प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.  

बाविलोनी लिपि:- इजिप्तप्रमाणे बाबिलोनची लेखनकलाहि चित्रलिपि, कल्पनादर्शक लिपि व ध्वनिसूचक लिपि ह्या तीन अवस्थांतून गेली असली पाहिजे, परंतु बाविलोनच्या लोकांनी चांगली पद्धति सुचल्याबरोबर लागलाच जुन्या पद्धतीचा त्याग केल्यामुळें त्यांचे जे लेख आज उपलब्ध झाले आहेत, त्यांत चित्रांचा मागमूसहि सांपडत नाही. तथापि त्यांतल्या त्यांत जे अलीकडचे लेख आहेत त्यांची त्यांच्याहून प्राचीन लेखांशी तुलना केली असतां, त्यांतील ध्वनिसुचक लिपि चित्रलिपीपासून तयार झाली असल्याचें उघडकीस आल्यावांचून राहत नाही, मुळामध्यें जी मासे, घरें वगैरे पदार्थांची चित्रें होती, त्यांचें आतां कीलाकृति चिन्हांच्या झुबक्यांत रुपांतर झालें होतें. हे लेख ओल्या मातीवर लिहिले जात असल्यामुळें चिन्हें कीलाकृति काढण्यांत लिहिणाराची एक प्रकारची सोय होती. बाविलोनी लोकांनी आपल्या भाषेतील ध्वनीचें इतकें उत्तम पृथक्करण केलें होतें कीं प्रत्येक ध्वनीसाठी एक एक चिन्ह योजून ते आपल्या भाषेतील सर्व शब्दावयव त्या चिन्हांच्या साहाय्यांने लिहूं शकत होते. त्यांनां मिसरदेशीय लोकांप्रमाणें निर्णायक चित्रें वापरण्याची विशेष आवश्यकता भासत नव्हती, त्यांचे शेजारी जे असुर लोक, त्याच्या लिपीतहि शब्दावयवांकरितां ध्वनिसूचक चिन्हेंच योजली असून ती कांही बाबतीत मिसरदेशीय चित्रलिपीहून बरींच सुधारलेली होती. तथापि ही लिपि देखील पूर्णावस्थेत पोंचलेली नव्हतीच. अद्यापहि तिला ध्वनिचिन्हयुक्त लिपि व वर्णमालायुक्त लिपि या दोहोंमध्यें असलेलें मोठें अंतर काटावयाचें होतें.

ध्वनिचिन्हयुक्त लिपि व वर्णमालायुक्त लिपि यांतील भेद लक्षांत येण्याकरितां आपण ध्वनिचिन्हयुक्त लिपीचें वास्तविक स्वरूप काय असतें याचें जरा बारकाईनें निरीक्षण करू. आपल्या वर्णमालेंत जीं क पासून ळ पावेतॆ ३४ व्यजंनें आहेत, ती संपूर्ण ध्वनींची दर्शक नाहींत. त्याचप्रमाणें सोळा स्वरांपैकीं एखादा स्वर मिळविला म्हणजेच त्यांचा पर्ण उंच्चार होतो. अशा रीतीनें स्वरांच्या साहाय्यानें ही ३४ व्यंजनें एकंदर ( ३४x१६= ) ५४४ निरनिराळे ध्वनी व्यक्त करूं शकतातं ह्यांमध्यें १६ स्वरांचे १६ ध्वनी मिळविले म्हणजे ही ध्वनींची संख्या ५६० होते. यांपैकी कांही ध्वनी आपल्या भाषेत नसल्यामुळें ते सोडून दिले तरी ही संख्या ४०० हून कमी होणार नाहीं. तथापि एवढ्यानेंच आपल्या भाषेंतील सर्व ध्वनी संपतात असें नाहीं. ५० वर्णांच्या वर्णमालेंतून दोन दोन व्यंजनें व एक एक स्वर घेऊन त्यांचीं जोडाक्षरें केली तर तीं किती तरी होऊं शकतील ? ही सर्व जोडाक्षरेंहि स्वतंत्र ध्वनीच होत. यांशिवाय व्यंजन, स्वर व व्यंजन यांच्या एकीकरणानें जी रूपें होतात त्यांचे उच्चार देखील स्वतंत्र ध्वनीच असतात. उदाहरणार्थ, चिन्ह ह्या शब्दाचा जो आपण उच्चार करतों त्यामध्यें ‘ चिन् ’ आणि ‘ ह ‘ हे दोन स्वतंत्र ध्वनी आहेत ( चिन्हमधाल न्हचा उच्चार न्हावी शब्दांतील ‘न्ह’ प्रमाणें नाहीं हें विसरतां कामा नये ). थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे आदर्शभूत ध्वनिचिन्हयुक्त लिपीमध्यें एक स्वर व एक व्यंजन, एक व्यजंन व एक स्वर किंवा दोन व्यंजनें व एक स्वर मिळून जितके उच्चार तयार होऊं शकतात त्या सर्वोंकरीतां प्रत्येकीं एक एक चिन्ह पाहिजे. ह्या सर्व चिन्हांची म्हणजे अक्षरांची संख्या कित्येक हजार सहज होऊं शकेल. तथापि व्यवहारामध्यें ध्वनींतील बारीकसारीक भेदांकडे दुर्लक्ष्य केलें जात असल्यामुळें ही संख्या याहून बरीच कमी असते. उदाहरणार्थ रोमन लिपि घेतली तर तिजमध्यें ट आणि त, (किंवा) ण, आणि न यांच्याकरितां वेगळीं अक्षरे कोंठें आहेत ?  अथवा देवनागरी लिपि घेतली तर तिजमध्यें अँ ह्या स्वराकरितां स्वतंत्र अक्षर कोठें आहे ?  मराठी भाषेंत अँ हा स्वर मुळींच येत नाहीं असें म्हणतां येत नाही. मेंढी ब्याब्या करिते ह्या वाक्यांतील ब्याब्या शब्दांत वस्तुत: अँ हाच स्वर आहे. असा रीतीनें उच्चाराचे बारीकसारीक भेद वगळले म्हणजे ध्वनिचिन्हयुक्त लिपिंतील अक्षरांची संख्या बरीच कमी झाली तरी देखील तींत तीनचारशे अक्षरें सहजी राहतात.

प्राचीन असुर राष्ट्राच्या भाषेचें व्याकरण {kosh Friedrich Delitzsch Assyrische Lesestucke mit grammatischen tabellen & vollstandigem Glossar einfuhrung in die assyrische & babylonische Keilschriftlitteratur bis hinauf zu Hammurabi, Leipzig, १९००}*{/kosh} तयार झालें आहे. त्यांत ३३४ शब्दावयवांकारितां निरनिराळी अक्षरें दिलीं असून, शिवाय कांही किरकोळ निर्णायक चिन्हें आहेत. प्राचीन असुरराष्ट्र ज्या वेळीं सर्व जगाच्या संस्कृतीचें केद्रंस्थान समजलें जात होतें त्या वेळीं हीं जवळ जवळ ४०० अक्षरें तयार करावयाची हा तेथील बिगर इयत्तेंतील अभ्यासक्रम होता. हा अभ्यास केवळ बाबिलोन व असुर राष्ट्रांतील लोकांस करावा लागत असे असें नाहीं. ख्रिस्तपूर्व १५०० च्या सुमारास व बहुधा त्याच्याहि पुष्कळ अगोदर व नंतर बाविलोनची ध्वनिचिन्हयुक्त लिपि ही सर्व पश्चिम आशियाखंडांत व आशिया आणि मिसर देश ह्यांच्या दरम्यान राजव्यवहाराची लिपि समजली जात असे. त्या काळचे सर्व सुसंस्कृत देश बहुधा बाबिलोनी लिपीस एक आदर्शभूत लिपीच समजत असावे; व तिच्याहून कमी त्रासाची दुसरी एखादी लिपि तयार होणें शक्य आहे अशी त्यांनां कल्पना देखील नसावी.

परंतु ह्या ध्वनिचिन्हयुक्त लिपीच्या तीनचारशें अक्षरांपैकी एका अक्षराच्या ध्वनीचें जरी एखादा कुशाग्र बुद्धीच्या माणसानें पृथक्करण केलें असतें तरी त्याला लिहिण्यास अत्यंत सोइस्कर अशी वर्णमालायुक्त लिपि सहज शोधून काढतां आली असती, पण वस्तुस्थिति काय होती तें पाहिलें म्हणजे हें पृथक्करण आज आपणांस वाटतें तितकें सोपें नाही असें म्हणावे लागतें, शिवाय मिसरी लोकांचा अनुभव पाहिला असतां त्या पृथक्करणाची उपयुक्तता कोणाच्याहि सहज ध्यानांत येईल अशी दिसत नाही. व्यंजनाचा स्वरांशी इतका एकजीव झालेला असतो की व्यंजनांच्या पृथक् अस्तित्वाची कल्पना करणें हें आरंभी फारच कठिण गेलें असलें पाहिजे. व ह्या पृथक्करणाची कल्पना निघाल्यावरही ह्या पृथक्करणाच्या योगानें लिपि सुकर होण्याच्या ऐवजी जास्त कठिण मात्र होते अशी ध्वनिचिन्हयुक्त लिपीचा सराव झालेल्या माणसांची समजूत झाली असावी. त्यांच्यापैकीं कोणी अशीहि तक्रार केली असेल कीं, ह्या पृथक्करणांनें तुह्मी आम्हांस ‘ विद्वान् ’ सारखा साधा द्वावयवी ( व अतएव दोन अक्षरांचा ) शब्द लिहिण्यासाठी व् इ द् व् आ आणि न् अशीं सहा अक्षरें लिहावयास लावाल ! ही तक्रार कांही अगदींच काल्पनिक नाही. संक्षिप्त स्वरचिन्हांचा व व्यंजनचिन्हांचा उपयोग करून वर्णमालायुक्त लिपि अधिक सोइस्कर करण्याची कल्पना मागून निघाली असली पाहिजे. आपल्या देवनागरी लिपिमध्यें स्वरांकरितां संक्षिप्त चिन्हें योजून तीं व्यंजनास जोडून लिहिण्यांत येत असली तरी इतर लिपीमध्यें अद्यापहि स्वर व व्यंजनें पृथक् पृथकच लिहीत असतात. खुद्द बाबिलोनमध्यें वर्णमालायुक्त लिपि अस्तित्त्वांत आल्यावरहि शेंकडो वर्षेंपर्यत लोक आपल्या जुन्या ध्वनिचिन्हयुक्त लिपीलाच चिकटून बसले होते. ह्या गोष्टीली इतिहासांतरीं पुरावा आहे. आज देखील जपानी लोक आपल्या देशांत वर्णमालायुक्त लिपि सुरू करण्यास कितीसे खुषी आहेत ? फार दिवसांपासून चालत आलेली रुढि लोकांची मनें कोणत्याहि नवीन गोष्टाविषयीं पूर्वग्रंहानें दूषित करिते व त्यायोगें तिची खरी उपयुक्तता त्यांच्या ध्यानांत लवकर येत नाहीं. तथापि पुराणमतवाद्यांनां केव्हांहि शेवटी हारच खावी लागते, व त्याप्रमाणें वर्णमालेच्या बाबतीतहि त्यांनां शेवटीं हार खावी लागली असल्यास त्यांत नवल नाहीं. व्यंजनाची कल्पना एकदां चांगलीशी मनांत ठसली म्हणजे ध्वनिचिन्हयुक्त लिपीचें मरण ओढवलेंच म्हणून समजावें.