प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
हखामनी वंशाच्या इराणच्या बादशहांनी अरमइक लिपि प्रथम हिंदुस्थानांत आणली:- वरील विवेचनावरून एवढें सिद्ध झालें होतें कीं, खरोष्ठीची उत्पत्ति अरमइक लिपीपासून अशोकाच्या म्हणजे ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकाच्या अगोदर केव्हां तरी झाली असली पाहिजे. आतां आपल्या पुढें दुसरा असा प्रश्न आहे कीं, खरोष्ठाची उत्पत्ति हिंदुस्थानांत झाली किंवा हिंदुस्थानाबाहेर झाली. तिचा जन्म हिंदुस्थानांत झाला असल्यास तिच्या जननीचा या देशांत प्रवेश कसा झाला व ती हिंदुस्थानाबाहेरच जन्मास आली असली तर तिला येथें कोणी आणिलें इत्यादि प्रश्न उत्पन्न होतात. सेमेटिक लिपीसंबंधी आतांपर्यत जे शोध लागले आहेत त्यांवरुन असें दिसून येतें कीं, असुरिया व बाबिलोन देशांत कीलाकृति लिपीचा प्रसार झाल्यावरहि व्यापाराच्या कामांत अरमइक लिपीचाच उपयोग करण्यांत येत असे [ ज,रॉ.ए.सो;इ.स. १९१५, पा.३४६-४७]. इराणच्या हखामनी उर्फ अकॅमीनियन बादशहांच्या कारर्कीर्दीत इराणच्या राज्याचा विस्तार वाढून दूरदूरच्या देशांवर त्या बादशहांचा अंमल बसला. ख्रिस्तपूर्व आठव्या शतकांत होऊन गेलेल्या हखामन नांवाच्या मूळ पुरूषावरून हे बादशहा आपणांस हवामनी उर्फ अकॅमीनियन म्हणत असत. हखामनचा वंशज कुरूष (साइरस) हा आरंभी इराणांतील अनशान प्रांताचा अधिपति होता. त्या वेळी सर्व इंराण देशावर मीडियाचा राजा अस्त्यगिस (इष्टविगू) याचा पराभव करून इराण व मीडिया हे दोन्हीहि देश ख्रिस्तपूर्व ५५८ च्या सुमारास पादाक्रांत केले. याशिवाय त्यानें लिडिया, मीडियाच्या पश्चिमेकडचा आशियामायनरचा समुद्रकिनार्यावरील प्रदेश खिवास, समरकंद, बुखारा, अफगाणिस्थान व गांधार हे देशहि काबीज करून घेतले. त्याचा मुलगा कंबुजीय (कंबॅसिस) यानें मिसर देश हस्तगत केला. कंबुजीयनंतर त्याचा पुत्र दारा हा सिंहासनारूढ झाल्यावर, त्यानें ग्रीसचे थ्रेस, मॅसिडोन अदितकरून भाग आपल्या अमलाखाली आणले व ख्रि, पू. १५६ नंतर लवकरच पुढें आपल्या राज्याची सीमा हिंदुस्थानांत सिंधु नदीस नेऊन भिडविली, ख्रि, पू. ३३१ सालीं शिकंदराडून गॉगमेलाच्या लढाईत इराणच्या तिसर्या दारा बादशहाचा पराभव होईपर्यत सिंधूच्या पश्चिमेकडील हिंदुस्थानचा भाग इराणच्याच ताब्यांत होता. या बादशहांच्या कारकीर्दीतील अमसइक लिपीचे शिलालेख मिसर [ यांपैकी सक्कारा येथें सांपडलेला शिलालेख ख्रि. पू. ४८२ सालचा आहे (पॅलिऑग्राफिक सोसायटीज ओरिएंटल सीरीज प्लेट६३)], अरवस्थान [ अरबस्थानांत टीमा येथें जे लेख मिळाले आहेत त्यांतील एक ख्रि, पू. ५०० सालचा आहे असें समजलें जातें (ए. ब्रि. आवृत्ति ९ पु.२१, पा. ६४७)], आशिया मायनर, इराण [ इं. अँ; पु. २४, पा.२८७ ] व हिंदुस्थानांत तक्षशिला [ ज.रॉ.ए.सो;इ.स. १९१५, पान ३४० च्या समोरची प्लेट ] येथें सांपडले असून मिसर देशांत त्या लिपींत लिहिलेले अनेक पापायरसहि मिळाले आहेत. आशिया मायनर येथें सांपडलेल्या इराणी क्षत्रपांच्या नाण्यांवरहि [ इं. अँ; पु. २४, पान २८७ ] हीच लिपि दृष्टीस पडते. या सर्व पुराव्यांवरून असें निष्पन्न होतें कीं, हखामनी वंशाच्या इराणच्या बादशहांची राजदरबारची लिपि व भाषा या दोन्हीहि अरमइकच होत्या व त्यांचा हिंदुस्थानाशी फार काळापर्यंत संबंध राहिल्यामुळें अरमइकचा राजकीय लिपि म्हणून त्याच्याच कारकीर्दीत या देशांत प्रवेश झाला असला पाहिजे. व्यापाराच्या निमित्तानें या लिपीचा प्रसार दूरदूरच्या देशांतहि झाला असल्यामुळें [ ज. रॉ. ए. सो; इ. स. १९१५; पा .३४६-४७ ] हिंदुस्थानच्या वायव्य भागांत ती रूढ होणें पुष्कळ संभवनीय आहे.