प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

नंतरचे प्रवक्ते - प्रवक्त्यांचें लिखाण हा जुन्या कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यांत यशया, थिर्मया, यहेज्केल व दुय्यम दर्जाचे बारा प्रवक्ते यांचा समावेश होतो. आमोस व होशेय यांच्यापासून पुढें ज्यांच्या नांवाची मालिका आहे त्यांचीं पुस्तकें तीन शतकें पुरीं होईपर्यंत पूर्ण तयार झालीं नव्हतीं. प्रवक्त्यांच्या चळवळीला मुख्य कारण राष्ट्रीय इतिहासांतील आणीबाणीचे प्रसंगच होत. हे प्रवक्ते अंशतः नैतिक सुधारणावादी, अंशतः धार्मिक उपदेशक आणि अंशतः  राजकीय सल्लागार असत. त्यांनीं एका भ्रष्ट लोकसमाजाला मानवीं कर्तव्यें, धार्मिक सत्य आणि राष्ट्रीय धोरण या संबंधाचीं ध्येयें शिकविलीं. पूर्वपरंपरागत सत्येंच त्यांनीं नवीन राष्ट्रीय परिस्थितीला लागू पडतील अशा स्वरूपांत लोकांपुढें मांडलीं. ईश्वराचें स्वरूप व त्याचे गुण; ईश्वराची मनुष्यासंबंधाची दयाळू दृष्टि; ईश्वर आणि मनुष्य यांचा परस्पर संबंध; धार्मिक सेवेचें खरें स्वरूप; ईश्वरी कृपा होण्याकरितां पश्चात्तापाची आवश्यकता; मनुष्याचीं निरनिराळ्या प्रकारची कर्तव्यें; दया, न्याय प्रामाणिकपणा आणि औदार्य या गुणानुसार करावें लागणारें वर्तन; गरीब दुबळ्यांच्या छळाबद्दल वाटणारा क्रोध; आणि भावी सत्ययुगांतील उच्च ध्येयें; इत्यादि गोष्टीचें विवेचन प्रवक्त्याबद्दलच्या लिखाणांत सांपडतें.

यशया - यशया या पुस्तकाचे दोन भाग स्पष्टपणें दिसतात. पहिला प्रकरणें १ ते ३९ व दुसरा ४० ते ६६. प्रकरण ४० ते ६६ हा भाग यशयाचा नाहीं. तो ५४० च्या सुमारास बाबिलोन सायरसनें जिंकून घेण्याच्या पूर्वीं थोडा काळ एका प्रवक्त्यानें लिहिलेला आहे. तो लिहिण्याचा उद्देश इस्त्रालाइट लोकांनां हद्दपारीच्या स्थितींत उत्तेजन देणें व केनन पुन्हां हसतगत होईल अशाबद्दल आश्वासन देणें हा होता. हें पुसतक यहुदी लोक ५३७ मध्यें हद्दपारींतून परत आल्यानंतर कांहीं काळानें लिहिलें गेलें असावें हें स्पष्ट दिसतें.

यिर्मया - यिर्मया हा प्रथम प्रवक्ता म्हणून जाहीररीत्या यशयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे ख्रि .पू. ६२६ मध्यें पुढें आला, आणि त्यानें आपलें शेवटलें भविष्यकथन ५८६ मध्यें यरूशलेम पडल्यानंतर लवकरच केलें. यिर्मया आपल्या देशबांधवांनीं काय पाप केलें होतें तें पूर्ण जाणून होता, आणि भविष्यकथन करण्यांत त्याचा मुख्य हेतु आपल्या देशबांधवांनां सुमार्गावर आणावें व त्यांच्यावर ओढवणारें अरिष्ट टाळावें हा होता. यिर्मया हा मोठा दयाळू आणि कोमल अंतःकरणाचा होता. या पुस्तकांतील बराचसा भाग चरित्रात्मक आहे. बाबिलोन पतन पावणार या संबंधाचे जें भविष्य आहे तें मात्र यिर्मयाचें नाहीं.

यहेज्केल - यहेज्केल हा ख्रि. पू. ५९७ मध्यें बाबिलोनियाला नेलेल्या कैद्यांपैकीं एक होता, व तो हद्दपार केलेल्या इतर पुष्कळ लोकांबरोबर टेल-एबिब नांवाच्या गांवी राहिला होता. त्याचीं भविष्यकथनें ख्रि. पू. ५९२-५७० यांच्या दरम्यान केलेलीं आहेत. या पुस्तकांतील पहिल्या २४ प्रकरणांचा विषय यरुशलेमचें निकटागामी पतन हा आहे. ही पतनाची गोष्ट ५८६ मध्यें घडली. हें पुस्तक अथपासून इतिपर्यंत एकाच माणसानें व तेंहि खुद्द यिर्मया या प्रवक्त्यानें लिहिलेलें आहे.