प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

आभीरांचें आगमन व कृष्णासंबंधीं दंतकथा - आभीरांच्या वंशजांस सध्यां अहीर म्हणतात, व सध्यां ते सोनार, सुतार, गुराखी, उपाध्याय वगैरे धंदेवाले बनले आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागांत एके काळीं त्यांचें राज्य होतें. आभीर शिवदणत्ताचा मुलगा ईश्वरसेना याच्या कारकीर्दीच्या ९ व्या वर्षाचा एक शिलालेख नाशिक येथें सांपडला आहे. हा शिलालेख इसवी सनाच्या तिस-या शतकाच्या समाप्‍तीच्या काळांतील असावा असें दिसतें. आभीर नांवाचा एक राजवंश असून त्यांत दहा राजे होऊन गेले असा पुराणांत उल्लेख आहे (वायुपुराण, खण्ड २ रें अ. ३७). याच्या पूर्वींच्या काळचा एक शिलालेख काठेवाडांत गुंडा येथें सांपडला आहे. त्यांत रुद्रमूर्ति नांवाच्या एका आभीर सेनापतीच्या दानधर्माचा उल्लेख आहे. शके १०२ म्ह. इ. स. १८० च्या सुमारास रुद्रसिंह नांवाचा क्षत्रप राजा राज्य करीत होता त्याच्या वेळचा सदर शिलालेख आहे. दुस-या शतकाच्या शेवटीं शेवटीं व तिस-या शतकात आभीर लोकांच्या हातांत बरीच राजकीय सत्ता होती, यावरून ते पहिल्या शतकांत या देशांत आले असावेत; व त्यांनीं बालदेव कृष्णाची पूजा आणि त्याच्या जन्माची कथा आपल्याबरोबर आणल्या असाव्यात. कृष्णाच्या जन्मकथेंत नन्द हा कृष्णाचा बाप नव्हता व कंसानें देवकीचीं मुलें मारलीं याबद्दलच्याच गोष्टी आहेत. गर्दभरूप धारण केलेल्या धेनुक दैत्याच्या वधाची गोष्ट व तिच्या सारख्याच कृष्णाच्या बाल्यांतील दुस-या कांहीं गोष्टी आभीरांनीं आपल्याबरोबर आणल्या व कांहीं ते हिंदुस्थानांत आल्यावर नंतर रचल्या गेल्या. ख्रिस्त हें नांव कदचित् या लोकांनींच आणलें असावें, व यावरूनच पुढें बालदेवाचें व वासुदेव-कृष्णाचें एकीकरण झालें असावें. गोवानीज व बंगाली लोक कृष्ण याचा जवळ जवळ कुस्टो किंवा क्रिस्टो असा उच्चार करतात. तेव्हां आभीरांचा ख्रिस्त व संस्कृत कृष्ण हे दोघे एक मानले जाणें अगदीं संभवनीय दिसतें. कृष्णाची गोपींबरोबर क्रीडा ही नंतरची कल्पना असावी. कारण वासुदेव धर्मीतील परिणतावस्थेंतल्या नीतिमत्तेशीं ती अगदींच विसंगत वाटते. सदर क्रीडेची कल्पना या भटकणा-या रानटी आभीर टोळ्या व चांगले सुसंस्कृत आर्य लोक यांच्यांत अगदीं निर्वेध रीतीनें दळणवळण चालू असे त्यामुळें निघाली असावी. आभीरासारख्या त्या काळच्या जातींत कडक नीतिबंधनें असणें शक्य नाहीं. या बाबतींतील शिथिलत्वाचा आसपासच्या आर्य लोकांनीं फायदा घेतलेला दिसतो. आभीर स्त्रियाहि स्वरूपवान् व देखण्या असाव्यात हें सध्यांच्या अहीर गवळ्यांच्या बायका सौंदर्यवान् असतात यावरून स्पष्ट दिसतें.