प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
खरोष्ठीचा हिंदुस्थानांत प्रसार:- खरोष्ठी लिपीचें वर जें सामान्य वर्णन दिलें आहे त्यावरून या लिपीचा संस्कृत ग्रंथ लिहिण्याच्या कामी उपयोग होणें अगदी अशक्य असलें पाहिजे हें कोणासहि सहज कळून येईल. प्राकृत भाषांमध्यें र्हस्वदीर्घाचा फारसा भेद नसल्यामुळें व त्यांत जोडाक्षरांचा उपयोगहि क्वचितच करण्यांत येत असल्यामुळें त्या भाषांकरितां ही लिपी सोईची होती, व त्याप्रमाणें हिंदुस्थानाच्या वायव्य भागांत तिचा उपयोग होतहि असला पाहिजे. इराणच्या बादशहाची हिंदुस्थानांतील सत्ता नष्ट झाल्यावर शकादि ज्या परद्वीपस्थ राजांनी हिंदुस्थानावर कांही काळ अमल गाजविला, त्यांनाहि खरोष्ठीसच आश्रय दिला असल्याविषयी आपण वर पाहिलेंच आहे. परंतु हिंदुस्थानांत ती अधिक दिवस टिकणें, किंवा उपरिनिर्दिष्ट संकुचित मर्यादेच्या बाहेर तिचा प्रसार होणें शक्यच नव्हतें. कारण त्या काळीं खरोष्ठीहून सर्वप्रकारें श्रेष्ठ अशी ब्राह्मी लिपि या देशांत प्रचलित असल्यामुळें तिच्याशीं चढाओढ करणें या लिपीच्या शक्तीबाहेरचें काम होतें. वास्तविक पाहतां तिच्या जननीस जर राजाश्रय नसता तर ती आधी जन्मासच आली नसती; व यदाकदाचित् व्यापार्यांच्या सोईकरिंता तिचा जन्म झाला असता तरी ती या देशांत फार दिवसपर्यंत जगली नसती. कलकत्ता हायकोर्टचे माजी न्यायधीश एफ. पार्गिटेर यांनी “ दि पुराण टेक्स्ट ऑफ डिन्यास्टीज ऑफ दि कलि एज” नावांच्या आपल्या पुस्तकांत पुराणे अगोदर खरोष्ठी लिपींत लिहलेलीं असून नंतर ती ब्राह्मीमध्यें लिहिण्यांत आलीं असें सिद्ध करण्यात प्रयत्न केला आहे. या सिद्धांतास त्यांनी असा पुरावा दिला आहे कीं, विष्णुपुराणांत बहुधा सर्व ठिकाणीं अशोकवर्धन हें नांव सापडतें, परंतु त्याच्या एका हस्तलिखित प्रतींत अयोशोकवर्धन असा पाठ दृष्टीस पडतो. हिंदुस्थानांतील फक्त खरोष्ठी लिपीतच श आणि य यांमध्यें घोटाळा होण्याचा संभव असल्यानें हें पुराण अगोदर खरोष्ठींत लिहिलेलें असावें व त्याची नक्कल करीत असतांना लिहिणारानें अशोकवर्धनाच्या ठिकाणी अयोकवर्धन लिहिलें असावें. पुढें ती चूक ध्यानांत आल्यावर त्यानें किंवा दुसर्या कोणीं तेथें ‘ शो ’ हें अक्षर घातले; परंतु पूर्वीचा ‘ यो ’ खोडण्याचें राहिल्यामुळें या दुय्यम प्रतीची जेव्हां पुन्हां नक्कल केली गेली तेव्हां तीत अयोशोकवर्धन हा शब्द आला, व तो पुढील नकलांत तसाच कायम राहिला (पान ८४ पहा). याचप्रमाणें विष्णुपुराणाच्या दुसर्या एका प्रतीत कोशलच्या ऐवजीं कोयल, व वायुपुराणाच्या एका प्रतींत शालिशूकच्या ठिकाणीं शालियूक असा पाठ आहे. ‘श’ च्या ठिकाणी ‘य’ लिहिला गेल्याची हीं तीन उदाहरणें झालीं. यांशिवाय मत्स्य पुराणांत एके ठिकाणी ‘काशेया;’ च्या ऐवजी ‘कालेया; ’ व वायुपुराणांत कोठें कोठें ‘ शुंगभृत्य ’ च्या ऐवजी ‘शुंगकृत्य’ असा पाठ सांपडतो (पान ८५). या थोड्याशा उदाहरणांवरुन साहेब मजकुरांनी उपरिनिर्दिष्ठ आपला सिद्धांत काढला. पण वास्तविक पाहिलें असतां “वर्डक” खेरीज करून आजपर्यंत खरोष्ठी लिपींतील जेवढे म्हणून लेख सांपडले आहेत त्या सर्वांमधील श, व आणि य ह्या अक्षरांत स्पष्ट भेद दिसून येतो. ‘श’ च्या ठिकाणीं ‘ल’ चा व ‘भ’ च्या ठिकाणी ‘क’ चा भ्रम होण्याचा संभव तर त्याहूनहि फार कमी आहे. नकला करणारे लोक सुशिक्षित नसतात व त्यामुळें त्यांच्या हातून अशा चुका होण्याचा संभव आहे असें जर आपण धरून चाललों, तर पुराणांत हल्ली दिसून येतात त्यांपेक्षां किती तरी अधिक चुका सांपडावयास पाहिजेत. अशोकाच्या शहाबाजगढी व मान्सेरा येथील लेखांवरून तयार केलेला चित्रांक पाहिला असतां कोणासहि असें दिसून येईल कीं, ज्या लेखकास श आणि य, श आणि ल व भ आणि क यांतील भेद ओळखंता आला नाहीं, त्याला र आणि व, र आणि ह, र आणि त, ख आणि त, च आणि झ व छ आणि ज यांच्या मधीलहि फरक नीट न समजून त्या अक्षरांसंबंधांत त्याच्या हातून अनेक वेळां चुका होण्याचा संभव आहे. ण आणि न या अक्षरांत तर इतकें साम्य आहे कीं, ती अक्षरें वाचण्यांत अशा माणसाच्या हातून पदोपदीं चूक झाली पाहिजे. र्हस्व, दीर्घ, जोडाक्षरें, विसर्ग व हलन्त व्यंजन हीं लिहिण्याची खरोष्ठींत चांगलीशी सोय नसल्यामुळें सदोष लिपींत लिहिलेल्या संस्कृत भाषेंतील पुराणांची नक्कल करीत असतांना अशा अडाणी नक्कल करणारांकडून अक्षरागणिक चुका व्हावयास पाहिजे होत्या. परंतु त्या तशा झालेल्या दिसून येत नाहीत हाच पार्गिटेर साहेबांच्या सिद्धांताविरूद्ध सबळ पुरावा आहे. सदोष लिपि व असंस्कृत लोक यांच्या कैचींत संस्कृत भाषा सांपडली म्हणजे तिची कशी काय दुर्दशा होते याचें प्रत्यक्ष उदाहरण म्हटलें म्हणजे राजपुतान्यांतील जुन्या पद्धतीच्या पाठशाळांत अजूनपर्यंत पढविण्यांत येत असलेले कातंत्र व्याकरणांतील संधिविषयक पांच पाद होत. त्या शाळांत हल्ली गुरूजी विद्यार्थ्यांस जें कांही पढवितात त्याची कातंत्र व्याकरणांतील मूळ पाठाशीं तुलना केली असतां, पार्गिटेर साहेबांच्या अनुमानांतील एकांगीपणा सहज ध्यानांत येईल. ह्या संधिविषयक पांच पादांचा भ्रष्टपाठ व मूळपाठ पुढें दिल्याप्रमाणें आहे.
भ्रष्टपाठ:- सीधो बरना समामुनाया| चत्रु चत्रु दासा दडसैवारा दसे समाना | तेसुदुध्यावरणो नसीसवरणो| पुरवो हंसवा |पारो दीरघा| सारो वरणा विणज्यो नामी| ईकरादेणी संधकराणी| कादीनावू विणज्यो नामी| ते विरघा पंचा पंचा|
मूळपाठ:- सिध्दो वर्णसमाभ्राय| तत्र चतुर्दशादौ स्वरा:| दश समाना: | तेषां द्वौ द्वावन्योन्यस्य सवर्णौ | पूर्वौ र्हस्व: | परो दीर्घ: | स्वरोऽवर्णवर्जो नामी | एकरादीनि सन्ध्यक्षराणि | कादीनि व्यंजनानि | ते वर्गा: पत्र्च पत्र्च |
बौद्ध लोकांचे प्राकृत भाषेंतील धर्मग्रंथ मात्र खरोष्ठी लिपींत लिहिले गेले असल्याचा पुरावा मिळतो. हिड्डा येथील स्तूपांत सांपडलेल्या मातीच्या भांड्यामध्ये खरोष्टींत लिहिलेलीं कांही भूर्जपत्रें होतीं. तीं फारच पुरातन असल्यामुळें अगदीं जीर्ण झालेली होती [ अँरिआना अँटिका, पा, ५९-६०,८४,९४,१११,११६. मातीच्या भांड्यावरील लेखांत सं. २८ दिला आहे ( ज, रॉ. ए. सो; इ. स. १९१५, या ९२ व त्याच्या समोरची प्लेट). पं. ओझा यांचें अनुमान बरोबर असल्यास मृत्तिकापात्रावरील लेखाचा काळ (२८+७८= इ. स. १०६) निघतो]. शिवाय इसवी सनाच्या तिसर्या शतकाच्या सुमाराची ‘धम्मपदा ’ ची एक प्रत खोतान येथें मिळाली आहे. पण ती बरीच अलीकडची असल्या कारणानें तिच्या मधील खरोष्ठी लिपींत स्वराच्या बाबतींत कांही सुधारणा झालेली दृष्टीस पडते [ बु; इ. पँ; पा. १८-१९ ].