प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.

मिसरदेशीय लिपि:- वर सांगितलेल्या दोन पुरातन लिपींपैकी मिसरदेशीय चित्रलिपि ही लेखनकलेच्या निरनिराळ्या अवस्थांतील चिन्हांचें कडबोळें आहे. ह्या लिपीवरुन लेखनकलेच्या निरनिराळ्या अवस्थांची आपणांस बरीचशी कल्पना करतां येण्यासारखी आहे. ही मिसरदेशीय लिपि अगदी प्राथमिक अवस्थेंतील चित्रलिपीच्या चिन्हांचे अवशेष, एकदम शब्दावयवांकरितां योजलेली ध्वनिसूचक चिन्हें व वर्णमालेंतील खरीखरी अक्षरें या सर्वांची मिळून झाली आहे. यावरुन असें अनुमान निघतें कीं, कालांतरानें मिसरदेशीय लिपींत सुधारणा होऊन नवीन प्रकार प्रचारांत आले, तरीहि तींतील जुन्या गोष्टीचा लोप झाला नाहीं.

मिसरदेशीय कोणताहि प्राचीन लेख पाहिला, तर त्यातं बर्‍याचशा दुर्बोध वांकड्यातिकड्या रेघांमध्यें सिंह, बहिरीससाणा वगैरे प्राण्यांची चित्रें काढलेली दृष्टीस पडतात. चित्रलिपीच्या जन्मावस्थेमध्यें ह्या पशूंची किंवा पक्ष्यांची चित्रे केवळ त्या त्या पशूंची किवा पक्ष्यांची कल्पना व्यक्त करण्याकरितांच काढली जात असलीं पाहिजेत हें उघड आहे. परंतु ह्या पद्धतीनें ज्या कल्पना व्यक्त करतां येतात, त्या फारच थोड्या आहेत. म्हणून कालांतराने एखादा सुपीक डोक्याच्या माणसानें चित्रांच्या योगानें त्या त्या प्राण्यांतील कांही विशिष्ट गुण व्यक्त करण्याची कल्पना काढली असावी. तो गरूड पक्ष्यांचे चित्र केवळ गरूड दर्शविण्याकरितांच काढणार नाही, तर शक्ति, धीटपणा किंवा चपळता दर्शविण्यासाठीहिं त्याच पक्ष्याचें चित्र काढील. ह्या पद्धतींने मनुष्यास साहजिकच पूर्वीपेक्षां अधिक विचार व्यक्त करतां येतील. याप्रमाणें मिसरी लिपीचें विकसन होत असतां, त्या लोकांवर स्वाभाविकपणें जी एक क्रिया व्हावयाची, ती क्रिया म्हटली म्हणजे प्रत्येक पदार्थांवरील विशिष्टत्व शोधणें ही होय. अनेक विचार चित्रलिपींनें व्यक्त करण्यास प्रवृत झालेंलें मन, अर्थात् वस्तूचें विशिष्टत्त्व जास्त ओळखूं लागेल. या मन: स्थितीमुळें मिसरी चित्रकलेवर एक महत्त्वाचा परिणाम घडून आला. तो म्हटला म्हणजे मिसरी चित्रकला गोंडसपणांत इतर ठिकाणच्या चित्रकलांहून जरी कमी असली, तरी अर्थसूचकतेच्या बाबतींत फारच उच्च प्रकारची आहे. व त्यामुळें त्यांची चित्रें जितकीं इतिहाससूचक आहेत तितकी इतर राष्ट्रांची नाहींत. उदाहरणार्थ, थोर घराण्यांतील बाई किंवा राणी ते नेहमीं वृहन् नितंबयुक्त दाखवितात ! तसली चित्रें त्या काळच्या सामाजिक कल्पनांवर फार चांगला प्रकाश पाडतातं पुढें एखाद्या कल्पक माणसामुळें किंवा कित्येक पिढ्यांच्या संघटित प्रयत्‍नानें असा एक आश्चर्यजनक शोध लागला असेल कीं, मनुष्य बोलत असतांना त्याच्या तोंडातून मृदु, कठोर, उच्च, नीच असे निरनिराळ्या प्रकारचे ध्वनी एकामागून एक निघत असतात. त्यांचें जर पृथक्करण केलें, तर त्यांत अगदी स्वतंत्र असे ध्वनी फारच मर्यादित आहेत.  मनुष्याची भाषा केवळ दहापांचशेंच पृथक् ध्वनी मिळून झाली आहे, असें एकदां आढळून आल्यावर मग ह्या निरनिराळ्या ध्वनीकरितां म्हणजे हल्ली ज्यांनां आपण शब्दावयव म्हणूं त्यांकरितां कांही तरी निरनिराळीं चिन्हें वापरण्याची कल्पना सुचण्यास फारसा काळ लागला नसावा. ऐतिहासिक काळाच्या आरंभास आपणांस मिसरदेशीय लिपीमध्यें कल्पनादर्शक व ध्वनिसूचक अशा दोन्हीहि लेखनपद्धतींचा उपयोग केलेला आढळतो. तथापि ध्वनिसूचक लेखनपद्धतीची नुसती कल्पना हि सुचण्याच्या अगोदर, केवळ चित्रांच्याच योगानें कल्पना व्यक्त करण्याची पद्धति मिसरी देशांत कित्येक शतकेंपर्यंत प्रचलित असली पाहिजे हें मात्र विसरतां कामा नये.

मिसरी लोक कल्पनादर्शक चिन्हांचे इतके भोक्ते होते कीं, त्यांच्या इतिहासांत अगदी अखेरपावेतों ते ह्या चिन्हांनां चिकटून राहिलेल आढळतात. ते ध्वनिसूचक चिन्हांचा अनेक वेळां उपयोग करीत असत;  तथापि ते केव्हांहि ह्या चिन्हांवरच केवळ विसंबून राहिले नाहीत. एखाद्या शब्दांतील एकूण एक ध्वनिसूचक अक्षरें लिहूनहि शिवाय तें ती वस्तु दाखविणारें किंवा तिच्याच जातीची दुसरी वस्तु दाखविणारें एखादें, किंवा कधी कधी दोन दोन तीन तीन देखील चित्रें घालीत. उदाहरणार्थ, क्केफ्टेन म्हणजे वानर ह्या शब्दांतील सर्व अक्षरें लिहून शिवाय त्यांच्या जोडीला निर्णायक म्हणून वानराचें चित्र काढलेलें आहे. क्केनु म्हणजे घोडदळ हा शब्द लिहून त्याचा अर्थ संदिग्ध राहूं नये म्हणून घोड्याचेंहि एक चित्र काढलेलें आहे. तेमाति म्हणजे पंख ह्या शब्दाबरोबर पंखाचें चित्र आहे. तातु म्हणजे चतुष्पाद ह्या शब्दाच्या जोडीला एका चतुष्पादाचें व त्यानंतर कातड्याचें चित्र आहे;  व अनेकवचन दर्शविण्यासाठी ह्या चित्रांपुढें आणखी आडव्या तीन रेघा आहेत.

तथापि हीं निर्णायक चित्रें मिसरी लोक केवळ लहरी खातर काढीत होते असें मात्र कोणी समजूं नये. पाच, पांच किंवा नाव, नांव ह्या शब्दापैकीं दुसर्‍या शब्दांमध्यें ज्या कारणासाठी आपण अनुस्वार देतों त्याच कारणासाठी हीं निर्णायक चित्रें घालण्यात येत असत. इंग्रजीमध्यें ‘ टू ’ हा शब्द तीन निरनिराळ्या रीतीनीं लिहिण्यांतहि तोच उद्देश असतो. मिसरी भाषेंत अनेक अर्थी वापरले जाणारे शब्द पदोपदी आढळून येत असल्यामुऴें ती लिहतांना अशा निर्णांयक चित्रांची साहजिकच फार आवश्यकता भासते. चिनी भाषेची देखील तीच स्थिति आहे. त्या भाषेतील शब्द एकावयवी असून तींतील शब्दसूचक निरनिराळ्या ध्वनींची संख्या हजारांहून कमीच आहे. परंतु चिनी लोक एकाच ध्वनीचे निरनिराळे अर्थ दर्शविण्याकरितां त्या ध्वनींच्या चिन्हास निरनिराळ्या खुणा जोडीत असल्यामुळें त्यांच्या लिपींतील अक्षरांची संख्या कित्येक हजार भरते.