प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
उपनिषदांत भक्तीच्या भावनेचें मूळ - यावरून, बौद्धसंप्रदाय उदयाला येण्यापूर्वी जी धार्मिक व तत्त्वज्ञानविषयक वाढ झाली तिचा निष्कर्ष भगवद्गीता ही होय असे दिसून येईल. परंतु भगवद्गीतेचें प्रमुख लक्षण किंवा वैशिष्ट्य जी भक्तीची किंवा ईश्वराबद्दलच्या प्रेमाची कल्पना तिचा मूळ उगम कशांत आहे याविषयीं अर्वाचीन काळीं बरीच भवति न भवति चालू आहे. तेव्हां आतां त्या मुद्दयाकडे वळूं. मन, सूर्य, चन्द्र किंवा पुरुष, अन्न, प्राण या सर्वांस ब्रह्म कल्पून त्याची उपासना उपनिषदांत सांगितली आहे. याप्रमाणें एकाग्र चित्तानें एखाद्या वस्तूचे ध्यान केल्यास ती वस्तु मोठी व तेजस्वी दिसून तिजविषयी आदर व भक्ति उत्पन्न झाल्याशिवाय रहात नाहीं. बृहदारण्यकोपनिषदांत पुत्र, संपत्ति किंवा इतर कोणतीहि वस्तु या सर्वांहून आत्मा अधिक प्रिय आहे असें म्हटलें आहे. या ठिकाणीं 'आत्मन्' चा अर्थ कदाचित् स्वतःचा आत्मा असाहि घेतां येईल. सदर उपनिषदांत दुस-या एका ठिकाणीं (४.४, २२), परब्रह्माचें ध्यान व सहवास यांच्यापुढें सर्व ऐहिक वस्तू ज्ञानी लोक तुच्छ मानतात अशा अर्थाचा श्लोक आहे. तेव्हां यावरून, वरील ठिकाणीं भक्ति हा शब्द आला नसला, तरी तत्कालीन लोकांस ईश्वराविषयीं प्रेम (भक्ति) वाटत होतें असें म्हणावयास हरकत नाहीं; व परमात्मा जगांत सर्वत्र व मनुष्याच्या अंतर्यामींहि वास करतो हे जाणल्यावर जी शांति प्राप्त होते तिच्याविषयीं जे परमानंदाचे उद्गार त्या ज्ञात्या लोकांनीं काढले आहेत त्यांच्या मुळांशीं भक्तीसारखीच एखादी वृत्ति असली पाहिजे. ॠग्वेदकाळच्या कवींच्या किंवा ॠषींच्या अंतःकरणांत देवांविषयीं प्रेमाची भावना निरंतर असे हें ॠग्वेद १.१६४, ३३; ८९, १० या ठिकाणच्या शब्दांवरून किंवा इतर प्रार्थनांवरून दिसून येतें. ॠग्वेदानंतरच्या यज्ञयागादि कर्मांच्या काळांत वरील प्रार्थनांतील खरा अर्थ नाहींसा होऊन त्यांस नुसत्या तोंडानें बडबडल्या जाणा-या मंत्रांचें स्वरूप प्राप्त झालें, व त्यामुळें वरील प्रार्थना अगर सूक्तें रचणा-यांच्या मनांत जी भावना होती तिला कांहीं काळपर्यंत वाव मिळाला नाहीं. पुढें उपनिषत्कालीं मात्र ती भावना कौतुक व आदर यांनीं युक्त होत्साती पुन्हां दृग्गोचर झाली असावी. निदान एवढें तरी खास म्हणतां येईल कीं, उपनिषत्कालीं ती भावना मुळींच नव्हती असें नाहीं. जीवात्मा व परमात्मा हे दोघे मित्र समजून त्यांवर केलेले दोन पक्ष्यांचे रूपक (द्वा सुपर्णा सयुजा सखाया । १.१६४.२०) ॠकसंहितेंत आलें आहे, व त्याचीच मुंडकोपनिषदांत (७.१,१) पुनरुक्ति झाली आहे.
मुंडकोपनिषदांत (३.२, ३) व कठोपनिषदांत (२.२३) म्हटलें आहे.
''नायमात्मा प्रवचनेन लभ्यो व मेधया न बहुना श्रुतेन ।
यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् ॥''
कौषीतकिब्राह्मणोपनिषदांत (३.८)
''एष प्राण एनं साधुकर्म कारयति तं यमन्वानुनेपति ।''
म्हणजे सर्व प्राणिमात्रांच्या अंतर्यामीं ईश्वर वास करतो व सर्वाचें नियंत्रण करतो हें तत्त्व आले आहे; व हीच गोष्ट विस्तारपूर्वक बृहदारण्यकोपनिषद् ३.७ यांत अधिक स्पष्ट केला आहे. यावरून हें उघड दिसतें कीं, जीवात्मा परमात्म्यावर अवलंबून असून परमात्मा त्यास मुक्ति देतो हें तत्त्व उपनिषत्कालीं मान्य झालें होतें.