प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

गोपालकृष्णाचे उल्लेख व त्यांची वृष्णिकुलोत्पन्न वासुदेवाच्या हकीकतीशीं विसंगतता - आतांपर्यंत ज्या ज्या ग्रंथांचे आधार घेतले त्या ग्रंथांत गोपालकृष्णाचा कोठेंहि उल्लेख केलेला आढळत नाहीं. मागें सांगितलेले शिलालेख, पतंजलीचें महाभाष्य किंवा नारायणीय आख्यान यांपैकीं कशावरूनहि गोपालकृष्ण असा एखादा देव असल्याचें दिसून येत नाहीं. नारायणीय आख्यानांत कंसवधार्थ वासुदेवानें अवतार घेतला असें सांगितलें आहे; पण गोकुलांत गोपालकृष्णानें जे दैत्य मारले त्यांच्या निःपाताकरितां अवतार घेतला असें कोठेंहि म्हटलेले नाहीं. हरिवंश (५८७६-७८), वायुपुराण अ. ९८ (१००-१०२) व भागवतपुराण (२.७) या सर्वांमध्यें कंसाचा वध करण्याकरितां व गोकुलांतीलहि दैत्यांचा निःपात करण्याकरितां कृष्णावतार झाला असें म्हटलें आहे. दोन स्थळांमधील हा फरक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. गोपालकृष्णाच्या कथा सर्वांच्या तोंडी झाल्यावर, व वासुदेवकृष्ण व गोपालकृष्ण यांचे एकीकरण झाल्यावरच सदर ग्रंथ लिहिले गेले असले पाहिजेत. वृष्णिकुलोत्पन्न राजपुत्र वासुदेव गोकुळांत लहानाचा मोठा झाला ही गोष्ट महाभारतांत त्याच्या पुढील आयुष्यक्रमाचें वर्णन आलें आहे त्याशीं विसंगत आहे. गोकुळांत ज्या त-हेनें कृष्णाचें बाल्य गेलें, त्या त-हेनेंच तें जावयास पाहिजे असें समजण्याची अवश्यकता महाभारताच्या कोणत्याहि भागावरून दिसून येत नाहीं.

सभापर्व अ. ४१ मध्यें शिशुपालानें कृष्णावर अपशब्दांचा भडिमार करीत असतांना त्याच्या पूतनावधादि गोकुळांतील कृत्यांचा उल्लेख केला आहे, व भीष्मानें अशा कृत्यांबद्दल त्याची वाखावणणीच केली आहे असें त्यानें म्हटलें आहे. पण अ. ३८ मध्यें भीष्मानें कृष्णाची स्तुति केली आहे त्यांत सदर कृत्यांबद्दल अवाक्षरहि नाहीं. तेव्हां वरील ठिकाणचा भाग प्रक्षिप्त असावा.