प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.             
 
प्राचीन लिपिशास्त्र:- अत्यंत प्राचीन काळापासून लेखनकलेच्या बाबतींत कोणत्या प्रकारचें साहित्य उपयोगांत आणलें गेलें याचा इतिहास अत्यंत मनोरंजक आहे. प्राचीन लिपिशास्त्र व प्राचीन अंकितलेखशास्त्र असे प्राचीन लिपिशास्त्राचे दोन निरनिराळे भेद होण्यास लेखनसाहित्याची प्रकारभिन्नताच कारणीभूत झाली आहे. शिला, धातू किंवा असेच दुसरे टिकाऊ पदार्थ यांवर कोरलेल्या प्राचीन लेखांचा अभ्यास करण्याकरितां प्राचीन अंकितलेखशास्त्र निर्माण झालें. प्राचीनलिपिशास्त्रांत वाङ्मयात्मक, धर्मविषयक इत्यादि विविध स्वरूपाच्या लेखांचा समावेश होत असून त्या शास्त्रांतील लेखांसाठी उपयोगांत आणलेलें लेखनसाहित्य म्हटलें म्हणजे कापड किंवा लांकडाची फळी यांसारखे लेखनपट, व शंकु किंवा वेत अगर बोरू यांसारख्या पदार्थांपासून केलेल्या लेखण्या हें होय.