प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.       

ब्राह्मीच्या वर्णमालेचा पर्शुभारतीय काळाशीं संबंध:- त्याप्रमाणेंच अवेस्ता भाषेशीं तुलना केली असतां आपणांस असे दिसून येंतें की, अवेस्ता भाषेचा वर्णानुक्रम ब्राह्मी वर्णानुक्रमाप्रमाणेंच आहे. व ती भाषा किंचित् वर्णविपर्यय केला असतां वैदिक संस्कृत भाषेप्रमाणेंच आहे, हे अनेक शब्दांच्या साम्यावरून दिसून येतें. वर्णमालेत एक र्‍हस्व ए जास्त आहे. व औ लृ, विसर्ग, छ्, त्र्, टवर्ग, भ्, ल् व ल् हीं अक्षरें नाहीत; बाकी ऊष्मवर्ण श्, ष्, स्, हे आहेत.

ही लिपि अर्थातच उजवीकडून डावीकडे लिहावयाची आहे. व देव हा शब्द राक्षसवाची मानणार्‍यांनीं व अनेक बाबतींत उलट कृति करणार्‍यांनीं हा व्युत्क्रम स्वीकारणें साहजिकच दिसतें.