प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.            
 
जगांतील लिपी:- जगांतील लिपीचा हिशेब घेऊन, त्यांचा परपस्परांशी संबंध शोधून, त्यांपैकी एकमूल किती आहेत हें पाहिल्यावर पुढची क्रिया म्हटली म्हणजे सर्वांत जुन्या आणि एकमेकांशी विसंवादी अशा ज्या लिपी आढळतात त्यांच्या उत्पत्तीकडे जाणें. जगांतील सर्व प्राचीन आणि अर्वाचीन लिपींची स्थूल यादी आणि त्यांचा विकास दाखविणारे कोष्टक पुढें दिलें आहे. त्या कोष्टकावरून असें दिसून येईल की यूरोपांत आढळणार्‍या सर्व लिपीचें उगमस्थान पश्चिम आशिया आहे; हिंदुस्थानांतील, ब्राह्मी व तद्धव लिपीचें उगम स्थान संशयित आहे; खरोष्ठीचें उगमस्थान पश्चिम आशिया असावे; व अनेक लिपी चिनी लिपीच्या उद्रमाशी आणि इतिहासाशी संबद्ध आहेत. अमेरिकेंतील चित्रलिपी, आणि चित्रलिपींतून मातृकालिपीच्या अवस्थेंत जाऊं पहाणार्‍या लिपी या सर्व आज मृतावस्थेंत आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं.

प्रथम प्राचीन लिपींसंबंधीं थोडक्यांत माहिती देऊन मग आजच्या प्रचलित लिपींकडे वळूं. ही लिपिविषयक माहिती देतांना प्रथम हिंदुस्थानांतील लिपी, नंतर आशियांतील इतर लिपी त्यांच्या मागून यूरोपमधील लिपी व सर्वांच्या मागून अफ्रिका व अमेरिका खंडातील लिपी असा अनुक्रम स्विकारण्यांत येईल. आजच्या लिपींची उत्पत्ति, स्थल आणि त्यांचा आश्रय करणारे मनुष्यसमूह यांच्याकडे लक्ष दिल्यानंतर लिपिविकासवृक्ष आपणांस कसा रचतां येतो तें पाहूं.