प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.  

भरतखंडांतील लेखनकलेची प्राचीनता:- लेखनकलेची उत्पत्ति ब्रह्मदेवापासून झाली अशी आपल्या पूर्वजांची समजूत होती. ‘आन्हिकतत्त्व’ व ‘ज्योतिस्तत्त्व’ यांमध्ये बृहस्पतीचें असे वचन आहे की, ‘पाण्मासिके तु समये भ्रांति; संजायते यत; ! धात्राक्षराणि सृष्टानि पत्रारूढाण्यत; पुरा !!’ नारदस्मृतींतहि एके ठिकाणीं असें म्हटले आहे कीं, ‘नाकरिष्यद्यदि ब्रह्मा लिखितं चक्षुरुत्तमम ! तत्रेयमस्य लोकस्य नाभविष्यच्छुभा गति; !!’ बृहस्पतिरचित मनूच्या वार्तिकांतहि अशाच प्रकारचा उल्लेख आला आहे. (से. बु. ई;{kosh Sacred Books of the East. }*{/kosh} पुस्तक २३, पान ३०४). ह्युएनत्संग नावांचा चिनी प्रवासी इ. स. ६२९ पासून ६४५ पर्यंत हिंदुस्थानात होता. त्याने लिहून ठेवलें आहें की, ‘भरतखंडांतील वर्णमालेची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असून तेव्हापासून ती अजूनपावेतो हिंदुस्थानात चालत आली आहे (बी. बु. रे. वे. व;{kosh Samuel Beal; Buddhist Records of the Western World.}*{/kosh} पुस्तक १, पान ७७). वरील अवतरणांवरून लेखनकलेच्या उत्पत्तीसंबंधी भरतखंडामध्ये प्राचीन समजूत काय होती हे मात्र स्पष्ट होते. लेखनकला किती प्राचीन काळापासून आपल्याकडे अस्तित्वांत आहे याचा या उतार्‍यांनी निर्णय करणें शक्य नाहीं; किंवा त्यांवरून लेखनकलेच्या प्राचीनतेसंबंधी काही अनुमान काढले असतां तेहिं समंजसपणाचे होणार नाही. या प्रश्नाचा निकाल प्राचीन लेखांचे निरीक्षण करून त्यांपासून ऎतिहासिक रीतीने काय निष्कर्ष निघतो तो काढून केला पाहिजे.

भरतखंडांत लेखनकलेची उत्पत्ती केंव्हा झाली या विषयावर पाश्चात्त्य विद्वानांनी आजपर्यंत काय विचार प्रगट केले आहेत ते प्रथमत; पाहून नंतर शिलालेख, भरतखंडात राहून गेलेल्या ग्रीक लेखकांची वर्णनें, वैदिक व बौद्ध ग्रंथांतील वचनें व संस्कृत वाड.मय यांच्या निरीक्षणावरून काय अनुमानें निघतात याचें क्रमश; विवेचन करू.