प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

इतिहासदर्शक पाठ कसा काढला.- मत्स्य, वायु व ब्रह्माण्ड हीं पुराणें एकाच भविष्यपुराणापासून घेतलीं असल्यामुळें त्यांच्या निरनिराळ्या पाठांमध्यें वस्तुतः फारशी तफावत नाहीं. पार्गिटेर साहेबांनीं बरोबर म्हणून जो पाठ पुढें मांडला आहे, तो निरनिराळीं हस्तलिखितें व छापील प्रती यांवरून घेतलेला असून निरनिराळे पाठ होते तेथें त्यांपैकीं जास्त संभवनीय असेच पाठ स्वीकारिले आहेत. पाठशुद्धीसाठीं विष्णु, भागवत व गरुड वगैरे पुराणांचा शक्य तितका उपयोग करून घेतलेला आहे. लिहिण्यामध्यें झालेल्या किंवा संधि वगैरेमध्यें झालेल्या क्षुल्लक चुका एक शुद्ध तरी केल्या आहेत, किंवा त्या अजीबात गाळून तरी टाकिल्या आहेत. कारण, असल्या क्षुल्लक चुकांचा पुराणांत बराच सुकाळ आहे.