प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
ग्रीकांच्या लेखांवरून अनुमान:- ख्रि. पू. ३२६ सालीं ग्रीक बादशहा अलेक्झांडर हिंदुस्थानांत स्वारी करुन आला तेव्हां त्याच्या सेनापतींमध्यें निआर्कस नावांचा एक मनुष्य होता. हा अलेक्झांडरबरोबर पंजाबांत कांही दिवस राहिला असून त्यांनतर सिंधुनदीमधून नांवातून अलेक्झांडरनें जें सैन्य रवाना केलें त्याचें आधिपत्त्य या माणसाकडेच देण्यांत आलें होतें. निआर्कस यानें अलेक्झांडरच्या स्वारीची जी सविस्तर हकीकत लिहून ठेविली होती तींतील माहिती एरियननें आपल्या ‘ इंडिका ’ नांवाच्या पुस्तकांत दिली आहे. तिजवरून असें कळतें कीं, चवथ्या शतकांत हिंदुस्थानांतील लोकांनां रूईपासून कागद तयार करण्याची कृति अवगत होती (मॅ; हि. ए. सं. लि; पान ३६७ व बु. इ. पॅ; पान ६). ख्रिस्तपूर्व ३०६ च्या सुमारास सिरियाचा बादशहा ‘ सिल्यूकस ’ यानें मौर्यवंशी चंद्रगुप्त राजाच्या दरबारी ‘ मिगॅस्थिनेस ’ नांवाचा आपला एक वकील पाठविला होता. या ग्रहस्थाचें वास्तव्य हिंदुस्थानांत सुमारें पांच वर्षे होतें. त्यानें ह्या देशासंबंधी माहिती लिहिलेलें ‘ इंडिका ’ नांवाचें पुस्तक जरी आज उपल्ब्ध नाहीं, तरी त्यांतून ज्या प्राचीन ग्रंथकारांनी आपल्या पुस्तकांत माहिती घेतली होती त्यांच्या लेखांवरुन आज आपणांस असें समजतें कीं, चंद्रगुप्ताच्या वेळी दहा दहा स्टेडियांच्या (१ स्टेडियम = ६०६ फूट ९ इंच) अंतरावर धर्मशाळा कोंठें आहे याची माहिती देण्याकरितां व अंतर दर्शविण्याकरितां हिंदुस्थानांतील रस्त्यावर दगड पुरलेले होते (इं. मि: पानें १२५-२६): वर्षप्रतिपदेच्या दिवशी ज्योतिषी लोक नवीन वर्षोचें फळ सांगत असत (पान ९१): पत्रिका तयार करण्याकरितां जन्मकाल लिहून ठेवण्यांत येत असे (पान १२६); व न्याय स्मृतिवचनानुसार देण्यांत येई (बु. इं. पॅ. पान ६). ग्रीक ग्रंथांतील वर दिलेले हे सर्व उल्लेख लेखनकलेच्या प्राचीनतेचेच निदर्शक आहेत.