प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.        

ब्राह्मी लिपि पूर्वी फारशीप्रमाणें उलटी लिहीली जात होती काय ?- फिनीशियनपासून ब्राह्यीची उत्पत्ति दाखवितांना बुहलर यास अलेफ, योध इत्यादि कित्येक अक्षरांची अंगपालट-म्हणजे डावी बाजू उजवीकडे व उजवी बाजू डावीकडे-करण्याची अवश्यकता भासली. इ. स. १८९१ मध्यें जनरल कनिंगहॅम यानें ‘हिंदुस्थानांतील प्राचीन नाणी’ नामक जें एक पुस्तक प्रसिद्ध केले त्यांत मध्यप्रांताच्या सागर जिल्ह्यांतील एरण नांवाच्या एका पुरातन गांवी सांपडलेल्या कित्येक नाण्यांचे ठसे छापले होते. त्यापैंकी एकावर ‘ धमपालस ’ हीं अक्षरे उजवीकडून डावीकडे निघालेली पाहून बुहलर यास सेमेटिकपासून ब्राह्मीची उत्पत्ति झाली हें सिद्ध करण्याकरितां जो कांही पुरावा पाहिजे होता तो मिळाला असें वाटलें. कारण त्यास अशोकाच्या जौगड व धौली येथील लेखांत ओ, व जौगडच्या आणि दिल्लीच्या सिवालिक स्तंभावरील लेखांत घ, ही अक्षरें उलटीं कोरलेलीं अगोदरच मिळालीं असल्यामुळें, त्यांवरुन त्यानें ब्राह्मी लिपि पूर्वी उजवीकडून डावीकडे लिहिण्यांत येत होती परंतु मागून ग्रीक लिपीप्रमाणें तिचीहि लेखनशैली बदलून ती डावीकडून उजवीकडे लिहिण्यांत येऊं लागून तिच्या अक्षरांची अंगपालट झाली असा सिद्धांत काढला होता; पण ब्राह्मी लिपि उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती असें मानण्यास प्रत्यक्ष पुरावा कांहीच सांपडला नसल्यामुळें त्यास आपला सिद्धांत डळमळीत वाटत होता. एरण येथें उलट्या अक्षरांचें नाणें सापडतांच बहलर यास आपले कार्य झालें असे वाटलें व त्यानें तेथें मिळालेली नाणीं ख्रि. पू. ३५० च्या सुमाराचीं असावी असा अंदाज करून त्या काळीं ब्राह्मी लिपि उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे अशा दोन्हीहि रीतींनी लिहण्याची वहिवाट होती असें ठरविलें.