प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.         
 
ब्राह्मीच्या उत्पत्तीविषयीं दोन भारतीयांचीं अनुमानें:- श्रीयुत आर. शामशास्त्री यांनी ‘इंडियन अँटिक्करि’ नामक नियतकालिकाच्या ३५ व्या पुस्तकांत एक विस्तृत लेख [ पानें २५३-६७; २७०-९० व ३११-२४ ]  लिहून असें दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे कीं, देवतांच्या मूर्ती बनण्यापूर्वी हिंदू लोक त्यांची उपासना कांही सांकेतिक चिन्हांच्या द्वारें करीत असत, व ही चिन्हें त्रिकोण, वर्तुळ इत्यादि आकृतीनीं तयार केलेल्या ‘देवनगर’ नामक यंत्रांत काढली जात. देवनगराच्या मध्यें लिहिलीं जाणारी ही सांकेतिक चिन्हें कालांतरानें त्या त्या देवतांच्या नांवांची आद्याक्षरें मानली जाऊं लागलीं व ती आरंभी देवनगरामध्यें काढीत असत म्हणून त्यांनां देवनागरी असें नांव पडलें. हा लेख मोठा विद्वत्ताप्रचुर आहे खरा, परंतु ज्या तांत्रिक पुस्तकांतून लेखकानें आपलीं अवतरणें घेतलीं आहेत ती वैदिक वाङ्मयाच्या पूर्वींची नसली तरी निदान मौर्यकालाच्या तरी पूर्वीचीं आहेत हें जोंपर्यत सिद्ध होऊं शकत नाहीं तोपर्यंत सदरहू लेखकाचा सिन्त लंगडा आहे असेंच म्हटलें पाहिजे.

बाबू जगन्मोहनवर्मा यांनी ‘सरस्वती’ मासिक पुस्तकांक [ इ. स. १९१३ पासून १९१५ पावेतोंचे: अंक पहा ]  प्रसिद्ध केलेली उपपत्ति कांही निराळीच आहे. त्याचें असें म्हणणें आहे कीं, ब्राह्मी लिपीची उत्पत्ति वैदिक चित्रलिपीपासून किंवा तिच्यापासून निघालेल्या एखाद्या सांकेतिक लिपीपासून झाली असावी. परंतु त्यांनीं आपल्या लेखांत वैदिक चित्रलिपीतील म्हणून जीं चित्रें घेतलीं आहेत ती सर्व मन:कल्पित असून त्यांपासून ब्राह्मी अक्षरांची उत्पत्ति दाखविली आहे त्यास लिखित प्रमाण कांहीच देतां येत नाहीं. अशा स्थितींत त्यांची कल्पना रोचक असली तरी प्रमाणाभावी ती ग्राह्य धरतां येत नाहीं. बाबू जगन्मोहनवर्मांचा दुसरा सिद्धांत असा आहे कीं, ट, ठ ,ड ,ढ ,व ,ण हे पांच मूर्धन्य वर्ण मूळ आर्यांचे नाहीत [ सरस्वती, इ. स. १९१५, पा. ३७०,७१ पहा ]. वैदिक कालाच्या आरंभी अनार्यांच्या भाषांत हे वर्ण पाहून ते त्यांच्या कानांस फार गोड लागल्यामुळें त्यांनी ते आपल्या भाषेंत घेतले असें त्यांनी प्रतिपादन केलें आहे. ह्यास प्रमाण ते असें देतात कीं, पारसिक आर्यांच्या वर्णमालेंत मूर्धन्य वर्णांचा सर्वस्वी अभाव असून धातुपाठांतील कांही थोड्या धातू खेरीज करून इतर कोणत्याहि धातूंच्या आरंभी मूर्धन्य वर्ण नाहीं. परंतु पारसिक आर्यांत केवळ मूर्धन्य वर्णच नाहीत असें नाहीं तर छ, भ आणि ल हेहि वर्ण त्यांच्या मध्यें नाहींत; व संस्कृत वाङ्मयांतही ‘ञ’ नें आरंभ होणारा एकहि धातु किंवा शब्द सांपडत नाहीं. तेव्हां छ, भ, ल आणि ञ हेहि वर्ण अनार्यांपासूनच घेतले असें म्हणावयाचें कीं काय ? ट, ड, ढ आणि ण ह्यांनी आरंभ होणार्‍या अशा कित्येक धातू वैदिक वाङ्मयांत आहेत व ज्यांच्या मध्यें मूर्धन्य वर्ण आहेत असे शब्द तर त्यांत हजारों असतील. ग्रीक आर्यांच्या भाषेंत त व द हे नसून उलट ट व ड हेच. वर्ण आहेत. व सेमेटिक अनांर्याच्या लिपीत मूर्धन्य वर्णांचा अभाव असल्यामुळेंच ग्रीकांनां फिनीशियन ‘त’ सुचक ताव् अक्षरापासून ‘ ट ‘ सूचक टो व ‘ द ‘ सूचक ‘ दालेथ् ’ पासून ‘ ड ’ सूचक डेल्टा बनवावा लागला. तेव्हा बाबू जगन्मोहनवर्मा यांचें दुसरें विधानहि सर्वस्वीं निराधारच म्हटलें पाहिजे.

प्रस्तुत विवेचनाचा मथितार्थ एवढाच कीं ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकापूर्वीचा ब्राह्मी लिपीचा इतिहास अज्ञात आहे.