प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
तैत्तिरीय संहितेंतील उल्लेख:- शुक्लजुर्वेद संहितेंत लिख् धातूचा उपयोग केलेला आढळत नाही; पण तैत्तिरीय संहितेंत लिख् धातूचा उपयोग ‘परिलिखितम,’ ‘त्र्यालिखिता’ व ‘प्रलिखिते’ या रूपांत आलेला आहे. यापैकीं पहिल्या दोन शब्दांचा अर्थ रेखा करणें असा होतो. पहिल्याचा अर्थ सभोवतीं रेखा करणें असा व दुसर्याचा इष्टकांवर त्रिशूलाकृति त्रिरेखांकित चिन्ह करणें असा आहे. ‘ यस्यामार्द्रायामिष्टकायां त्रिपुण्ड्रद्रेखात्रयं क्रियते सेयं त्र्यालिखिता | ततत्र्यालिखितं देवानां चिन्हम् | [ तै. सं. ४.२,९ वर सायण]. तिसरा शब्द ‘या प्रलिखितं तस्यै खलतिरपमारी’ या ठिकाणीं [२.५११] प्रसंगात् रजस्वलाव्रतांचें विधान करितांना आला आहे. या ठिकाणी सायणांनी ‘ प्रलिखिते भित्तौ चित्रादिकं करोति ’ असा अर्थ केला आहे. म्हणजे जी रजस्वला असतांना भिंतीवर चित्रें वगैरे काढील तिला खलति म्हणजे केशशून्य व अपमारी म्हणजे दुर्मरणयुक्त असा पुत्र होईल असें म्हटलें आहे.
अश्र्वमेघप्रकरणीं तैत्तिरीय (५,२,११) व वाजसनेयि (२३.३३-३७) या दोन्ही संहितांमध्ये जवळ जवळ शब्दश: एकच अशा मंत्रामध्यें अश्वाच्या अंगावर जेथें तरवारीनें कापावयाचें त्या ठिकाणीं यजमानाच्या तीन राण्यांनी सूचीनीं रेषा करण्यासंबंधी उल्लेख आहे. त्यांत रूप्याच्या, सोन्याच्या व शिश्याच्या सळ्यांनी या रेषा करावयाच्या असें सांगितलें आहे., “ रजता हरिणी: सीसा युजो युज्यन्ते कर्मभि: | अश्वस्य वाजिनस्त्वचि सूचिभि: शिंम्यन्तु त्वा ” असा तो मूळ उल्लेख आहे. यांत शिशाची सळई रेघ काढण्याकरितां उपयोगांत आणली आहे ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. यावरून शिशानें रेघा ओढणें ही गोष्ट त्या वेळच्या लोकांस माहीत होती असें दिसून येतें. वरील ऋचेवर सायणभाष्य असें आहे:- ‘रजता रौप्या; हरिणी; हिरण्मया: सीसा लोहमय्य: युजो लेखनकर्मयोग्या:सूच्य: अत एव वाजिनोन्नहेतोरश्वस्य त्वचि कर्मभिर्लेखनादि व्यापारैर्युज्यन्ते तादृशीभि सूचिभिहें अश्व त्वां लेखनकुशला देवता: शिम्यन्तु लिखन्तु.’
तैत्तिरीय संहितेंत अक्षर शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे व त्याचा सर्वत्र छंदांशी संबंध आहें वाजसनेयि संहितेंत आलेला अक्षरपंक्ति शब्द त्याच अर्थानें तैत्तिरीय संहितेंत दोन ठिकाणी आलेला आहे (४.३,१२;५.३,८).
एका ठिकाणीं पंधरा सामिधेनी ऋचा पठन कराव्या असें सांगितले आहे; व असें म्हटलें आहे की, “ पत्र्चदश सामिधेनीरन्वाह पत्र्चदश वा अर्धमासस्य रात्रयोर्धमासश: संवत्सर आप्यते तासां त्रीणिच शतानि षष्टिश्चाक्षराणि तावती: संवत्सरस्य रात्रयोऽक्षरश एव संवत्सरमाप्रोति | (२.५.८). म्हणजे १५ सामिधेनी ऋचांची अक्षरें ३६० होतात व अर्धमासाच्या रात्री १५ असतात व २४ अर्धमास मिळून संवत्सराच्या ३६० रात्री होतात; अर्थात् अक्षरांनी संवत्सराची रात्रिसंख्या मिळते. याप्रमाणें त्या वेळीं ३६० अक्षरें मोजण्याइतकें अक्षरज्ञान झालें होतें व हें केवळ तोंडी होणें अशक्य दिसतें.