प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
शुक्लयजुर्वेद संहितेंतील लेखनकलेसंबंधी उल्लेख:- शुक्लयजुर्वेद संहितेंत आपणास अक्षर हा शब्द अनेक ठिकाणी योजलेला आढळतो. एका ठिकाणीं (३३.५९) अग्रं नयत्सुपद्यक्षराणामच्छा रवं प्रथमा जानतीगात् | असें म्हटलें आहे. येथें ‘अक्षराणाम् अकारादानीं रवं शब्दं जानती प्रथमा अच्छ आभिमुख्येन अगात् गच्छति ’ असा अर्थ उवटानें केला आहे. दुसर्या एका ठिकाणी ब्रह्मा उद्रात्यास यज्ञाचीं अक्षरें किती म्हणून विचारतो व उद्राता शतमक्षराणि म्हणून उत्तर देतो (२३.५७-५८). येथे सर्वात लहान छंद गायत्री व मोठा छंद अतिधृति यांचीं अनुक्रमें २४ व ७६ अक्षरें मिळून, किंवा उष्णिक व धृति यांची २८ व ७२ मिळून, किंवा अनुष्टुभ् व अत्यष्टि यांची ३२ व ६८ मिळून, याप्रमाणें १०० अक्षरें होतात म्हणून सांगितलें आहे. दुसर्या एका ठिकाणीं अग्निरेकाक्षरेण, अश्विनौ द्वाक्षरेण, विष्णुस्त्रयक्षरेण, सोमश्चतुरक्षरेण याप्रमाणें प्रजापत्ति: सप्तदशाक्षरेण सप्तदश स्तोममुदजयत्तमुज्जेषमू (९.३१-३४) याप्रमाणें एकपासून सतरा अक्षरांच्या संख्यांचा उपयोग केला आहे. वाजसनेयि संहिता अध्याय १५ मंत्र ४ या ठिकाणीं तर स्प्ष्टपणें ‘अक्षरपङ्रक्तिशछन्द:’ असें म्हटलें आहे. यावरून शुक्लयजुर्वेदमंत्रकारांस अकापादि वर्ण ठाऊक होते; निरनिराळ्या छंदामध्यें किती अक्षरें येतात हें ठाऊक होतें; ७६ अक्षरांचा अतिधृति छंद ठाऊक होता; एवढेंच नव्हे तर छन्द म्हणजे अक्षरंपंक्ति असें त्यांस ठाऊक होतें.यावरून केवळ तोंडी अक्षरें ठाऊक होतीं एवढेंच नव्हे तर ती पंक्तिप्रमाणे दिसतील म्हणजे एका ओळींत मांडलेली आपल्या दृष्टीसमोर येतील अशा तर्हेनें मांडण्याची रीती त्यांस माहीत होती.