प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
नाण्यांवरील लिपीची ऐतिहासिक किंमत:- बुहलरच्या सदरहू सिद्धांतास पुष्टि देण्यास नाण्यांशिवाय दुसर्या कोणत्याही प्रकारच्या लेखाचा पुरावा मिळूं शकला नाही ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. अशोकाच्या शिलालेखात दोन अक्षरें उलटी कोरलेली सांपडतात ह्या गोष्टीस विशेष महत्त्व देतां येत नाहीं. कारण, एक तर अशा चुका लेख खोदणार्या माणसाच्या अज्ञानामुळें किंवा हस्तदोषामुळें होणें असंभवनीय नाही; व दुसरें केवळ देशभेदामुळें किंवा कालभेदामुळेंहि अक्षरांच्या रूपांत असला फरक झालेला दृष्टीस पडतो. उदाहरणार्थ, यशोधर्म्याच्या मंदसोरच्या लेखांत ‘ उ ’ ची आकृति साधारणत: अर्वाचीन नागरीसारखी आहे, परंतु त्याच शतकांतील गारूलक सिंहादित्याच्या लेखांत ती जवळ जवळ उलटी आहे. पंधराव्या शतकापर्यंत बंगाली लिपींतील ‘ च ’ चा कमानदार भाग मूळ ब्राह्मी प्रमाणें डाव्या बाजूस होता. पण वर्तमान बंगाली लिपींत त्या अक्षराची पूर्ण अंगपालट होऊन तो उजवीकडे आलेला पहावयास मिळतो. इ. स. १८९५ साली रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकांत एक लेख आला होता. त्यांत सिलोनमध्यें उलट्या अक्षरांचे दोन शिलालेख उपलब्ध झाले आहेत असें ह्मटलें होतें खरें; परंतु अद्यापपर्यंत त्या शिलालेखाची प्रतिकृति कोठें छापून प्रसिद्ध झाली नाहीं. उलटीं अक्षरें किंवा उलटे लेख जे पहावयास मिळतात ते फक्त नाण्यांवर सातवाहन (आन्ध्र) वंशी शातकर्णी राजाच्या निरनिराळ्या प्रकारच्या दोन नाण्यांवर [ कॅटलॉग ऑफ कॉइन्स आफ दि आन्ध्र डिनॅस्टि इ. पान ४, आकृतिपट १, नं.९ व ११] ‘ शतकांणिस’ हा संबध लेखचा लेख एरणच्या नाण्याप्रमाणें उलटा आला आहे. पार्थियन ‘अब्दगसिस’ याच्या एका नाण्यावरील खरोष्टी लेखाचा एक भाग उलटा-म्हणजे डावीकडून उजवीकडे निघाला आहे [ रॅपसन; इंडियन कॉइन्स, पृ.१५ ]. महाक्षत्रप रंजुबुल (राजुल) याच्या दोन नाण्यांवर खरोष्टी लेखाच्या बाजूस Y व E ह्या दोन ग्रीक अक्षरांचा एक एकाक्षरी शिक्का आहे. त्यांतील E हे अक्षर एका नाण्यावर बरोबर निघालें आहे, पण दुसर्यावर तें उलटें आहे [ गा.कॉ.ग्री.सी.पा. ६७ नं. ५ व ६ ]. पाटणा येथे सांपडलेल्या कित्येक मुद्रिकांवरील ‘अगपलश’ (अंगपालस्य) ह्या लेखांतील [क.आ.स.रि.पु.१५, आकृतिपट ३,नं.२ ] अ हें अक्षर उलटें आहे. दुसर्या एका प्राचीन मुद्रिकेवर ‘ श्रीस्सपकुल’ असा लेख आहे त्यांत श्री व प हीं दोन अक्षरे उलटी निघालीं आहेत [ ज.रॉ.ए.सो.इ.स.१९०१,पा.१०४, नं. ९]. अगदी अलीकडचें उदाहरण घ्यावयाचें म्हणजे इंदूर संस्थानांतील वि. सं. १९४३ च्या नाण्यावरील ‘एक पाव आना इंदोर’ हा सबंध लेखचा लेख उलटा आला आहे [इं. अँ.पु. २६ पा. ३३६]. प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापावतों मधून मधून नाण्यांवर उलटीं अक्षरें किवा उलटे लेख निघालेले कां सांपडतात याचें कारण अगदी उघड आहे. नाणीं पाडण्याकरितां जे ठसे तयार करितात त्यांवर अक्षरें उलटी काढून तीं उलट बाजूने कोरीत जावयाची असल्यामुळें लिहितां वाचतां येणार्या माणसाच्या हातून तीं चुकून सुधी खोदलीं जाणें अगदीं साहजिक आहे. अशा स्थितींत नाण्यांवरील लेखांच्या आधारावर एखाद्या लिपीच्या लेखनशैलीसंबंधीं कोणतेंहि अनुमान करणें युक्त नाही हें सांगावयास नकोच.