प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

उपनिषदांचें संहितीकरणात्मक स्वरूप - पुढील काळांतील पूजाविषयक व धर्मविषयक विचारांच्या वाढीस वळण लावण्याच्या कामीं उपनिषदांचें बरेंच प्रमुख अंग आहे.

ईश्वर, मनुष्य व जग यांचें स्वरूप काय व त्यांचा एकमेकांशीं संबंध काय याविषयींचीं निरनिराळ्या मतांचीं तत्त्वें उपनिषदांत सांठविलीं आहेत. एकमेकांशीं विसंगत असलेले असे जे अर्वाचीन काळांतील अनेक धर्मविषयक व तत्त्वज्ञानविषयक पंथ आहेत ते आपल्या विशिष्ट मतास आधारभूत असे उतारे उपनिषदांतूनच घेतात. ब-याच ठिकाणीं हे उतारे बरोबर घेतलेले आहेत; पण आपआपल्या मतांची तरफदारी करण्याकरितां आपल्या विशिष्ट तत्त्वांशीं जुळणारा अर्थ विरुद्ध बाजूच्या ग्रंथांतूनहि बळेंच काढण्याचा प्रयत्न झाला आहे तो मात्र उघड उघड चुकीचा आहे. ॠग्वेद संहिता ज्याप्रमाणें निरनिराळ्या व्यक्तींनीं रचिली त्याप्रमाणें उपनिषदेंहि निरनिराळ्या माणसांनीं रचिली आहेत; असें असल्यामुळें उपनिषदांत केवळ एका मताचेंच नव्हे तर अनेक मतांचें प्रतिपादन केलेलें आढळतें. प्राचीन ॠषींच्या विचारांनां शाब्दिक स्वरूप मिळून ते एका पिढीकडून दुसरीस तोंडीं पढविण्यांत आले, व त्यांचा एक मोठा संग्रह तयार झाला. हे सर्व विचार (शाब्दिक स्वरूपांत आल्यावर) संगृहीत करून ठेवण्याची जेव्हां कल्पना सुचली तेव्हां त्या सर्वांचा निरनिराळ्या वैदिक पंथांच्या उपयोगासाठीं वेगवेगळ्या पुस्तकांत समावेश केला गेला; व म्हणूनच एका उपनिषदांत आढळणारे कांहीं श्लोक किंवा उतारे किंवा कधीं कधीं तर सबंध प्रकरणेंचीं प्रकरणें दुस-या उपनिषदांत जशींचीं तशींच उतरलेलीं आढळून येतात.