प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
बुहलरच्या सादृश्यविवेचनांतील अतिकल्पना:- बुहलर यानें मूळ अक्षरांत जेवढे फेरफार करावयास सांगितले आहेत तेवढे फेरफार करुन फिनीशियनपासून ब्राह्मीचीच काय पण कोणत्याहि एता लिपीपासून वाटेल त्या दुसर्या लिपीची उत्पत्ति सहज दाखवितां येईल. उदाहरणार्थ, तक्षशिलेच्या लेखांतील अरमइक अक्षरांपासून किंवा हल्लींच्या इंग्रजी रोमन लिपीच्या अक्षरांपासून बुहलरचे नियम लावून ब्राह्मीची अक्षरें अगदी सहज घडवितां येतात हें पंडित ओझा यांनी दाखविलें आहे.
फिनीशियनपासून ब्राह्मीची उत्पत्ति दाखविण्यास जेवढे प्रयास पडतात त्यांपेक्षांहि कमी प्रयासांत तक्षशिलेच्या अरमइक अक्षरांपासून किंवा इंग्रजी रोमन अक्षरांपासून ब्राह्मी अक्षरांची उत्पत्ति दाखवितां येत असतांहि जर ब्राह्मी लिपि अरमइक किंवा लिपीपासून निघाली असें म्हणतां येत नाहीं, तर ती फिनीशियनपासून निघाली असें म्हणावयास बुहलरला तरी जास्त काय आधार आहे ? वास्तविक पाहिलें असतां एक गिमेळ अक्षर खेरीज करून फिनीशियनमधील दुसर्या कोणत्याहि अक्षराचें ब्राह्मीतील सदृश उच्च्चाराच्या अक्षराशीं साम्य नाहीं. व म्हणूनच बुहलर याचें ‘हिंदुस्थानातील ब्राह्मी लिपीची उत्पत्ति ’ हें पुस्तक छापून प्रसिद्ध झाल्यावरहि मागें सांगितल्याप्रमाणें र्हीस डेव्हिड्स यास आपलें ‘बुद्धिस्ट इंडिया’ पुस्तक लिहितांना असें म्हणणें भाग पडलें की ब्राह्मी लिपि उत्तर सेमेटिक किंवा दक्षिण सेमेटिक यांपैकी कोणत्याहि लिपीपासून निघाली नाही ‘ एन्सायक्लोपीडिआ ब्रिटानिका ’ मध्यें तर असें स्पष्ट म्हटलें आहे कीं, बुहलरचा निबंध कितीहि विद्वत्ताप्रचुर असला तरी त्यापासून ब्राह्मीच्या उत्पत्तीविषयी निर्णयात्मक असें कांहीच ठरू शकत नाही [ आवृति ९, पु. ३३, पान ९०३ ].
फिनीशियन लिपीची उत्पत्ति ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकाच्या सुमारास झाली असें मानण्यांत येतें. अशोकाच्या शिलालेखांत ब्राह्मीप्रमाणेंच दुसर्या ज्या एका खरोष्टी लिपीचा उपयोग केलेला आढळतो तिची उत्पत्ति सेमटिक लिपीपासून झाली असल्यामुळें फिनीशियन ही तिची आद्यजननी आहे. अशा स्थितींत जर उत्पत्ति फिनीशियनपासूनच झाली असती, तर ब्राह्मीपासून निघालेल्या गुप्त व तेलगू-कानडी ह्या दोन लिपींत ज्याप्रमाणें इसवी सनाच्या पांचव्या सहाव्या शतकांत बरेंचसें सादृश्य आढळून येते त्याचप्रमाणें ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांत-म्हणजे अशोकाच्या वेळीं-ब्राह्य व खरोष्टी लिपीतहि आढळून यावयास हवें. परंतु ज्या अर्थी अशोकाच्या लेखांतील ब्राह्मी व खरोष्टी लिपीत कांहीच साम्य दिसून येत नाही त्या अर्थी त्या दोन्ही लिपींचें मूळ एक नसलें पाहिजे हें उघड आहे.