प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
खरोष्ठीचें अरमइक लिपीशीं सादृश्य:- हिंदुस्थानाबाहेरील कोणत्या तरी लिपींत खरोष्ठीचें मूळ शोधून काढण्याच्या दृष्टीनें आपण विचार करूं लागलों म्हणजे प्रथमारंभीच खरोष्ठी व फारशी या दोन लिपींतील लेखनपद्धतींचे सादृश्य आपल्या ध्यानांत आल्यावाचून रहात नाहीं. या दोन्हीहि लिपीत उजवीकडून डावीकडे लिहीत जाण्याचा प्रघात असल्यामुळें सेमेटिक लिपीपासूनच खरोष्ठीची उत्पत्ति झाली असली पाहिजे हें निर्विवाद आहे. खरोष्ठी व समेटिक अक्षरांचा तुलनात्मक अभ्यास केला असतां असें आढळून येतें कीं, खरोष्ठी लिपीतील कित्येक अक्षरांचे सदृश उच्चारांच्या अरमइक अक्षरांशी बरेंच साम्य आहे. खरोष्ठींतील “ ब ” “ द ” “ व ” “ य ” “ न ” आणि “ र ” या सहा अक्षरांचे सक्करा, पापायरस व तक्षशिला यांपैकी कोणत्याहि लेखांतील अनुक्रमें बेंथ्, दालेथ्, ‘वाव्, योध्, नून् व रेश् या सहा अक्षरांशी इतकें सादृश्य आहे कीं तें कोणासहि नाकबूल करतां येणार नाहीं. खरोष्ठीतील ‘ क ’ हें व्यंजन सक्कारा लेखांतील “ काफ् ” व तक्षशिलालेखांतील “कॉफ” या दोन अक्षरांच्या रूपांच्या संमिश्रणानें झालेलें दिसतें. खरोष्ठींतील “ज” सक्कारादि लेखांतील “जाइन” अक्षरासारखा आहे व तिच्या ‘स’ चें सक्कारा व तक्षशिला येथील लेखांतील त्सेध या अक्षराशी साम्य आहे. पंडित ओझा यांनां ‘ह’ या व्यंजनीचेहि तक्षशिलाच्या लेखांतील ‘हे’ ह्या अक्षराशीं कांही अंशी साम्य दिसतें. व ‘ष’ ला जर आपण उलटा केला तर तो पापायरस व सक्कारा लेखांतील “शिन्” या अक्षराशी मिळतो असें ते म्हणतात. परंतु या दृष्टीनें जर आपण पाहूं लागलों तर खरोष्टीतील ‘प’ ची डावी बाजू उजवीकडे नेली असतां त्याचें सक्कारा व तक्षशिला लेखांतील ‘पे’ शी, व ‘ग’ उलटा केला असतां त्याचें सक्कारा, पापायरस व तक्षशिला यांपैकी कोणत्याहि लेखांतील ‘गिमेल’ शीहि सादृश्य असलेलें आढळून येईल, सारांश, खरोष्टीच्या उपयोगी पडण्यासारख्या अरमइक लिपींतील १८ वर्णांपैकी ९ वर्णांचें सदृश उच्चारांच्या खरोष्टींतील वर्णांशी निर्विवाद साम्य आहेच; पण थोडीशी ओढाताण करून आणखीहि चारांचें खरोष्ठीतील अक्षरांशी साम्य दाखवितां येतें.