प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
शाई:- प्राचीन इजिप्शियन लोकांमध्ये शाई तयार करीत असत. ख्रि. पू. २५०० च्या सुमाराचीं शाईनें लिहिलेली पापायरस पत्रें उपलब्ध झालीं आहेत. चीनमध्यें ख्रि. पू २६९७ च्या सुमारास होऊन गेलेल्या टीनच्यू नांवाच्या राजाच्या कारकीर्दीत प्रथम शाई तयार करण्याची युक्ति निघाली. डिंक, सरस, किंवा वारनीस यांमध्यें मशेरी किंवा लोणारी कोळशाची पूड घालून ही शाई तयार करीत. कटल माशाच्या अंगातून निघणार्या सेपिया नांवाच्या काळ्या रंगाचा रोमन लोक शाईसारखा उपयोग करीत असत. मायफळ किंवा हिरडे व हिराकस यांच्या मिश्रणापासून होणार्या शाईचें ११ व्या शतकांत राहणार्या थिओफायलस नांवाच्या एका साधूनें प्रथमच वर्णन केलें आहे. परंतु हिराकशीच्या पाण्यांत भिजविलेला कागद मायफळाच्या मिश्रणांत बुडविला असतां काळा होतो हा शोध पहिल्याच शतकांत फ्लिनी यास लागला होता. हिराकस व मायफळ यांच्या मिश्रणापासून होणार्या शाईचा फार जलद प्रसार झाला. १६ व्या शतकांत तयार झालेल्या गृहकार्यविषयक ज्ञानकोशांत या जातीच्या शाया तयार करण्याच्या पद्धती दिलेल्या सांपडतात. त्यानंतर १७४८ त बिल्यम लुई नांवाच्या गृहस्थानें या विषयांचे शास्त्रीय संशोधन केलें. आरभीं तयार झालेल्या हिराकशीच्या शायांत पाण्यांत फक्त रंग मिसळलेला सांपडत असे. १९ व्या शतकाच्या प्रारंभी स्टीव्हन्स कंपनीनें निळी शाई प्रथमच तयार केली. हिराकस व हिरड्यांतील किंवा मायफळांतील टानिन द्रव्य, व नीळ, आणि पतंगाचें लांकूड यांच्या मिश्रणानें तयार झालेली शाई आरंभी लिहितांना निळसर दिसते, परंतु सुकल्यावर काळीभोर होते. या विशिष्ट गुणामुळें निळ्याकाळ्या शाईचा प्रसार अतोनात झाला आहे. १८५६ मध्यें लियोन हार्डी नांवाच्या माणसानें रजिस्टर करून घेतलेल्या “ अलिझाईन ” नांवाच्या शाया ह्या वरील जातींच्या शायांप्रमाणेंच असून त्यांत थोडें मंजिष्टाच्या रंगाचें मिश्रण असें. शाई तयार करण्यांत अँनिलीन रंगाचा उपयोग इंग्लंडमध्यें १८६१ त क्राक नांवाच्या मनुष्यास पेटंट मिळालें तेव्हापासून सुरू झाला.