प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

दानीएलचें पुस्तक.- या पुस्तकाचा उद्देश पवित्र यहुदी लोकांनां, ख्रि .पू. १६८-१६५ मध्यें अँटायोकस इपिफानीझ याच्याकडून त्यांचा छळ चालू असतां त्याला धैर्यानें कसें तोंड द्यावें याबद्दल उपदेश करण्याचा आहे. १ ते ६ प्रकरणांत ख्रि. पू. ६०५ व ५३८ यांच्या दरम्यान बाबिलोनियाच्या दरबारीं दानीएलला जो अनुभव आला त्यासंबंधीचें वर्ण तत्कालीं प्रचलित असलेल्या दन्तकथेच्या आधारें केलें आहे. परमेश्वर आपल्या श्रद्धावान भक्तांनां संकटामध्यें ऐनवेळी येऊन कशी मदत करतो तें सोदाहरण सांगण्याकरितां हें पुस्तक लिहिलेलें आहे. ७ ते १२ प्रकरणांत अलेक्झाडर दि ग्रेट पासून अँटायोकस इपिफानीझ याच्यापर्यंतच्या राजांची हकीकत दिली असून त्यांत विशेषतः अँटायोकसनें यहुदी लोकांचा छळ कशा प्रकारें चालविला होता, याचें वर्णन आहे. हें पुस्तक दानीएलनें स्वतः लिहिलेलें नाहीं ही गोष्ट अंतर्गत पुराव्यावरून स्पष्ट दिसते. हें पुस्तक ख्रि .पू. १६८-१६५ च्या सुमारास झालें असावें.