प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
यूरोपमधील लेखनसाहित्य, चामडीं व कागद:- कागदाचा प्रसार होण्यापूर्वी यूरोपमध्यें चामडी साफ करून त्यांवर लेख लिहीत असत. ख्रि० पू ० ५ व्या शतकांत ग्रीक लोकांनी मिसर देंशात बनविलेली पापायरसपत्रें आणवून त्यांचा उपयोग करण्यास सुरूवात केली. नंतर सर्व यूरोपभर त्यांचा प्रसार झाला. पुढें अरबांचा अंमल सुरू झाल्यावर इटली वगैरे देशांत या पापायरस झाडांची लागवड होऊं लागली व त्यांपासून यूरोपमध्येंच पापायरसपत्रें तयार होऊं लागली; तथापि इसवी सनाच्या चवथ्या शतकापासून यूरोपमध्यें मृदुचर्मपत्रांचा उपयोग सुरू झालेला दिसतो; व ती १५ व्या शतकांत छापण्याच्या कलेचा शोध लागेपर्यंत प्रचारांतून गेलीं नाहीत. इ० स ० ७०४ मध्यें अरबांनीं समरकंद शहर जिंकून घेतलें तेव्हां तेथें ते प्रथम कापसापासून अथवा चिंध्यापासून कागद तयार करण्यास शिकले. नंतर दमास्कस शहरीहि कागद तयार होऊं लागले. अरबी भाषेंतील पुस्तकें ९ व्या शतकांत प्रथम असल्या कागदांवर लिहिलीं जाऊं लागली, व १२ व्या शतकाच्या सुमारास अरबांच्या द्वारें यूरोपमध्यें कागदांचा प्रवेश झाला. १३ व्या शतकांत यूरोपांत पापायरसपत्रांचा लिहिण्याच्या कामीं उपयोग अजीबात बंद होऊन त्याऐवजी कागद वापरण्यास सुरूवात झाली.
लांकडी फलक:- ब्रिटनमध्यें रूनिक अक्षरें लिहिण्याकरितां प्रथम लांकडी फलकांचा उपयोग होत असावा असें दिसतें. परंतु ह्यांपैकी एकहि फलक सध्यां उपलब्ध होत नाही. आतांपर्यत उपलब्ध असलेले हस्तलेख, स्मारक शिलांवर, त्याचप्रमाणें तलवारी, टांचण्या, आंकडे वगैरे सारख्या धातुनिर्मित पदार्थांवर कोरलेले आहेत. रूनिक अक्षरें खोदलेली कांही नाणींहि आढळून आलीं आहेत.
लेखण्या:- यूरोपांत मध्ययुगांत किलच्या म्हणजे साळूच्या पिसाच्या लेखण्या करीत असत. त्यापूर्वीं धातूच्या, हाडाच्या किंवा हस्तिदंताच्या लेखण्यांचा प्रचार असून त्यांनी लांकडाच्या फळ्यावर मेण बसवून त्यावर खोदून लिहीत. बोरूच्या वेतसदृश झाडाच्या कांड्यांच्या किंवा बांबूच्या लेखण्या करण्याचीहि वहिवाट दष्टीस पडतें
शाई:- प्राचीन काळी यूरोपांत शाई कशी करीत असत व तींत पुढें सुधारणा कसकशी होत गेली याविषयीं सविस्तर माहिती वर आलीच आहे.