प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
वरील विधानांविषयीं गौरीशंकर ओझा यांचें मत:- जर ब्राह्मी लिपीचें हिअरेटिक, क्युनिफॉर्म, फिनीशियन, हिमिअरिटिक, अरमइक किंवा खरोष्टी यांतील कोणत्याहि एका लिपीशीं खरोखरच कांही साम्य असतें तर या विषयावर इतकी भिन्न भिन्न मतें पडलीच नसतीं. ब्राह्मी लिपीच्या उत्पत्तीसंबंधी विद्वान् मंडळीत एकमत होत नाही यावरुन एवढेंच दिसून येतें की, वरील सर्व कल्पनांत सत्यांशाचा अभाव असून प्रत्येक जण सत्यान्वेषणाचा विचार बाजूस ठेवून केवळ स्वमतप्रतिपादनार्थच आपल्या बुद्धीचा दुरूपयोग करीत असला पाहिजे.