प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता
कॅथोलिक पत्रें.- या पत्रांनां असें नांव पडण्याचें कारण तीं एखाद्या विशिष्ट चर्चला उद्देशून लिहिलेलीं नसून सामान्यतः सर्वच ख्रिस्ती लोकांस किंवा निदान ब-याच मोठ्या प्रदेशांतील ख्रिस्ती लोकांस उद्देशून लिहिलेलीं आहेत. याला २ व ३ योहान हीं पत्रें अपवाद आहेत. पत्रांच्या एका विशिष्टवर्गास हें नांव प्रथम ४ थ्या शतकाच्या आरंभीं युसीबिअसनें दिलेलें आढळतें. एक एकट्या पत्रास हें नांव ओरिजिनीझ यानें दिलें असून इ. स. च्या दुस-या शतकाइतक्या प्राचीनकाळीं या नांवाचा अशा प्रकारें उपयोग केलेला पहावयास मिळतो. उत्तरकालीन लॅटिन भाषेंत कॅथोलिक याचा अर्थ जवळ जवळ कॅनॉनिकल या शब्दाप्रमाणेंच होऊं लागला.
पॉलच्या पत्रांनीं जें कार्य केलें तेच कार्य उपर्युक्त वर्गातील पत्रांनीं पुढें चालविलें. १ पीटर (पेत्राचें पत्र) हें (पेत्राचें पहिलें) पत्र जर अस्सल असेल तर तें पॉल ह्याच्या आयुष्याच्या अखेरीच्या सुमारास लिहिलें गेलें असावें. हें पत्र आशियामायनरमधील ख्रिस्ती लोकांस त्यांचा छळ होऊं लागला असतां उपदेश करण्याकरितां व उत्तेजन देण्याकरितां लिहिलेलें होतें. जेम्स याचें [याकोबाचें] पत्र [तें अस्सल असलें तर] ख्रिस्ताच्या भावाच्या आयुष्याच्या अखेरी अखेरीस लिहिलेले असावें. हें पत्र त्यावेळींच लिहिलेलें असलें तर ते पॉल याचे लेख प्रत्यक्ष पाहून त्यावर टीका म्हणून लिहिलेलें नसून त्याच्या उपदेशाची जी कांहीं ऐकीव माहिती यरूशलेमला जाऊन पोहोंचत होती, तिच्यावर टीका करण्याकरितां लिहिलेलें होतें. अशा प्रकारचें वादविवाद नेहमीं वादांतील मंडळी एकमेकांचीं मतें बरोबर समजावून घेऊनच करतात असें नाहीं. जूडाचें [यहूदाचें]पत्र केव्हां व कोठें लिहिलें गेलें ते सांगतां येत नाहीं, व २ पीटर हें पत्र तर अस्सल आहे कीं नाहीं याचीच शंका येत. या पत्राच्या अस्सलपणाबद्दल लोकांस अगोदरपासूनच शंका होती असें दिसतें. त्यास कॅनॉनमध्यें स्थान मिळालें ते मोठ्या मुष्किलिनें मिळालें, व तेहि त्याच्या अस्सलपणाबद्दल कांहीं खात्रीलायक पुरावा उपलब्ध होता म्हणून नसून त्याचा कॅनॉनमध्यें अंतर्भाव केला जाण्यास चांगला कसून विरोध झाला नाही म्हणून होय.
१ पीटर व जेम्स या पत्रांसंबंधीं बोलतांनां देखील 'तीं अस्सल असलीं तर' अशीच प्रस्तावना केली पाहिजे. परंतु तसें करण्याचें कारण त्याचा अस्सलपणाबद्दल पुरेसा पुरावा उपलब्ध नाही हें नसून, त्यांच्या अस्सलपणाबद्दल पुष्कळांकडून शंका प्रदर्शित केली गेली आहे हें होय. १ पीटर हें पत्र प्राचीन काळापासूनच पीटरचें समजलें जात आहे. जेम्सच्या पत्राच्या अस्सलपणाबद्दल पुरावा १ पीटरच्या इतका भरपूर नसला तरी तो प्राचीन काळच्या लेखांतून आढळून येतो. ही दोन्हीहि पत्रें अस्सल असलीं तरी ज्यांचे स्पष्टीकरण करतां येत नाहीं अशा त्यांत कांहीं गोष्टी आहेत हें मात्र खोटें नाहीं. १ पीटर या पत्राचें पॉलच्या पत्राशी इतकें सादृश्य आहे कीं, या पत्रांतला बराचसा भाग सिल्व्हेनस याचा आहे असें प्रतिपादन करणारी उपपत्ति खरी असावी असें कधीं कधीं वाटूं लागतें. हें पत्र ज्यानें पॉलचीं एकदोन पत्रें वाचलीं होती इशा इसमानें लिहिलेलें असण्यापेक्षां पॉलच्या सांनिध्यांत ज्यानें बरेच दिवस काढले आहेत अशा त्याच्या मित्रानें लिहिलेले असणें अधिक संभवनीय आहे.