प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

अनुवाद (ड्यूटरॉनोमि).- ख्रि .पू. ७ व्या शतकांत मनासेह किंवा जोशाया या राजाच्या कारकीर्दींत 'जे-ई'नें लिहिलेली हकीकत 'अनुवाद' नामक भाग जोडून वाढविण्यांत आली. हे 'अनुवाद' म्हणजे मोझेसनें मरणापूर्वी मोआब येथें जमलेल्या लोकांस उद्देशूर केलेलीं भाषणें होत. मोझेसनें अखेर निरोप म्हणून एक भाषण केल्याची दंतकथा होती, तिच्याच आधारावर मागाहून सदरहू 'अनुवाद' एका लेखकानें लिहून तयार केले. याहवेह हा एकच देव इस्त्राएलाईट लोकांनां पूज्य असे व याच मताचा जोरानें पुरस्कार या अनुवादांत केलेला आहे. ईश्वरप्रीति हाच मानवी कर्तव्यांचा मुख्य झरा आहे, वगैरे अनेक सत्य सिद्धान्त या लेखकानें पुढें मांडले आहेत. धर्मशास्त्रविषयक नियम व त्यांनां आधारभूत असलेले नैतिक व धार्मिक हेतू यांचें विवेचन त्यानें केलें आहे. ईश्वरविषयीं प्रेम व पूज्य भाव असणें आणि आपल्या मानवबंधूंबद्दल सहानुभूति व कळकळ असणें हें ध्येय 'अनुवादांत' प्रतिपादिलें आहे.

 'अनुवाद' या पुस्तकाचा जुन्या करारामधील पुढील पुस्तकांवर फार परिणाम झाला; कारण 'अनुवाद' या पुस्तकांत तत्कालीन धार्मिक ध्येय व्यवस्थित भाषेंत पुढें मांडण्यांत आलें.

 पहिल्या सहा पुस्तकांत आतांपर्यंत सांगितलेल्या गोष्टींखेरीज आणखी एक विषय आहे. हा विषय म्हणजे लोकांनीं करावयाच्या धार्मिक विधीसंबंधाचा उर्फ भिक्षुकांच्या कार्यासंबंधाचा होय. ख्रि. पू. ५८६ मध्यें 'देवालय' नष्ट झाल्यानंतर भिक्षुकांनीं यज्ञ, शुद्धिकर्म वगैरे अनेक धर्मविधी प्राचीन काळीं कसे करण्यांत येत असत तें लिहून काढलें. हें लिखाण 'पी' या संक्षिप्त नांवानें प्रसिद्ध आहे. यांत इस्त्राएल लोकांच्या देवालयांत पूर्वकालीं पूजा अर्चा व इतर धार्मिक विधी कसे होत असत त्यांचें वर्णन आहे. त्यांत वस्तुस्थितिदर्शक माहितीबरोबर भिक्षुकीदृष्टीला आवडणा-या ध्येयात्मक गोष्टीहि आलेल्या आहेत. 'पी' च्या लेखनाचा नमुना जेनिसिस १. १-२. ४,१७; एक्झोडस ६.२-७.१३; लेव्हिंटिकस (सर्व पुस्तक); नंबर्स १. १-१०.२८ इत्यादि ठिकाणीं पाहावयास सांपडतो.
 
'पी' लिखाण तयार झाल्यानंतर लवकरच म्हणजे बहुधा ५ व्या शतकांत पूर्वींचे सर्व भाग एकत्र करून हल्लींच्या स्वरूपांतलीं पहिलीं सहा पुस्तकें पूर्ण तयार झालीं.