प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.            

प्राचीन लिपी.
ब्राह्मी:- हिंदुस्थानांत ज्या अनेक लिपी आहेत त्यापैकी बहुतेक लिपींचा उगम या लिपींतच असल्यामुळें तिच्यासंबंधी अवश्यक तेवढी सर्व माहिती अगोदरच सविस्तर दिली गेली आहे.

चिनी:- स्त्रि, पू. तिसर्‍या सहस्त्रकांत आपली लिपि निघाली असें चिनी लोक म्हणतात. या लिपीचे उपलब्ध झालेले सर्वांत जुने अंकित लेख स्त्रि. पू. १८ व्या शतकांतील किंवा त्याहिपूर्वींचे आहेत. ह्या लिपीतील प्रत्येक अक्षर कल्पनावाचक शब्द असतो व ती उभ्या ओळींत वरून खाली उजवीकडून डावीकडे लिहीत जातात. तीत वस्तुदर्शक शब्द साधी किंवा संयुक्त चित्रचिन्हें घालून; कल्पनादर्शक शब्द संयुक्त चित्रचिन्हें घालून, आणि सदृशध्वनि [ चिनीभाषांत स्वतंत्र ध्वनी असलेले जास्तींत जास्त ८०० पासून ९००च शब्द आहेत. अत्यंत संस्कृत म्हणविल्या जाणार्‍या पेकिंगी भाषेंत तर त्यांची संख्या सारी ४२०च आहे.] असलेला शब्द त्या शब्दाचें ध्वनिचिन्ह व निश्चितार्थी दुसरें शब्दचिन्ह घालून लिहिला जातो. ध्वनिसूचक बहुतेक चिन्हें संयुक्त अक्षरचिन्हें आहेत. उच्चारांत फरक पडत गेल्यामुळें तीं आतां प्रचलित ध्वनींची वाचक राहिलीं नाहींत.

मिसरदेशीय चित्रलिपि:- हिच्या संबंधी सविस्तर माहिती अगोदर येऊन गेलीच आहे (हाच विभाग पृ.३८ पहा) ख्रि. पू. ३५ व्या शतकाच्या सुमारास हिच्यापासून २४ अक्षरें असलेली वर्णयुक्त लिपि बनली.

हिअरेटिक उर्फ पुरोहिती:- धावत्या कलमेनें लिहिण्यांत चित्रलिपीस मिळालेलें स्वरूप. हिच्यापासून ख्रि, पू. २३-१७ शतकांत [ अजमासें ख्रि. पू. १९ वें शतक डीरोगच्या मतानुसार ] सेमेटिकांनी आपली लिपि बनविली

फिनीशियन:- ख्रि. पू. ९ व्या शतकांत ही फिनीशियांत पूर्णपणें प्रचारांत होती. हींत २२ वर्ण असून चित्रलिपीप्रमाणें हीतहि स्वर नव्हते. ब्रेस्टेडच्या मतें ही हिअरेटिकपासून निघाली. पण स्वायजेलबर्गला तसें वाढत नाहीं. डीके हा तुटपुंज्या पुराव्याच्या आधारावर हिची उत्पत्ति असुर देंशातील कीलाकृति लिपीपासून काढतो. ही सर्व युरोपीय व सोमेटिक लिपीची आद्यजननी आहे.

अरमइक:- उत्तर सिरियाची लिपी. ही फिनीशिय नोद्भव लिपि असून तिचा जुन्यांत जुना लेख ख्रि. पू. ८०० च्या सुमारास उत्तर सिरियांत सांपडला आहे. ही ख्रि. पू. ७ शतकाच्या सुमारास तयार होण्यास सुरूवात झाली. ख्रि. पू. ४थ्या शतकाच्या सुमारास हिचा फिनीशियनच्या ऐवजी व्यापारविषयक पत्रव्यवहारांत सर्व पश्चिम आशियांत उपयोग होऊं लागला. फिनीशियन लिपींतील अक्षरांचे शिरोभाग उघडे होऊन, लहान होऊन व नंतर लुप्त होऊन ही लिपि बनली.

हिब्रू:- प्राचीन हिब्रू लिपि लेनी मांट व साइस यांच्या मतें फिनीशियनजन्य असून टेलरच्या मतें फिनीशियन व हिब्रू लोकांना हिक्सास राजसत्ताकाळांतच ( ख्रि. पू. २३-१७ शतकांतच) लिपिज्ञान झालें होतें, तिचा ख्रि. पू. ७०० च्या सुमाराचा एक लेख आज उपलब्ध आहे. सामरिटन लिपीचा उगम ह्या जुन्या हिब्रूंत असून तो इ. स. ४०० च्या पूर्वी झालेला आहे. नव्या हिंब्रू लिपीचीं चौरसाकार अक्षरें अरमइकपासून बनलेंली आहेत. अरबीप्रमाणें हींत स्वर नाहींत हिच्या वर्णमालेंत एकंदर २२ अक्षरें आहेत. तथापि त्यांनी २९ व्यंजनोच्चार दर्शवितां येतात. ह्या लिपींत दोन भिन्न अक्षरांच्या आकृतीपेंक्षां एकाच अक्षराच्या दोन रूपांत अधिक फरक दिसतो.

एस्ट्रांघेला:- ही लिपि नेस्टोरियन मिशनर्‍यांनी उत्तर सिरियांतून मध्यआशियांत नेली व तेथून नंतर तत्संभव लिपीचा तुर्कींच्या द्वारे पूर्वेस माचूरियापर्येंत प्रसार झाला.

प्राचीन ग्रीक:- फिनीशियनमधील नको असलेले महाप्राणोच्चार वर्ण, अर्धस्वर व उष्मवर्ण यांचे स्वर ही लिपि बनली. हिचे लेख सातव्या शतकाच्या अलीकडचे सापडतात. या वेळी ग्रीक लिपी फिनीशियन वर्चस्वांतून मुक्त झाल्या होत्या. आरंभी ही फिनीशियनप्रमाणें उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे.

प्राचीन रोमन:- इटलीत कांही खाल्सिडियन (पश्चिम ग्रीक) लोक येऊन राहिले होते त्यांच्यामुळें लॅटिन लिपि जन्मास आली. थीटा व फाय यांसारखे अनवश्यक महाप्राणोच्चारवर्ण गाळून व इटालियन भाषेत अनुरूप असे दुसरे फेरबदल करून ही  लिपी बनली. हिचा सर्वांत जुना लेख ख्रि. पू. ६ व्या शतकांतला दिसतो. त्यांतील अक्षरें उजवीकडून डावीकडे लिहिलेलीं आहेत. हल्लीची रोमन लिपि, हिच्यापासूनच पुढें तयार झालीं.

एट्रूस्कन:- हिचा उद्भवहि पश्चिम ग्रीक लिपींतूनच झाला. हिनें बहुतेक सर्व खाल्सिडियन वर्ण घेतले असावे. हिचे पुष्कळ लेख उजवीकडून डावीकडे लिहिलेले आढळतात. इटालींतील ऑस्कन, फालिस्कन व अंब्रिअन लिपी एट्रुस्कन पासूनच उद्भवल्या आहेत.

रूनिक:- ट्युटॉनिक लोंकाचीं रूनिक अक्षरें कोणी एट्रु स्कन पासून, कोणी इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाअखेरच्या लॅटिनपासून तर कोणी ख्रि. पू. सहाव्या शतकाच्या पूर्वीच्या पश्चिम ग्रीकपासून निघालीं असें म्हणतात. उजवीकडून डावीकडे लिहिलेले या लिपीचे लेख आढळले असल्यामुळें तिची उत्पत्ति अर्वाचीन नसावी. हिच्यापासून जी ओगॅंम लिपि निघाली तिचे ब्रिटनमध्यें व आयर्लंडांत सहाव्या शतकांतील लेख सांपडतात. पेब्राकमध्ये ट्युटन लोकांची वसाहत होती तेथें हिचा उद्भव झाला असें टेलर म्हणतो.