प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता
इतर बारा प्रवक्ते. - हे बारा प्रवक्ते मिळून एकच पुस्तक यहुदी लोक मानीत असत. या बारा प्रवक्त्यांपैकीं पहिले दोन आमोस व होशेय यांनीं अनुक्रमें ख्रि. पू. ७६० व ७४० या सुमारास उत्तरेकडील राज्यांत भविष्यकथन केलें. त्या दोघांनांहि उत्तरेकडील इस्त्राएल लोकांचा असुर लोकांकडून व्हावयाचा भावी नाश स्पष्ट कळून चुकला होता. त्या दोघांनींहि आपल्या देशबांधवांनां चांगल्या मार्गाला लावण्याचा बराच प्रयत्न केला. या दुय्यम प्रक्त्यांपैकीं इतरांचा काळ (कांहीचा अजमासें काळ) पुढीलप्रमाणें आहे; मीख, अजमासें ख्रि. पू. ७२५-६८०; सफन्या, अजमासें ६२५; नहूम ६०७ पूर्वीं; हबकूक, ६०५-६००; ओबद्या; ५८६ मध्यें यरुशलेमचा खाल्डी लोकांनीं नाश केल्यानंतर, हग्गै, ५२०; जखर्या, १-८.५२० व ५१८; मलाखी, अजमासें ४६०-४५०; योएल, ख्रि. पू. ५ व्या शतकांत; व योना ख्रि. पू. ४ थें शतक.
स्तोत्रें.- जुन्या कराराच्या या भागांत धर्मश्रद्धेच्या भावनांनीं थबथबलेले उद्गार बाहेर पडलेले आहेत. ईश्वरभक्तांनीं प्रेमभरित अन्तःकरणानें रचलेली हीं स्तोत्रें फारच सुंदर आहेत, व त्यांत निराशा व दुःख, पश्चात्ताप व विरक्ति, आशा व विश्वास, आनंद व कृतज्ञता, भक्ति व स्तुति, वगैरे अनेक भावना व्यक्त झालेल्या आहेत. हीं स्तोत्रें अर्थातच एका व्यक्तीची कृति नसून, अनेकांनीं भर घातल्यानें त्यांचा मोठा संग्रह जमला आहे. मासल्याकारतां कांहीं स्तोत्रें पुढें दिलीं आहेत.
नीतिसूत्रें.- हिब्रू लोकांच्या 'बोधपर वाङ्मय' म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीन पुस्तकांपैकीं हें एक आहे; व बाकीची दोन ईयोव (जॉब) व उपदेशक हीं होत. या पुस्तकांत सर्वत्र मनुष्यस्वभावासंबंधाचें तत्त्वज्ञान व कोठें कोठें भौतिक सृष्टिविषयक तत्त्वज्ञान आहे. या पुस्तकांच्या लेखकांनीं मनुष्यस्वभाव बारकाईनें निरीक्षण करून नैतिक, बोधपर अशीं पुष्कळशी सूत्रें सांगितलीं आहेत. त्यांचें स्वरूप पुढील उता-यावरून अवगत होईल. ती अर्थांत अनेकांनीं अनेक वेळीं भर घालून संगृहीत केलेली आहेत. हें नीतिसूत्रांचें पुस्तक ख्रि. पू. ४ थ्या शतकानंतर संपूर्ण स्वरूपांत तयार झालें.
ईयोब.- या पुस्तकांत मानवी जीविताच्या प्रश्नासंबंधाचा विचार केला आहे. आधुनिक भाषेंत बोलावयाचें म्हणजे धर्मविषयक तत्त्वानाचें हें पुस्तक आहे. ईयोब हा मोठा सच्छील मनुष्य होता; पण त्याच्यावर दुदैंवाचे अनेक घाले पडले. तेव्हां अर्थातच प्रश्न असा उद्भवला कीं, सदाचरणी मनुष्यावर दुःखें कां कोसळतात ? चांगल्या मनुष्याला भोगावे लागणारे हे हाल ईश्वराच्या न्यायीपणाशीं विसंगत नाहींत काय ? ईयोबच्या काळांत अशी उपपत्ति प्रचलित होती कीं, मनुष्याला जें दुःख भोगावें लागतें तें पापकर्माबद्दल शिक्षा म्हणून भोगावें लागतें. ही उपपत्ति खोडून काढण्याकरितां सदरहू पुस्तक लिहिलें आहे. ईयोबच्या मित्रांचें असें म्हणणें पडलें कीं, ईयोबच्या हातून कांहीं तरी मोठालीं पापकर्में घडलीं असलीं पाहिजेत. परंतु ईयोबनें स्वतः पूर्ण निष्पाप असल्याबद्दल प्रतिपादन केलें. अशा या मुद्दयावर हें सर्व पुस्तक रचलेलें आहे. ईयोबच्या या गोष्टीला प्राचीन दंतकथेचा आधार निःसंशय होता. हें पुस्तक हद्दपारीहून परत येण्यापूर्वीं बहुधा तयार झालें नव्हतें.
हिब्रू बायबलांत या पुस्तकानंतर पुढें पांच लहान पुस्तकें आहेत. तीं गीतरत्न, रूथ, विलापपंचक, उपदेशक आणि एस्तेर हीं होत. यांपैकीं पहिलें शलोमोनाचें 'गीतांचे गीत' या पुस्तकांतील काव्य फारच उत्कृष्ट आहे. शुद्ध निर्व्याज मानवी प्रेमाची गोडी आणि सामर्थ्य यांची स्तुति त्यांत केली आहे. हें ख्रि. पू. ४ थ्या किंवा ३ -या शतकापूर्वीं तयार झालें नसलें पाहिजे असें अलीकडील विद्वानांचें मत आहे. त्यांतील उतारे पुढें येतीलच. रूथ या सुंदर काव्यमय पुस्तकांत रुथ ही इस्त्राएल लोकांचा शत्रुदेश मोआब येथील रहिवाशी असून तिनें इस्राएल धर्म कसा स्वीकारला आणि दावीद याची पूर्वज होण्यास ती योग्य कशी मानली गेली याबद्दलची हकीकत आहे. रूथ या पुस्तकाच्या काळाबद्दलहि मतभेद आहे. पण तें ५ व्या शतकांतले आहे. असें अलीकडील विद्वानांचें मत ठरलें आहे. विलापपंचक हें पुस्तक यरूशलेम पडल्यानंतर तयार झालें असून त्यांत पांच शोकपर गीतें आहेत. यरूशलेम पतन पावल्यामुळें तेथील लोकांचे काय हाल झाले याचें वर्णन त्यांत आहे. हीं गीतें ख्रि. पू. ५८६ नंतर लवकरच तयार झालीं असलीं पाहिजेत. उपदेशक म्हणजे बोधपर वाङ्मयांतलें तिसरें पुस्तक; यांत अनेक नीतिपर वचनें आहेत. तीं कर्त्यावर आयुष्यांत दुःखकारक प्रसंग गुदरल्यामुळें मनाला स्फूर्ति होऊन त्यानें केलीं आहेत. सर्व मानवी प्रयत्नांचें फळ केवळ निराशा हें असतें, आणि समाजाकडून होणारें अन्याय्य वत्रन आणि चुका दुरूस्त करण्यास कोणीहि इसम व्यक्तिशः असमर्थ असतो, इत्यादि मतें त्यांत प्रतिपादिलेलीं आहेत. केवळ भाषेच्या दृष्टीनें पाहतां उपदेशक हें पुस्तक हिब्रू धर्मग्रंथांतल्या अगदीं अलीकडील पुस्तकांपैकीं असलें पाहिजे. हें बहुधा ग्रीक कालविभागांत ख्रि .पू. ३ -या शतकाच्या अखेरीच्या सुमारास लिहिलें गेलें असावें. एस्तेर ह्या पुस्तकांत यहुदी लोकांचा नाश करण्याचा हेमॅननें जो बेत केला होता त्यांतून यहुदी लोकांनां त्या रूपसंपन्न यहुदिणीनें कसें वाचविलें याचें वर्णन आहे. हें पुस्तक ख्रि .पू. ४ थ्या शतकांतलें असावे.