प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
बौद्ध ग्रंथातील लेखनकलेसंबंधीं उल्लेख:- ‘ विनय ’ ‘ सुत्त’ (सूत्र) व ‘ अभिधम्म ’(अभिधर्म) असे बौद्ध ग्रंथांचे तीन विभाग असून त्यांपैकी प्रत्येकास ‘पिटक’ असें म्हणतात. एकेका पिटकांत अनेक ग्रंथ आहेत; व तीनहि पिटकांनां मिळून त्रिपिटक अशी संज्ञा आहे. यांतील ‘ विनय’ पिटकांत बौद्ध साधूंचा आचार कसा असावा हें सांगितलें आहे. या आचारांचा उपदेश खास गौतम बुनेच आपल्या शिष्ट मंडळींस केला असून आपल्या छात्रवर्गापैकी उपाली हा या विषयांत उत्तम तरबेज झाला आहे अशी स्वत: बुनेंच त्याची प्रंशसा केली होती. बुद्धांचें निर्वाण ज्या वर्षी झालें त्याच वर्षी, म्हणजे ख्रिस्तपूर्व ४८७ च्या सुमारास, बुचा मुख्य शिष्य काश्यप याच्या इच्छेवरुन मगध देशाचा राजा अजातशत्रु याच्या मदतीनें राजगृहाजवळ सप्तपर्ण गुंफेचेया विस्तृत पटांगणांत बौचा प्रथम संघ एकत्र झाला होता. त्या प्रंसगी उपालीनें तेथे जमलेल्या ५०० ‘अर्हत्’ मंडळीनां (म्हणजे बड्या बड्या बौद्ध साधूंस) ‘ विनय ’ म्हणून दाखविला.
आत्महत्या प्रशंसा लेखन निषेध, कारकुनीच्या धंद्याची प्रतिष्टा.- ‘ विनय ’ संबधी ग्रंथात लेखनकलेची प्रंशंसा केली असून जर कोणी श्रमण आत्महत्येच्या प्रशंसापर कांही लेख लिहील, तर त्याच्या हातून त्यांतील अक्षरागणिक दुक्कत ( दुष्कृत ) होईल असें म्हटले आहे; व गृहस्थांच्या मुलांनां लिहिण्याचा धंदा हा सुखानें उपजीविका करण्याचा एक उत्तम मार्ग आहे असाहि त्यांत उल्लेख आला आहे (डे; बु. इं. पानें १०८-९). ओल्डेनबर्गच्या मतानें ‘ विनय ’ पिटकाचा कांही भाग ख्रिस्तपूर्व ४०० सालच्या पूर्वीचा असल्याविषयी पंडित ओझा यांनी आपल्या भारतीय प्राचीनलिपिमाला नामक ग्रंथात सांगितलें आहे (द्वितीयावृत्ति पान ४ पहा); परंतु जोपर्यत ‘विनय’ संबधी ग्रंथातील ज्या वचनांचा वर उल्लेख केला आहे त्यांच्या कालनिर्णयाचें ज्ञान आपणासं झालें नाहीं, तोंपर्यत उपरिनिर्दिष्ट वचनावरूनं आपणासं निश्चित असें कांहीच अनुमान काढतां येत नाहीं.
जातकांतील पुरावा:- बुनें सांगितलेल्या पूर्व जन्मींच्या कथांनां जातक अशी संज्ञा आहे. अशा सुमारे ५५० कथांचा २२ अध्यायांत संग्रह केलेला आहे. जातकांचें मूळ डॉ. फॉसबॉल यांनी रोमन लिपीत छापविलें असून यांतील ५४७ जातकांचें इंग्रजी भाषांतर प्रो. कॉवेल यांनी प्रसिद्ध केलें आहे.प्रत्येक कथेच्या आरंभी बुनें ती कथा कोणत्या प्रंसगाला अनुलक्षून सांगितली हें दिलें असून, ती संपूर्ण झाल्यावर पूर्व जन्मामध्यें त्या गोष्टीच्या काळी आपल्या वेळची कोणकोणती मनुष्यें कोण कोण होती याची उल्लेख करुन शेवटीं आपण तेव्हां कोण होतों हेंहि दिलें आहे. भरहूत येथें ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांतील एक स्तूप आहे. त्याच्या कठड्यांवर उपरिनिर्दिष्ट जातकांपैकी २१ जातकांतील चित्रें दिली असून, त्यांतील एकावर तर जातकांतील श्लोकाचा एक चरण जसाचा तसाच खोदविलेला सांपडतो. त्यावरून पंडित ओझा यांनीं बुचीं जातकें हीं ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकाच्या पूर्वीचीं असावीं असें निश्चित काढलें आहे. परंतु ह्या चित्रांवरून एवढेंच निश्चित सांगतां येईल की, भरहुतच्या कठड्यांवरील २१ जातकांच्या गोष्टी ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांत किंवा त्याच्याहि पूर्वी प्रचलित होत्या. त्यांशिवाय बाकीचीं जातकें देखील हल्लींप्रमाणेच त्या काळीं होती, किंवा या २१ जातकांचे पाठहि हल्लीं आहेत तसेच त्या काळीं होते असा सिद्धांत काढावयास आपणांस कांहीच आधार नाहीं. जातकांतील जिन राजांच्या व प्राचीन नगरांच्या उल्लेखांवरुन पंडित ओझा म्हणतात त्याप्रमाणें जातककारानें आपल्या गोष्टींत ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकांतील समाजाचें चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला असेल ( भारतीय प्राचीनलिपिमाला द्वितीयावृत्ति पान ५ पहा); पण ज्यानें शेवटीं जातकांचें संकलन केले त्यानें कांही भाग आपल्या मनचा घालून हें चित्र कदाचित् आपल्या वेळच्या समाजावरून काढलें असल्याचा पुष्कळ संभव असल्यामुळें, पंडित ओझा यांनी दिलेल्या जातकांच्या गोष्टींतील लेखनकलेच्या उल्लेखांच्या आधारावर ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकांत हिंदुस्थानांत लेखनकला प्रचलित होती असें निश्चयपूर्वक म्हणतां येत नाहीं.
अक्षरिका खेळ:- बौद्ध धर्मग्रंथ जो सुत्तंत (सूत्रांत) त्याच्या प्रथम खंडाच्या पहिल्या अध्यायांतील गौतमबुच्या संभाषणांच्या संग्रहास ‘ शील ’ (म्हणजे आचार कसा असावा त्याविषयीं उपदेश.) म्हणतात. बौद्ध लोक तो भाग स्वता: बुच्या तोंडाचाच आहे असें समजतात. पण र्हीस डेव्हिड्स यानें आपल्या ‘ बुद्धिस्ट इंडिया ‘ नांवाच्या पुस्तकांत तो ख्रिस्तपूर्व ४५० च्या सुमारास संकलित झाला असावा असें दाखविलें आहे. या ‘शील’ ग्रंथावरून असें दिसतें कीं, त्या भागाच्या संग्रहणकाळीं ‘ अक्खरिका ’ ( अक्षरिका ) नांवाचा एक खेळ समाजांत रुढ होता. या खेळांत एकानें दुसर्याच्या पाठीवर, किंवा आकाशात लिहिलेले अक्षर दुसर्याने ओळखावयाचें असे (ब्रम्हजाल सुत्त,१४; सामञ्ञ फलमुत्त,४९; डे; बु. इ: पान१०८). शीलांतील ह्या अक्षरिका खेळाच्या उल्लेखावरून मात्र, र्हीस डेव्हिहड्स याच्या काल निर्णयाच्या आधारावर ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकांत हिंदुस्थानांतील लोक, लेखनकलेस अनभीज्ञ नव्हते असें बेधडक म्हणतां येईल. या सिद्धांतास बडली व पिपरावा येथें सांपडलेल्या अशोकाच्या पूर्वीच्या दोन शिलालेखांनीहि पुष्टि मिळत असल्यामुळें त्याच्या सत्यतेबद्दल शंका घेण्याचें कांहीच कारण उरलें नाहीं.