प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
ब्राह्मी लिपीच्या वर्णाची हिअरेटिक, फिनीशियन इत्यादि लिपींच्या वर्णांशी तुलना:- पाश्चात्त्य पंडित म्हणतात त्याप्रमाणें ब्राह्मी लिपीचा हिअरेटिक, फिनीशियन वगैरे लिपीशीं जर खरोखरच कांही संबंध असला, तर रोमन लिपीचें फिनीशियन लिपाशीं जितकें साद्दश्य दिसून येतें त्याहून किती तरी अधिक साद्दश्य ब्राह्मी लिपींचें हिअरेटिक, फिनीशियन आदिकरून लिपीशीं दिसून आलें पाहिजे. कारण प्रस्तुत रोमन लिपि व फिनीशियन लिपि यांच्या काळांमध्यें अजमासें अडीच हजार वर्षांचें अंतर आहे. परंतु वरील लिपींपैकी सर्वांत जुनी हिअरेटिक लिपि व अशोकाच्या लेखांतील ब्राह्मी लिपि यांच्या दरम्यान तर अडीच हजार वर्षांच्या एकतृतीयांशाइतका काळहि लोटला नसेल. मागून जन्मास आलेल्या सेमेटिक लिपी व अशोकाच्या पूर्वीचीहि ब्राह्मी लिपि यांचा संबंध त्याहूनहि पुष्कळ जवळचा दिसून येईल. अशा स्थितींत ब्राह्मी लिपीच्या वर्णांचें या लिपीतील सदृश उच्चाराच्या वर्णांशीं पुढें दिल्याप्रमाणें साम्य आढळून येतें. हिअरेटिक, क्युनिफॉर्म व खरोष्टी या लिपीचें ब्राह्मी लिपीशीं कांहीच साम्य नाही; फिनीशियन हिमिअरिटिक व अरमइक यांच्या वर्णांतील गिमेल हें अक्षर ब्राह्मीच्या ग ह्या अक्षरासारखें आहे: व प्राचीन ग्रीक लिपीची गॅमा व थीटा ही अक्षरें ब्राह्मीच्या ग व थ या अक्षरांशी मिळतात. ब्राह्मी लिपींतील वर्णांचें हिअरेटिक, फिनीशियन, हिमिअरिटिक, अरमइक व खरोष्टी या लिपीतील सदृश उचारांच्या वर्णांशी फारच थोडें साम्य असल्यामुळें, ब्राह्मी लिपीतील फक्त १८ च वर्णांचे उच्चार असलेल्या फिनीशियन लिपीतील २२ वर्णांपासून ब्राह्मीच्या २२ अक्षरांची बुहलर यानें जी उत्पत्ति काढली ती कितपत सयुक्तिक आहे हें कोणासहि सहज सांगतां येण्यासारखें आहें.
वरील विवेचनावरून कोणाच्याहि मनांत अशी शंका येईल कीं, फिनीशियन लिपीतील एका गिमेल अक्षराशिवाय दुसर्या कोणत्याही अक्षराचें ब्राह्मी लिपींतील सदृश उच्चाराच्या अक्षराशीं साम्य नसतांना, बुहलर यानें फिनीशियनपासून ब्राह्मीची उत्पत्ति दाखविली तरी कशी? या शंकेचें निरसन करण्याकरितां बुहलरच्या ग्रंथात फिनीशियन व ब्राह्मी लिपींच्या अक्षरांमध्यें कोणत्या रीतीनें साम्य दाखविलें आहे यासंबधीं थोडी माहिती खाली दिली आहे.