प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
पाश्चात्त्य पंडितांचीं मतें:- मॅक्समुल्लर यानें ‘हिस्ट्री ऑफ एंशंट संस्कृत लिटरेचर’ नावाचा जो ग्रंथ लिहिला त्यांत म्हटलें आहे की, पाणिनीच्या परिभाषेमध्यें असा एकहि शब्द नाही कीं ज्यावरून भरतखंडातील लोकांनां पूर्वीपासून लेखनकला अवगत होती असें आपणास अनुमान काढता येईल. पाणिनी ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकांत होऊन गेला असें या विद्वानाचे मत असल्यामुळे ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकापर्यंत हिंदुस्थानात लेखनकला अस्तित्वांत आली नव्हती असें या विधानावरून ध्वनित होतें (अलाहाबाद प्रत पान २६२ पहा). बर्नेलने आपल्या ‘साउथ इंडियन पॅलिऑग्राफी’ नामक पुस्तकांत प्रतिपादन केलें आहें की, हिंदुस्थानांतील लोक फिनीशियन लोकांपासून लेखनकला शिकले. त्याच्या मतें या फिनीशियन लोकांचा ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकाच्या अगोदर हिंदुस्थानात प्रवेश झाला नसल्यामुळें त्यापूर्वी येथील लोकांस लिहिण्याची कला ठाऊक नव्हती. (पान ९ पाहा). सुप्रसिद्ध प्राचीनवस्तुशोधक जो बुहलर त्याला उपरिनिर्दिष्ट दोन्हीही पंडितांची मतें मान्य नाहीत. भरतखंडातील ब्राह्मी लिपीचें वर्ण सेमेटिक अक्षरांपासून, तयार करण्यांत आले असा त्याने सिद्धांत काढला असून ख्रिस्तपूर्व ८०० च्या सुमारास हिंदुस्थानांत प्रवेश झाला असावा असें त्यास वाटते. पण आणखी कांही प्राचीन लेख उपलब्ध होऊन हिअरेटिकपासून (मिसर देशांतील पुरोहिती लिपीपासून) फिनीशियनची उत्पत्ती ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकाच्याहि अगोदर झाली असल्याचे जर पुढेंमागें सिद्ध करतां आलें, तर ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकांत, किंबहुना त्याच्याहि पूर्वी हिंदुस्थानात लेखनकलेचें अस्तित्व होंतें ही गोष्ट मला कबूल करावी लागेल असें त्यानें म्हटलें आहे (बुहलर ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर पान १७ पहा).