प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
कृष्ण हें नांव कसें पडलें - कृष्ण हें वैदिक काळच्या एका ॠषीचें (ॠग्वेदाच्या आठव्या मण्डलांतील ७४ व्या सूक्ताच्या कत्याचें) नांव होतें. या सूक्ताच्या ३ -या व ४ थ्या ॠचांत या ॠषीनें कृष्ण या नांवानें आपला उल्लेख केला आहे. 'अनुक्रमणी'' च्या कर्त्यानें त्यास आंगिरस म्हणजे अंगिरसाचा वंशज असें म्हटलें आहे. व ब्राह्मणाच्छंसीनें तृतीय सवनाच्या वेळीं म्हणावयाचा पर्यास कृष्णआंगिरसदृष्ट आहे असा कौ. ब्रा. ३०.९ मध्यें उल्लेख केला आहे. पाणिनि अष्टाध्यायी ४. १, ९६ या सूत्रास जोडलेल्या एका गणांत ''कृष्ण'' हा शब्द आढळतो; व ४. १, ९९ या सूत्रास जोडलेल्या गणांत ''कृष्ण'' व ''रण'' यांवरून ''कार्ष्णायन'' व ''राणायन'' अशी गोत्रांची नांवे पडलीं असें म्हटलें आहे. हीं ब्राह्मणें गोत्रें वासिष्ठ गोत्राच्या सदरांतच येतात. जातकावरील टीकाकारानें पहिल्या (कार्ष्णायन) गोत्राचा उल्लेखे केला आहे हें वर सांगितलेंच आहे. ब्राह्मणगोत्र सा संकुचित अर्थ मात्र त्यानें घेतलेला दिसत नाही. छांदोग्योपनिषदांत कृष्णाचा उल्लेख देवकीचा पुत्र या नात्याने आला आहे (३.१७). कृष्ण हा घोर आंगिरसाचा शिष्य होता. कृष्ण हा जर आंगिरस असेल (असें असणें असंभवनीय नाहीं), तर कृष्ण हा एक ॠषि होता असा ॠग्वेदकालापासून छांदोग्योपनिषदाच्या काळापर्यंत समज चालत आला होता असें अनुमान काढावें लागतें. त्याचप्रमाणें मूळ प्रस्थापक ज्याला कृष्ण आहे असें एक कार्ष्णायन गोत्र (कुल) होतें असें समजलें पाहिजे. यावरूनच वासुदेवास जेव्हां सर्व देशांत श्रेष्ठ पद दिलं गेलें, तेव्हां हा कृष्ण ॠषि व वासुदेव हे दोन्ही एकच अशी कल्पना निघाली असावी. ज्याप्रमाणें परीक्षिताचा मुलगा जनमेजय (ऐत. ब्राह्मणांत हें नांव आढळतें) याचें नांव महाभारत ज्या व्यक्तीस सांगितले त्या व्यक्तीस दिलें गेलें व अर्जुनापासून त्याच्यापर्यंत वंशावळहि जोडण्यांत आली, त्याप्रमाणेंच याहि बाबतींत होणें शक्य आहे; म्हणजे वासुदेव व कृष्ण ॠषि हे दोन्ही एक करून वृष्णिकुलांत शूर व वसुदेव यांच्यापासून त्याच्यापर्यंत वंशावळ जोडली गेली. वासुदेवास कृष्ण नांव मिळण्याचें सर्वांत समाधानकारक उत्तर कदाचित् असें देतां येईल कीं, कृष्ण हें गोत्राचें नांव (अगर आडनांव) असावें. जातकाच्या खुद्द कर्त्याचें व त्याच्या टीकाकारांचेंहि मत असेंच आहे; व वासिष्ठ गोत्राच्या सदरांत कार्ष्णायन (म्हणजेच काण्हायन) ब्राह्मण गोत्र येतें हें वर दाखविलेंच आहे. मत्स्यपुराण, अध्याय २०० मध्यें तर वरील सदराच्या पाराशर शाखेंत तें पडतें असें सांगितलें आहे. हें जरी पाराशरशाखेंतील ब्राह्मण गोत्र होतें, तरी तें यज्ञयागादि कर्मे करण्याकरितां क्षत्रियांसहि धारण करतां येत होतें. कारण, क्षत्रियांच्या गोत्रास पूर्वजांस जें आवाहन केलें आहे तें त्यांच्या ॠत्विजांच्या गोत्रांच्या व पूर्वजांच्या नांवानें केलें आहे असें आश्वलायनावरून दिसतें (श्रौ. सू. १२.१५). सर्व क्षत्रियांचे ॠषि- पूर्वज फक्त मानव, ऐल व पौरुरवस् हेच होत. यांच्या नांवांवरून कोणत्याहि दोन क्षत्रिय कुलांतील भेद पूर्णपणें व्यक्त होत नसल्यामुळें हा भेद नीट ध्यानांत यावा म्हणून क्षत्रियांनीं आपल्या ॠत्विजाचें गोत्र व पूर्वज घेतले असावेत. तेव्हां कार्ष्णायन हे ब्राह्मण व पाराशर शाखेंतील गोत्र असलें, तरी वासुदेव हा कार्ष्णायन गोत्राचा व्हावा व म्हणून त्यास कृष्ण म्हणावें या गोष्टी शक्य दिसतात. हें नांव एकदां पडल्यावर प्राचीन कृष्ण ॠषीची विद्वत्ता व अंतर्ज्ञान, व देवकीच्या मुलाचें नांव कृष्ण या दोहोंची सांगड घातली गेली. सभापर्वाच्या ३८ व्या अध्यायांत भीष्माचार्य म्हणतात कीं, कृष्णाला सर्वांत श्रेष्ठ मान देण्याचें कारण तो वेद व वेदांगें जाणतो, व शिवाय तो ॠत्विजाहि आहे. कोणीतरी एक देव मुख्य कल्पून इतर देव त्याचींच रूपें किंवा अवतार होत अशी जी हिंदूंची कल्पना करण्याची चाल आहे, तीस धरूनच वासुदेव, इतर बाकीचे देव गोकुळांतील कृष्ण हे सर्व एकच अशी कल्पना झाली असावी. याविषयीं आणखी विवेचन पुढें करण्यांत येईल.
भागवत किंवा पांचरात्र धर्माविषयीं बरीचशी माहिती नारायणीय आख्यानांत दिली आहे. हा धर्म ज्या काळीं भरभराटींत होता त्या काळाविषयींहि पुढचें विचार करूं. येथें प्रथम हरिगीतेंत सांगितलेला, वासुदेवानें स्थापलेला एकान्तिक धर्म व रणभूमीवर अर्जुनास बोधिला गेलेला धर्म (म्हणजेच भगवद्गीता) हे एकच आहेत या विधानाचा विचार करूं.