प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

उपरिचर वसु राजाची गोष्ट-  हा राजा सात्वत विधीप्रमाणें भगवन्ताची पूजा करीत असे. तो सत्यवचनी, पवित्राचरणी, कीर्तिवान् असून इन्द्रानेंहि त्याचा सन्मान केला होता; पांचरात्र धर्मांतील अत्यंत विद्वान् माणसांस भोजनसमयीं वरचें पान देऊन तो त्यांचा सन्मान करीत असे. येथें कथेच्या अनुषंगानें या धर्माचे आद्य प्रचारक जे ''चित्रशिखंडी'' लोक त्यांचा उल्लेख आला आहे. या चित्रशिखंडी लोकांनीं प्रथमतः मेरु पर्वतावर आपला धर्म प्रगट केला. ते एकंदर सातजण होतेः मरीचि, अत्रि, अङिगरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु व वसिष्ठ. यांशिवाय आठवा स्वायंभुव हा होता. या आठांपासून या उत्तम व श्रेष्ठ शास्त्राची उत्पत्ति आहे. श्रेष्ठ असा जो भगवान् त्याच्या समक्ष या शास्त्राचें (धर्माचें) प्रणयन त्यांनीं केलें. भगवान् ॠषींस म्हणाले:- ''ॠक, यजुः, साम, अथर्व या चारी वेदांनां धरून, लोकांच्या सर्व व्यवहारांसंबंधीं नियम ज्यांत सांगितले आहेत असे एक लक्ष उत्तम श्लोक मीं रचिले असून आचार, विचार, विश्रांति यासंबंधाचे नियमहि त्यांत मीं ग्रथित केले आहेत. मीं आपल्या सौम्य प्रकृतीपासून ब्रह्मा व उग्र (रौद्र) प्रकृतीपासून रुद्र असे दोघेजण निर्माण केले. एकाकडून दुस-यास याप्रमाणें वंशपरंपरा हें शास्त्र बृहस्पतीपर्यंत चालेल. बृहस्पतीपासून राजा वसूस तें प्राप्त होईल. हा राजा या शास्त्राप्रमाणें वागून माझा भक्त बनेल. त्याच्या निधनानंतर हें शास्त्र नाहीसें होईल.'' याप्रमाणें सांगून भगवान् अंतर्धान पावले. नंतर चित्रशिखंडींनीं या शास्त्राचा प्रसार केला. शेवटीं तें बृहस्पतीस प्राप्त झालें. पुढें पहिलें कल्प संपून नवीन कल्पास आरंभ झाला. अंगिरसाच्या मुलाचा (देवगुरूचा) जन्म झाल्यामुळें सर्व देवांस आनंद झाला. राजा उपरिचर वसु हा त्याचा पहिला शिष्य होय. बृहस्पतीजवळून तो हें शास्त्र प्रथम शिकला. एके काळीं त्यानें मोठा अश्वमेध यज्ञ केला; पण त्या समयीं कोणत्याहि प्राण्याचा त्यानें वध न करवितां आरण्यकांच्या नियमाप्रमाणें अहुती दिल्या. तेव्हां देवाधिदेवानें फक्त एकट्या वसूसच दर्शन देऊन हवनाचा स्वीकार केला. बृहस्पतीस दर्शन दिल्याखेरीज हरीनें हवनाचा स्वीकार केला त्यामुळें बृहस्पतीस राग आला, व त्यानें यज्ञाची देवी हवेंत वर फेंकली.

या यज्ञसमयीं प्रजापतीचे मुलगे एकत, द्वित, त्रित व मेधातिथि, तित्तिरि, ताण्ड्य वगैरे १६ ॠषी हजर होते. बृहस्पतीस राग आला त्या वेळीं, ''श्रीहरि उगीच वाटेल त्याला दर्शन देणार नाहीं, ज्यावर त्याचा कृपाप्रसाद झाला असेल त्यालाच फक्त तो दर्शन देईल'' असें ते सर्वजण म्हणाले. एकत, द्वित, त्रित म्हणाले:-

''श्वाश्वत सुख किंवा मोक्ष साधण्यासाठीं उत्तरेकडे क्षीरसागरीं आम्हीं गेलों व त्या ठिकाणीं चार हजार वर्षें तपश्चर्या केली. तेव्हां शेवटीं आकाशवाणी झालीः 'परमेश्वर तुम्हांस कसा दिसेल ? क्षीरसागरीं श्वेतद्वीप आहे तेथें चन्द्राप्रमाणें कांति असलेले, निरिंद्रिय, निराहारी, असे माझे भक्त आहेत. ते एकान्ती असून सर्वदा सूर्याप्रमाणें तेजःपुंज अशा ईश्वराचें ध्यान करण्यांत मग्न झालेले आहेत. त्या द्वीपाप्रत तुम्ही जा, तेथें माझा आत्मा प्रकाशत आहे.'

''याप्रमाणें आकाशवाणी झाल्यावरून आम्हीं त्या श्वेतद्वीपास गेलों. पण त्या दिव्य तेजानें दिपून गेल्यामुळें आम्हांस भगवन्ताचें दर्शन झालें नाहीं. तेव्हां स्वतः तपश्चर्या केल्याशिवाय ईश्वराचें दर्शन होणार नाहीं असा आम्हांस अंतःप्रकाश झाला. आणखी शंभर वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ईश्वराच्या ध्यानांत निमग्न झालेले असे चन्द्रकांती लोक आम्हांस दिसले. त्यांपैकीं प्रत्येकाचें प्रळयकालच्या सूर्याप्रमाणें तेज होतें. नंतर 'जितं ते पुंडरीकाक्ष' इत्यादि शब्द आम्हांस ऐकुं आले; व नंतर थोड्या वेळानें आकाशवाणी झाली, 'जे त्याचे भक्त नाहींत त्यांस परमेश्वर दिसणार नाहीं.' तेव्हां त्याचें दर्शन न होतांच आम्ही परतलों. तेव्हां तुम्हास (बृहस्पतीस) त्याचें दर्शन कसें होणार ?''

याप्रमाणें एकत, द्वित, त्रित यांचें म्हणजें बृहस्पतीनें ऐकल्यावर यज्ञ पुरा केला.

ॠषींच्या शापामुळें उपरिचर वसूला भुयारांत रहावें लागत असे. याचें कारण असें : एकदां ॠषींचें व देवाचें भांडण लागलें. यज्ञाच्या वेळीं पशुवध न करतां फक्त धान्य अर्पण करावें असें ॠषी म्हणाले; पण देव म्हणाले कीं, मेषवध केला पाहिजे. तेव्हां भांडण मिटविण्याकरितां दोघे उपरिचर वसूकडे गेले. त्यानें देवांतर्फे निकाल दिला. त्यामुळें त्यास ॠषींनीं शाप दिला. पण पुढें उपरिचर वसूच्या भक्तीनें संतुष्ट होऊन नारायणानें आपल्या गरुडाकडून त्यास भुयारांतून काढवून ब्रह्मलोकीं नेलें.

नारदमुनि श्वेतद्वीपास गेले, त्यांच्या सफरीची हकीकत यानंतर पुढें सांगितली आहे. नारदांनीं गौरवपर व शुद्ध सात्विक शब्दांनीं भगवन्तांची स्तुति केली. त्यामुळें संतुष्ट होऊन व नारद हे एकान्तिन् असल्यामुळें भगवन्तांनीं नारदांस दर्शन दिलें; व वासुदेव धर्म त्यांस थोडक्यांत समजावून सांगितला. तो येणेंप्रमाणें:-

वासुदेवधर्म - वासुदेव हा परमात्मा असून तो सर्वांच्या अंतर्यामीं वास करतो. तो मुख्य सृष्टिकर्ता आहे. यच्चयावत् प्राणिमात्र म्हणजेच संकर्षण असून संकर्षण हें वासुदेवाचेंच स्वरूप आहे. संकर्षणापासून प्रद्युम्न (मन) झाला व प्रद्युम्नापासून अनिरुद्ध (आत्मज्ञान) याचा संभव झाला. जे मला भजतात ते मत्स्वरूपांत विलीन होतात; व त्यांस मोक्ष मिळतो.

वर सांगितलेलीं चार रूपें ह्या परमेश्वराच्या मूर्ती होत. एका मूर्तीपासून दुसरी मूर्ति उत्पन्न होते असें सांगितलें आहे. तथापि हीं सर्व रूपें त्याच्याच मूर्ती होत असेंहि म्हटलें आहे. सर्व देव व सर्व वस्तू त्यानेंच उत्पन्न केल्या व त्या सर्व अंतीं त्याच्या ठायीं लय पावणार. नंतर त्याचे अवतार सांगितले आहेत. वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, ''कंसवधार्थ जो मथुरेस जन्मास येईल व दानवांचा निःपात करून शेवटीं द्वारकेस वास करील तो'' म्हणजे कृष्ण, हे ते अवतार होत. येणेंप्रमाणें आपल्या चार मूर्तीकडून सर्वांचा निःपात करवून त्यानें सात्वतांसह द्वारका नगरी समुद्रांत बुडविली व ब्रह्मलोकीं प्रयाण केलें.

याप्रमाणें त्या परमश्रेष्ठ नारायणाकडून ही हकीकत ऐकल्यावर नारद बदरिकाश्रमीं परत आले.

पुढील चार अध्यायांत जें वर्णन आलेलें आहे त्याचा पुस्तुत विषयाशीं मुळींच संबंध नाहीं; फक्त एके ठिकाणीं मात्र वासुदेवाचा खालीलप्रमाणें व्यत्पुत्त्यर्थ दिला आहे. सर्व जगास व्यापणारा व सर्व भूतमात्रांचें आश्रयस्थान (अधिवास) असा जो, तो वासुदेव [म. भा. अध्याय ३३९ व पुढील चार अध्याय पहा].

३४४ व्या अध्यायांत निष्पापी लोकांचा मार्ग येणेंप्रमाणें सांगितला आहे:- सूर्य हें द्वार असून तें ओलांडून आंत प्रवेश करतांच सर्व अशुद्धता जळून खाक होते, व अणू बनून ते सूर्यांत राहतात. तेथून सुटका झाल्यावर ते अनिरुद्ध स्वरूपांत शिरतात; पुढें मनःस्वरूप होऊन ते प्रद्युम्न स्वरूपांत जातात; तें सोडून नंतर ते संकर्षण-स्वरूपांत म्हणजे जीवात्म्यांत प्रवेश करतात; आणि शेवटीं त्रिगुणरहित होऊन ते सर्वत्र वास करणारा वासुदेव जो परमात्मा त्याच्या ठिकाणीं विलीन होतात.

याप्रमाणें परमेश्वर जो नारायण त्यानें हा धर्म नारदास सांगितला; व वैशम्पायनानें तो थोडक्यांत हरिगीतेच्या द्वारें जनमेजयास कथन केला. युद्धारंभीं अर्जुनास सांगितलेला धर्म व एकान्तिक धर्म एकच असें अध्याय ३४८ मध्यें सांगितलें आहे. प्रत्येक ब्रह्मयाच्या उत्पत्तीच्या वेळीं हा धर्म नारायण प्रथमतः प्रगट करतो व त्या ब्रह्म्याच्या लयकालीं हा धर्महि लय पावतो. चवथ्या ब्रह्म्याच्या हकीकतींत दोन ठिकाणीं या धर्मास 'सात्वत धर्म' म्हटलें आहे. सातव्या ब्रह्म्याच्या वेळीं ह्या धर्माचा उपदेश प्रथम पितामहास केला गेला, व पितामहानंतर दक्ष, पितामहाचा नातू, आदित्य, विवस्वत् व मनु या क्रमानें तो शेवटीं इक्ष्वाकूपर्यंत चालत आला. पुढें असें म्हटलें आहे का, दुर्बोध व दुष्कर असा हा सनातन व महान् आद्य धर्म फक्त सात्वतच पाळतात.

या धर्मांत अहिंसा तत्त्व सांगितलें आहे. तें योग्य रीतीनें पाळल्यास प्रभु हरि संतुष्ट होतो. कधीं कधीं ईश्वराचा एकच व्यूह (किंवा स्वरूप) समजावून सांगितला आहे; तर कधीं कधीं दोन, तीन, चारहि सांगितले आहेत. येणेंप्रमाणें एकान्तिकधर्म वैशम्पायनानें थोडक्यांत कथन केला आहे.

येथें रा. रा. भागवत यांच्या मताचा उल्लेख करणें अवश्य आहे. त्यांचें मत असें होतें कीं, गोप हे गाईचें पालन करणारे होत; व ब्राह्मण हे गोघातकी म्हणजे यज्ञसंस्थेचे अभिमानी होत. कृष्णाचें राजकीय आणि बौद्धिक महत्त्व स्थापन झाल्यामुळें अहिंसाधर्माचा व गोरक्षणाचा विजय झाला. आणि त्या परंपरेचा प्रचार करणें हा भागवत ग्रंथाचा हेतु होय (विविध ज्ञानविस्तार).