प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

उपनिषत्कालीन नवीन विचरनाच्या लाटेंत वासुदेवसंप्रदायाचा उगम - सारांश, हा वासुदेवधर्म पाणिनीच्या काळापर्यंत जाऊन भिडतो. उपनिषत्कालीं क्षत्रियहि धार्मिक विषयावर विचार करीत, व कांहीं कांहीं बाबतींत प्रथमतः त्यांसच नवीन ज्ञान प्राप्त झालें होतें. अशी विचारांची खळबळ चालली असतांना, सिद्धार्थ व महावीर या दोघांनीं पूर्वेकडील प्रांतांत म्हणजे मगध देशांत नवीन संप्रदायांची स्थापना केली. ईश्वराचें अस्तित्व त्यांस संमत नव्हतें म्हणा किंवा या बाबतींत ते मुग्ध होते म्हणा, ईश्वर आहे असें त्यांनीं कधींहि म्हटलें नाहीं. मोक्षसाधनास इंद्रियनिग्रह व शुद्ध आचार आवश्यक आहे असें मात्र त्यांनीं प्रतिपादन केले होतें. हे दोघे संप्रदायसंस्थापक क्षत्रिय वंशापैकीं शाक्य व ज्ञातृक वंशांतील होते; म्हणून बोद्ध व जैन पंथ हे त्या त्या वंशाचे धर्म असें म्हणतां येईल. पश्चिमेकडील प्रांतीं मात्र मूळावरच घाव न बसतां पूर्वपरंपरेस धरून असलेला असा एक धर्म सात्वत लोकांनीं स्थापला; परमश्रेष्ठ देवाचें अस्तित्व, व त्याची भक्ति केली तर मोक्ष मिळतो ही कल्पना, या दोन तत्त्वांचा त्यांनीं पुरस्कार केला. चंद्रगुप्ताच्या दरबारीं असलेला मॅसिडोनियाचा वकील मेगॅस्थिनीझ यानें या सात्वतांचा व वासुदेव-कृष्णाच्या उपासनेचा निर्देश केला आहे. ख्रि. पू. चवथ्या शतकाच्या शेवटच्या पादांत चंद्रगुप्त राज्य करीत होता. मिगॅस्थिनीझनें शूरसेन क्षत्रियकुल, मथुरा, यमुना, वासुदेव-कृष्ण या सर्वांचा उल्लेख केला आहे. तेव्हां मौर्याच्या वेळीं वासुदेव-कृष्णाची उपासना किंवा भक्ति जर पूर्ण भरांत होती तर तिचा उदय मौर्य वंशाच्या बराच आधीं झाला असला पाहिजे. यावरून उपनिषत्कालीं जी विचाराची लाट उसळली तिच्यांतच या भक्तिमार्गाचा उगम असला पाहिजे, व त्या लाटेचें पर्यवसान बौद्ध व जैन पंथांस अस्तित्वांत आणण्यांत होऊन त्या पंथांबरोबरच हा वासुदेवधर्महि उदयास आला असावा, या विधानांस बळकटी येते. या धर्मांतील मुख्य देवतेस प्रथम वासुदेव हें एकटेंच नांव होतें. ''निद्देस'' या पाली पुस्तकांत व वरील तीन शिलालेखांत हेंच नांव आढळतें.