प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
औदुंबरादि एतद्देशीय राजांच्या कारकीर्दीतील लेख:- आतांपावेतों सांगितलेल्या परद्वीपस्थ राजांशिवाय औदुंबरवंशी व कुनिंदवंशी एतद्देशीय राजांचीहि कांही नाणी सांपडली असून त्यांच्याहि एका अंगास प्राकृत भाषेंतील खरोष्ठी लिपींत लिहिलेले लेख आहेत. परंतु हीं देखील नाणीं पंजाबांतच सांपडली असल्यामुळें, प्राचीन काळी खरोष्ठी ही हिंदुस्थानांतील सार्वत्रिक लिपि नसून तिचा प्रकार फक्त या देशाच्या वायव्येकडील कांही भागांतच होता हें निर्विवाद सिद्ध होतें. त्याचरप्रमाणें खरोष्ठी लिपीचा परकीय राजांशी जो संबंध दिसून येतो त्यावरून एक तर तिची उत्पत्तीच मुळांत हिंदुस्थानाबाहेर झाली असावी किंवा निदान तिच्या मातृपदाचा तरी मान एखाद्या विदेशी लिपीस मिळाला असावा असें साहजिक अनुमान निघतें.