील फार भरभराटींत असलेलें राज्य होतें. येथील त्या वेळचा अजातशत्रु आणि त्याच्या नंतर कित्येक पिढ्यांनीं झालेला मगध देशाचा अजातशत्रु हे अगदी निरनिराळे होत. पण हे दोघेहि काशीचे राजे होते. ह्यावरून असें वाटतें कीं, शैशुनाग घराण्यांतील राजांनीं काशीच्या गादीवर असलेल्या आपल्या पूर्वजांचीं कांहीं नांवें ठेवलीं. अजातशत्रूच्या पुत्राला भद्रसेन अजातशत्रु असें नांव आहे; व त्यालाच वायुपुराणांत श्रेण्य भद्रसेन असें दुसरें नांव आहे.
अजातशत्रु हा पूर्वींच्या बुद्धांचा आणि जैन पंथाचा अनुयायी होता. त्याचप्रमाणें त्याची राणी मल्लिका ही देखील बुद्धपंथाची अनुयायी होती. त्यानें गयासिसा येथें देवदत्ताकरितां एक मोठा दिवाणखाना बांधिला.
बहुतेक त्याची पहिली लढाई त्याचा मामा कोशलचा पसेनदि (प्रसेनजित्) ह्याच्याशीं झाली. दुसरी लढाई वैशाली येथील राजाशी झाली. नंतर त्यानें आपल्या आज्याचें राज्य घेण्याकरितां पाटलिग्राम येथें तटबंदी केली.