प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
या काळांतील उत्तर हिंदुस्थानांतलीं चार मोठीं राज्यें.- वर जीं चार राज्यें सांगितलीं, ती राज्यें (१) मगध, (२) कोसल, (३) वत्स किंवा वंश आणि (४) अवंती हीं होत. मगध राज्याची राजधानी प्रथम राजगृह ही होती; व नंतर येथून ती पाटलिपुत्र येथें नेण्यांत आली. पाटलि नांवाची एक वेश्या होती तिच्या मुलाकडून या नगराची स्थापना झाली अशी कथा कथासरित्सागरानें दिली आहे. येथें या सुमारास शिशुनागाचा वंशज बिंबिसार नांवाचा राजा राज्य करीत होता, व त्याच्या मागून त्याचा पुत्र अजातशत्रु हा गादीवर आला. दुसरें कोसल राज्य; हें मगधाच्या वायव्य दिशेस असून, त्याची राजधानी सावत्ती म्हणजे श्रावस्ती ही होती. येथें पसेनदि उर्फ प्रसेनजित् नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या मागून त्याचा मुलगा विदूदभ हा गादीवर बसला. तिसरें वंशराज्य; तें कोसलाच्या दक्षिणेस होतें. येथील राजधानी कौशांबी ही असून ती यमुनेच्या तीरावर वसलेली होती. येथें परंतपाचा मुलगा उद्देन उर्फ उदयन हा राज्य करीत असे. याच्याहि पलीकडे दक्षिणेच्या बाजूस अवंतीचें चौथें राज्य होतें. त्याची राजधानी उज्जयिनी असून तेथें पज्जोत म्हणजे प्रद्योत नांवाचा राजा राज्य करीत होता. अय्यर काशी हें आणखी एक निराळें राज्य धरतो.