प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
नारद पंचरात्रसंहितेंतील ज्ञानामृतसार - ही संहिता एशिआटिक सोसायटी ऑफ बंगालनें प्रसिद्ध केलेली असून बाल-देव कृष्णाच्या लीलांचें वर्णन सदर संहितेंत आहे. कृष्णाचा मोठेपणा व त्याच्या उपासनेचा मार्ग समजावून घेण्याची नारदास इच्छा झाली असतां, 'शंकराकडे जा म्हणजे ते तुम्हास सांगतील' असें त्यांस सांगण्यांत आलें. त्यावरून नारदांनीं कैलास पव्रतावर शंकाराच्या सप्तद्वारांनीं युक्त अशा राजवाड्यांत प्रवेश केला. या सात दारांशीं, गोपीवस्त्रहरण, कालियामर्दन, गोवर्धन पर्वतास तळहातावर उचलून धरणें, वगैरे कृष्णाच्या गोकुळांतील लीलांच्या तसबिरी व कोरून काढलेलीं चित्रें होतीं. जोधपुराजवळील मंदोड या गांवीं जमीन उकरतांना एक स्तंभ सांपडला आहे. त्यावर वरीलपैकीं कांहीं गोष्टींचीं खोदून काढलेलीं चित्रें आहेत [आर्किआलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, वार्षिक अहवाल १९०५-६, पृ. १३५]. सदर स्तंभ इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या आधींचा नसावा असें ठरविण्यांत आलें आहे. शंकराच्या राजवाड्याच्या दारावर अशीं चित्रें असावींत ही कल्पना दारावर किंवा खांबावर चित्रें काढण्याची चाल प्रचारांत आल्यावरच निघाली असली पाहिजे; व यावरून ज्ञानामृतसार ही संहिता चौथ्या शतकाच्या पूर्वीची तरी खास नसावी असें प्रतिपादण्यांत येतें. ती या काळाच्या बरीच नंतरची आहे हें खालील विवेचनावरून समजून येईल.
या संहितेप्रमाणें गोलोक हा कृष्ण ज्यांत वास करतो असा स्वर्ग असून कृष्णाचे भक्त या स्वर्गाप्रत जातात. या संहितेंत पुष्कळ मंत्र दिले असून ते म्हणणारास वरील गोलोकांत स्थान मिळते. या ग्रंथाप्रमाणें पाहतां भक्तीच्या द्वारें हरीची सेवा करणें किंवा त्याचा दास होऊन राहणें हीच परम मुक्ति होय. श्रीहरीची उपासना करण्याचे सहा मार्ग यांत सांगितले आहेत. (१) स्मरण, (२) कीर्तन, (३) वन्दन, (४) पादसेवन. (५) भक्तियुक्त सतत पूजनअर्चन व (६) आत्मनिवेदन हे ते मार्ग होत. भागवत पुराणांत श्रवण, सेवा व सख्य ह्या तिहींची आणखी भर घातली आहे. कृष्णाच्या आवडत्या स्त्रियांत राधा ही सर्वांत श्रेष्ठ होय, व परमात्म्यानें पुरुष व प्रकृति असें जें आपलें द्विधा स्वरूप केलें त्यापैकीं प्रकृति ही राधा होय, असें या संहितेंत म्हटलें आहे. स्त्रियांचा दर्जा वाढविणें हें या संहितेचें एक प्रधान अंग दिसतें. पांचरात्र धर्मांतील व्यूहांचा उल्लेख या संहितेंत नाहीं. वल्लभाचार्यांनीं ज्या मताचा प्रसार केला तें मत अगदीं या संहितेतील मताप्रमाणेंच आहे. तेव्हां ही संहिता वल्लभाचार्यांच्या कांहीं काळ आधीं म्हणजे सोळाव्या शतकाच्या सुमारास लिहिली गेली असावी. रामानुजपंथी लोक ही संहिता मुळींच प्रमाण म्हणून समजत नाहींत.