प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
प्रथमावस्था, चिञव्यक्ति:- लेखनकलेंचें मूळ शोधण्यास आपणांस थेट इतिहासपूर्वकालाची कल्पना केली पाहिजे. अगदी रानटी अवस्थेंत असलेल्या माणसास देखील आपले विचार व्यक्त करण्याची अवश्यकता भासत असते; व त्यासाठी तो चित्रांच्या खुणांचा उपयोग करतो. पूर्वीचीं गुहेंत राहणारी माणसें आपले पराक्रम चिरस्मरणीय करून ठेवण्यासाठी काळविटाच्या शिंगावर, नाही तर हत्तीच्या सुळ्यांवर माणसांची व पशूंची चित्रें कोरीत असत. अगदीं अलीकडे देखील अमेरिकेंतील तद्देशीय लोक आपले युद्धांतील व मृगयेंतील विजय दाखविणारी वेडीवांकडी चित्रें तयार करतांना दृष्टीस पडतात. जेव्हां यूरोपीय लोकांनी अमेरिका शोधून काढली तेव्हां उत्तरेकडील तद्देशीय लोकांची याहून अधिक प्रगति झाली नव्हती. तथापि नैऋत्येकडील अझटेक लोक व युकाटानमधील मय लोक मात्र या बाबतींत बरेच पुढें गेले होते. यूरोपीय लोकांनी जर ह्या लोकांची संस्कृति नष्ट केली नसती तर त्यांच्या चित्रलिपीचाहि विकास होत होत कांही पिढयांनी तिच्यापासून वर्णमाला तयार झाली असती.
अझटेक व मय लोक हे सोळाव्या शतकांत जी पायरी चढत होते, त्या पायरीपावेतों पौरस्त्य लोक त्यांच्या किमानपक्षी पांच सहा हजार वर्षे तरी अगोदर जाऊन पोंचले होते. मिसरदेशीय लोकांनीं सर्व जगाला थक्क करून सोडणारे मनोरे बांधले त्या काळीं त्या देशांत व बाबिलोनमध्यें लेखनकला इतकी परिणतावस्थेंस पोचली होती कीं, त्यांनां केवळ ठराविक मर्यादेंतील कल्पनाच चित्रांच्या साह्यानें व्यक्त करतां येत होत्या असें नाहीं, तर सुसंस्कृतावस्थेंतील माणसांच्या जीवनक्रमांतील एकूण एक कल्पनांच्या बारीक सारीक भागांचे देखील वर्णन करतां येत होतें. त्या काळच्या लोकांनी आपले लढायांतील पराक्रम व रोजच्या व्यवहारांतील देवघेवी लिहून ठेवल्या असून आपल्या नैतिक व पारलौकिक आकांक्षाहि उत्तम रीतीनें व्यक्त केल्या आहेत.