प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.              

प्राचीन मिसर देशांतील लेखनसाहित्य:- पापायरस या नावांची एक तृणजातीय वनस्पती आहे. नाईल नदीच्या मुखामधील दलदलीच्या प्रदेशांत प्राचीन काळापासून पापायरसची उत्पत्ति व वाढ पुष्कळ होत असते. या झाडाची उंची चार हातांपर्यंत असून याच्या कांडीचा आकार तिकोनी असतो. या झाडापासून ४ ते ५ इंच लांबीचे तुकडे तोडून त्यांच्या साली काढून घेत. त्यांची रुंदी अर्थात फार थोडी असे. असल्या साली घेऊऩ त्या एकीला एक चिकटवून त्यांचा लांब पत्रा बनविण्यांत येई. तो प्रथम दाबून ठेवून नंतर वाळवीत; व साफ सुकला म्हणजे हस्तिदंतानें किंवा शंखानें घोटून साफ बनवीत. एवढें केलें म्हणजे मग तो लिहिण्यास योग्य होई. याप्रमाणें तयार केलेल्या पत्रांना यूरोपीय लोक ‘पापायरस’ असें म्हणतात. पुस्तकें, चिठ्ठ्या व पत्रव्यवहार वगैरे लिहिण्याच्या सर्व कामाकडे या पत्रांचा उपयोग कागदाऐवजी करण्यांत येत असे. अशी पत्रें एकास एक उभीं चिकटवून त्यांचे लांब खरडेहि बनवीत असत. असे लांब लांब खरडे मिसर देशांतील प्राचीन कबरींमधून सांपडले आहेत. ते लांकडाच्या पेट्यामध्यें ठेविलेल्या शवांच्या हातांत किवां शवांच्या अंगाभोवताली गुडाळलेले असतात. मिसर देशांत ख्रि. पू. २००० च्या सुमाराचे असले खरडे सांपडले आहेत. या देशांत पर्जन्याचा बहुतेक अभाव असल्यामुळें ही पापायरस पत्रें पुष्कळ काळ टिकूं शकतात. या झाडांच्या सालीपासून पत्रें बनविण्यास फार प्रयास पडत असत तरी लिहिण्यास योग्य असें दुसरे कांही साधन उपल्बध नसल्यामुळें त्यांचाच उपयोग करण्यांत येई; व यासाठी पापायरसची लागवडहि मुद्दाम सरकारच्या हातीं ठेवण्यांत आली होती.