प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
पाणिनीचें पूर्वसंचित:- पाणिनीनें आपली अष्टाध्यायी रचली तेव्हां व्याकरण विषयावर कित्येक ग्रंथ तयार झालेले होते हें आपण वर पाहिलेंच. ‘यस्कादिभ्यो गोत्रे‘ (२-४-६३) ह्या पाणिनीच्या सूत्रावरून यास्काचें निरूक्त त्याच्या अगोदरचें होतें असें माहीत पडतें. यास्कानेंहि आपल्या ग्रंथांत औदुंबरायण (१-२-१७), कोष्टुकी (८-२-१), शतबलाक्ष (११-६-३),मौद्रल्य (७-१४-६), शाकपूणि (१-३-३) शाकटायन (१०-१-३), स्थौलाष्ठीवी (१०-८-९), आग्रायण (१०-८-१०),औपमन्यव (७-१५-१). और्णवाभ (८-५-३) कात्थक्य (१-१५-२), कौत्स (१-३-५), गार्ग्य (४-३-२), गालव (३-१५-१), चर्मशिरस् (४-३-२), तैटिक (१-२-८), वार्ष्यायणि व शाकल्य (६-२८-३) या व्याकरणकारांचा व निरुक्तकारांचा उल्लेख केलेला आहे. यांतील फक्त गार्ग्य, शाकटायन, गालव व शाकल्य यांचींच नांवे पाणिनीच्या गंथांत आली आहेत. यावरून असें दिसतें कीं पाणिनि व यास्क यांच्या अगोदर व्याकरणावर व निरूक्तावर अनेक ग्रंथ होऊन गेले होते, पण आज त्यांपैकीं एकहि उपलब्ध नाहीं.