प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

कालवृत्तान्त, एज्रा व नहेम्या.- ही पुस्तकें ही ऐतिहासिक पुस्तकांपैकीं दुसरी मालिका होय. एज्रा व नहेम्या यांत कालवृत्तांत या पुस्तकांतील हकीकतीच्या पुढील हकीकत दिलेली आहे. १ कालवृत्तांत १-९ यांत यहुदी जातींतील प्रसिद्ध घराण्यांतल्या पुरूषांची हकीकत दिलेली आहे. १ कालवृत्तांत १०-२ कालवृत्तान्त ३६ यामध्यें शमुवेल व राजे या पुस्तकांतीलच उतारे दिलेले आहेत, व त्याबरोबर लेखकानें स्वतःचा मजकूरहि घातला आहे. एज्रा व नहेम्या हीं पुस्तकें याच प्रकारानें तयार केलेलीं आहेत. ग्रंथकर्त्यानें स्वतःलिहिलेल्या मजकुरामुळें ग्रंथकर्त्याच्या काळांतील परिस्थितीची कल्पना नीट करतां येते. ग्रंथकर्त्याच्या लेखनाचा नमुना १ कालवृंत्तान्त १५. १-२४, १६. ४-४२, २२. २-९, २ कालवृत्तान्त १३. ३-२२, १४. ६-१५.१५, १६. ७-११ इत्यादि ठिकाणीं पहावयास सांपडतो. नहेम्याचें पुस्तक त्यांतील ऐतिहासिक उल्लेखांवरून ख्रि. पू. ३०० च्या सुमारास झालें असावें असें दिसतें.

आतां प्राचीन यहुदी लोकांच्या वाङ्‌मयांतील कांहीं उतारे देऊन त्या वाङ्‌मयाचें स्वरूप स्पष्ट करतों. यहुदी लोकांचें प्राचीन वाङ्‌मय राष्ट्रीय वाङ्‌मय या नांवास जगांतील दुस-या कोणत्याहि प्राचीन वाङ्मयापेक्षां अधिक पात्र आहे. या जातीस दैवाच्या अनेक फे-यांतून परिवर्तन करावें लागलें, आणि त्या परिवर्तनांतील अनेक प्रसंगांचें सूचक किंवा साक्षीदार म्हणून त्यांचें वाङ्‌मय शिल्लक आहे. त्यांची अशी समजूत होती कीं त्यांच्यावर जे बरे वाईट प्रसंग आले त्यांचें कारण त्यांचें चांगल्या वर्तणुकीस सोडून असलेलें वर्तन होय. त्यांचा आचार कसा असावा, तर मोश्याला परमेश्वरानें जसा सांगितला असेल तसा. परमेश्वरानें मोश्याला काय सांगितलें तें लेवीय म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकरणांत घातलें आहे.

''परमेश्वरानें मोश्याला सांगितलें कीं, ज्या कशाला खोड आहे तें अर्पूं नका. कांतर तें तुमच्यासाठीं मान्य होणार नाही. आणि कोणी नवस फेडण्यासाठीं किंवा खुशीनें दान करण्यासाठीं गुरांतला किंवा मेढरांतला शात्यर्पणाचा यज्ञपशु परमेश्वराला अर्पितो तर तो मान्य होण्यास निर्दोष असावा; त्याला कांहीं खोड नसावी''. (२२.२० व पुढें). हा नियम भारतीय श्रौतविधींतील यज्ञिय पशूच्या वर्णनाची आठवण भारतीयांस करून देईल.

लेवीय प्रकरणांत इस्त्राएल लोकांनीं कोणते सण, उत्सव वगैरे पाळावेत, याविषयी नियम दिले आहेत. त्यांतच पुढें कांहीं नैतिक नियम आहेत. त्या नियमांचा ख्रिस्ताच्या उपदेशाशीं विरोध दाखवून ख्रिस्ताचा उपदेश उच्च त-हेचा अशी मांडणी आजचे ख्रिस्ती करतात. यासाठीं तो प्रसिद्ध उल्लेख अवतरणार्ह आहे.

 ''ज्याचा बाप मिसरी होता असा. इस्त्राएली स्त्रीचा पुत्र इस्त्राएलाच्या संतानांमध्यें बाहर गेला, आणि त्या इस्त्राएलीचा पुत्र व एक इस्त्राएली माणूस छावणींत भांडूं लागले. तेव्हां इस्त्राएली स्त्रीच्या पुत्रानें परमेश्वराच्या नामाची निंदा करून शिवी दिली, मग त्यांनीं त्याला मोश्याकडे आणिलें; त्याच्या आईचें नांव तर शलोतीथ, ती दानाच्या वंशांतला दिब्री याची कन्या होती. आणि परमेश्वराचा ठराव त्यांस कळावा म्हणून त्यांनीं त्याला बंदांत ठेविलें.

 ''मग परमेश्वरानें मोश्याला सांगितलें कीं, ज्यानें शिवी दिली त्याला छावणीच्या बाहेर घेऊन जा, आणि सर्व ऐकणा-यांनीं आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावे, मग सर्व समुदायानें त्याला धोंडमार करावा. आणि इस्त्राएलाच्या संतानांस असें सांग कीं, जर कोणी मांणूस आपल्या देवाला शिवी देईल तर त्यानें आपला पापाचा भार सोसावा. म्हणजे जो परमेश्वराच्या नामाची निंदा करतो त्याला जिवें मारावें; सर्व समुदायानें त्याला धोंडमार करावा, जसा देशस्थ तसा विदेशी जो कोणी त्या नामाची निंदा करितो त्याला जिवें मारावें. आणि मनुष्य कोणत्याहि मनुष्याला जिवें मारील तर त्याला जिवे मारावेंच. आणि पशूला जो जिवें मारील त्यानें पशूबद्दल पशु देऊन फेड करावी. आणि कोणी आपल्या शेजा-याला अपकार करील तर जसें त्यानें केलें तसें त्याला करावें. मोडण्याबद्दल मोडणें, डोळ्याबद्दल डोळा, दांताबद्दल दांत. कोणी माणसाला अपकार करील तसा त्याला करावा. आणि पशूला जो मारील त्यानें त्याची फेड करावी, आणि जो मनुष्याला मारील त्याला जिवें मारावेंच. तुम्हांस एक न्याय असावा. जसा देशस्थ तसा विदेशी असावा, कां कीं, मी परमेश्वर तुमचा देव आहें. मग मोश्यानें इस्त्राएलाच्या संतानांस सांगितलें, तेव्हां त्यांनीं शिवी देणा-याला छावणीच्या बाहेर काढून घोंड्यांनीं त्याला मारिलें; मोश्याला आज्ञा दिली त्याप्रमाणें इस्त्राएलाच्या संतानांनीं केले.'' (लेवीय, अ. २४ १० -२३).

वरील उता-यावरून यहुद्यांची आपल्या देवावरील श्रद्धा व्यक्त होते. त्या वेळेच्या यहुदी लोकांस एकेश्वरवादी असें म्हणतां येत नाहीं. कांकीं देव व दुस-याचें देव हा भाव त्यांच्यांत होता. आपला देव खरा, आपली उपासना पद्धति खरी अशी भावना त्यांच्यांत असून त्याविषयीं लोकांच्या मनांत श्रद्धा कायम असावी याबद्दल त्यांची खटपट असे.

सामान्य मनुष्य देवाच्या निवडणुकींच्या बाबतींत बराच निःपक्षपाती असतो. जो नवसाला पावेल तो देव खरा, आणि तोच पूज्य, अशी भावना सर्व ठिकाणीं दृष्टीस पडते. ग्रीक लोकांस आपले देव मान्य होते व अन्य स्थलांतील देवताहि मान्य होत्या. ग्रीक जेथें जात तेथें ते स्थानिक देवतेची पूजा करीत.

या प्रवृत्तीला ग्रीक अधिका-यांनीं उत्तेजनच दिलें. कांकीं या पद्धतीमुळें ग्रीक वसाहत करणारे व स्थानिक लोक यांचें एकीकरण झालें.

इस्राएल लोक स्वतःचे देव सोडून दुस-या देवांची पूजा करतात याबद्दल त्यांचा निषेध जुन्या करारांत जागोजाग दृष्टीस पडतो. तसेंच ते अन्यजातिविवाहास देखील विरुद्ध होते.

इस्त्रायली स्त्रीचा पुत्र यहुदी लोकांच्या देवांची निंदा करतो म्हणून त्यास धोंडमार करविला आहे. तसेंच यहुदी लोक इतर देशांतील स्त्रियांशीं विवाह करून अन्य देवतांच्या उपासनोस लागले म्हणून त्यांची निंदा केली आहे.

अनुवाद हें पुस्तक लोकांवर परिणामकारी झालें म्हणून सांगितलेंच आहे. या पुस्तकांत नियोगाची म्हणजे विधवेनें देवरापासून पुत्रोत्पत्ति करून घेण्याची चाल उपदेशिली आहे.

''भाऊ एकत्र राहतात, आणि त्यांतल्या एकाला पुत्र नसतां मरण आलें तर मेलेल्याची बायको बाहेरल्या परक्या पुरूषांची होऊं नये, तिच्या दिरानें तिजपाशीं जावें व तिला बायको करून तिजजवळ दिराचें कार्य करावें; आणि असें व्हावें कीं, तिला जो पहिला पुत्र होईल तो त्या मेलेल्या भावाच्या नांवानें असावा, असें त्याचें नांव इस्त्राएलांतून पुसलें न जावें. आणि तो पुरूष आपली भावजय करून घ्यायला न इच्छील तर त्याच्या भावजयीनें वेशींतल्या वहिलांकडे जाऊन म्हणावें, माझा दीर आपल्या भावाचें नांव इस्त्राएलांत उठवायास पाहतो, म्हणजे तो मजशी दिराचें कार्य करीत नाहीं. मग त्याच्या नगरच्या वडिलांनीं त्याला बोलावून सांगावें, आणि जर तो उभा राहून म्हणाला, मी इला करून घ्यावयास इच्छित नाहीं; तर त्याच्या भावजयीनें वडिलांच्या देखतां जाऊन त्याचा जोडा त्याच्या पायांतून काढून त्याच्या तोंडावर थुंकून उत्तर द्यावें जो मनुष्य आपल्या भावाचें घर बांधीत नाहीं त्याशीं याप्रमाणें करावें'' (अनुवाद, अ.२५).

  अनुवादांतील विधिनिषेधविषयक आणखी एक उता-याकडे लक्ष देऊं.

''परमेश्वराला ओंगळ, कारागिराच्या हातांचें काम अशी कोरींव किंवा ओतींव मूर्ति जो कोणी करून गुप्त ठिकाणीं ठेवतो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं उत्तर करून आमेन म्हणावें.

''जो आपल्या बापाला किंवा आईला हलकें मोजतो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं आमेन म्हणावें.

''जो आपल्या शेजा-याची शिवेची खूण सारितो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं आमेन म्हणावें.

''जो आंधळ्याला वाटेंतून वहकवितों त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं आमेन म्हणावें.

''प्रवासी, अनाथ व विधवा यांचा न्याय जो विपरीत करतो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं आमेन म्हणावें.

''जो आपल्या बापाच्या बायकोपाशीं निजतो त्याला शाप असो; कारण तो आपल्या बापाचा पदर काढतो; आणि सर्व लोकांनीं आमेन म्हणावें.''

''जो कोणत्याहि पशूजवळ निजतो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं आमेन आमेन म्हणावें.''

''जो आपली बहीण, आपल्या बापाची कन्या किंवा आपल्या आईची कन्या इजपाशीं निजतो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं आमेन म्हणावें.

''जो आपल्या सासूपाशीं निजतो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं आमेन म्हणावे.''

''जो आपल्या शेजा-याला गुप्त मार देतो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनीं आमेन म्हणावें.

''जो निर्दोष रक्ताच्या जणाला मारावयास लांच घेतो त्याला शाप असो; आणि सर्व लोकांनी आमेन म्हणावें.'' [अनुवाद पृ.२७]

न्यायाधीश या पुस्तकांतील मागें उल्लेखिलेला अन्यदेवपूजनिषेघाचा उतारा येणें प्रमाणें:-  

''११ इस्त्राएलाच्या वंशांनी बाल देवाची सेवा करून परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केलें. १२ आणि त्यांनीं आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर, ज्यानें त्यांस मिसर देशांतून आणिलें, त्याला टाकून अन्य देव म्हणजे आपल्या चहूंकडल्या लोकांचे देव, यांच्यामागे लागून त्यांचें भजन करून परमेश्वराला चिडविलें. १३ असें त्यांनी परमेश्वराला टाकून बाल व अष्टारोथ यांची सेवा केली. १४ मग परमेश्वरानें इस्त्राएलांवर रागें भरून त्यांस लुटणारांच्या हातीं दिलें, आणि त्यांनीं त्यांस लुटलें; आणि त्यानें त्यांस त्यांच्या चहूंकडल्या शत्रूंच्या हातीं विकत दिलें, आणि तेव्हांपासून त्यांच्यानें आपल्या शत्रूंच्या समोर उभें राहवलें नाहीं. १५ जेथें जेथें ते जात तेथें परमेश्वराचा हात वाइटासाठीं त्यांवर असे, परमेश्वरानें त्यांस सांगितलें होतें आणि परमेश्वरानें त्यांशीं शपथ केली होती तसें; आणि त्यांस फार संकट होई. १६ तेव्हां परमेश्वर त्यांसाठीं न्यायाधीश उत्पन्न करी आणि त्यांनीं त्यांस त्यांच्या लुटणा-यांच्या हातांतून सोडविलें. १७ तथापि त्यांनीं आपल्या न्यायाधिशांचेंहि ऐकलें नाहीं, तर अन्य देवांच्या मागें लागून व्यभिचार केला म्हणजे त्यांचें भजन केलें, त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा ऐकून ज्या मार्गांत चालले होते त्यांतून ते लवकर वळले आणि त्यांनीं तसें केलें नाहीं. १८ आणि परमेश्वर त्यांसाठी न्यायाधीश उत्पन्न करी तेव्हां परमेश्वर न्यायाधिशसंगतीं असे, आणि न्यायाधिशाच्या सर्व दिवसांत त्यांस त्यांच्या शत्रूंच्या हातांतून तारी, कां कीं, त्यांचे जांचणारे व गांजणारे यामुळें जीं त्यांचीं कण्हणीं त्यावरून परमेश्वराला दया येई. १९ आणि असें झालें कीं न्यायाधीश मेल्यावर ते फिरत, आणि आपल्या पूर्वजांपेक्षां दुष्ट होऊन दुस-
 
 देवांच्या मागें लागून त्यांची सेवा व त्यांचें भजन करीत, ते आपली कर्में आणि आपला हट्टाचा मार्ग सोडीनात. २० मग परमेश्वराचा क्रोध इस्त्राएलांवर तापला, आणि तो म्हणाला, या लोकांनीं माझा करार जो म्यां यांच्या पूर्वजांशीं नेमून दिला याचें उल्लंघन केलें, आणि माझी आज्ञा मानली नाहीं, २१ त्यावरून मीहि जीं राष्ट्रें यहोशवानें मरतांना ठेवलीं त्यांतला एक देखील त्यांच्या पुढून वतनांतून घालविणार नाही, २२ यासाठीं कीं त्यांच्या योगें आपण इस्त्राएलाची परीक्षा घ्यावी कीं, जसे त्यांच्या पूर्वजांनीं परमेश्वराचे मार्ग पाळले तसे ते त्यांत चालून पाळतील किंवा नाहींत. २३ तर परमेश्वरानें त्या राष्ट्रांस असूं दिलें, त्यांस वतनांतून लवकर घालविलें नाहीं, आणि त्यांस यहोशवाच्या हातीं दिलें नव्हतें.'' (न्यायाधीश, अ.२)

''इस्त्राएलांत ज्यांनीं खनानांतल्या अवघ्या लढाया जाणल्या नव्हत्या, म्हणजे ज्यांनीं पूर्वीं त्या अगदीं जाणल्या नव्हत्या, २ त्या सर्वांस लढाई शिकवायाला इस्त्राएलाच्या संतानांतल्या पिढ्यांनीं समजावें यासाठीं त्यांची परीक्षा ज्यांकडून घ्यावी अशीं जीं राष्ट्रें परमेश्वरानें ठेवलीं तीं हीं; ३ पलिष्ट्यांचे पांच सुभेदार आणि जे खनानी व सीदोनी व हिव्वी बालहर्मोन डोंगरापासून हमाथाच्या वाटेपर्यंत लबानाने डोंगरावर राहतात ते सर्व. ४ ते यासाठीं होते कीं त्यांच्या योगें इस्त्राएलाची परीक्षा व्हावी, म्हणजे ज्या आज्ञा परमेश्वरानें मोश्याच्या योगें त्यांच्या पूर्वजांस दिल्या त्या ते ऐकतील किंवा नाहींत हें कळावें म्हणून. ५ तर खनानी, हित्ती व अमोरी व परिजी व हिव्वी व यबूसी यांमध्यें इस्त्राएलाचे वंश राहिले. ६ आणि त्यांनीं त्यांच्या कन्या आपणांस बायका करून घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांस दिल्या, आणि त्यांच्या देवांची सेवा केली. ७ असें इस्त्राएलाच्या वंशांनीं परमेश्वराच्या दृष्टीनें वाईट केलें; आपला देव परमेश्वर याला विसरून बाल व अशेरोथ यांची सेवा केली.'' (न्यायाधीश अ.३)

स्तोत्रसंहिता म्हणून जें मोठें पुस्तक जुन्या करारांत आहे त्याचें सुंदर राष्ट्रीय वाङ्मय म्हणून महत्त्व मोठे आहे. त्यांतील अनेक स्तोत्रें प्रासंगिक असल्यामुळें अधिकच मनोरम वाटतात.

''राष्ट्रांनीं बंडाळी कां मांडली आहे? लोक व्यर्थ योजना कां करतात ? २ परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरूद्ध पृथ्वीवरील राजे उभे राहतात आणि अधिकारी एकत्र होऊन मसलत करतात - ३ 'चला, आपण त्यांचीं बंधनें तोडूं, आपणांपासून त्यांच्या दो-या टाकूं' ४ आकाशांत जो सिंहासनारूढ आहे तो हंसतो, प्रभु त्यांचा उपहास करितां. ५ पुढें तो क्रोधयुक्त होऊन त्यांशीं बोलेल, तो संतप्त होऊन त्यांस भयभीत करील. ६ (ती म्हणेल) 'तरी मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अभिषेक करून नेमिला आहे'. ७ मी ठराव कळवितोः परमेश्वर मला म्हणाला, 'तूं माझा पुत्र आहेस, आज मीं तुला जन्म दिला आहे. ८ माझ्याजवळ माग म्हणजे राष्ट्रें तुझें वतन अशीं तुला देईन, पृथ्वीच्या सीमा तुझी मालमत्ता अशा करून देईन ९ लोहदंडानें तूं त्यांस फोडशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. १० तर आतां राजांनो, शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधिशांनो, बोध घ्या. ११ भय धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. १२ तो रागावूं नये आणि तुम्ही मार्गांत नाश पावूं नये म्हणून पुत्राचें चुंबन घ्या; नाहींतर त्याचा क्रोध थोडक्यांत पेटेल. त्याचा आश्रय करण्या-यांची केवढी धन्यता !'' (स्तोत्रसंहिता अ.२)

[गवयांच्या पुढा-यासाठीं तंतुवाद्याच्या साथीनें गावयाचें दावीदाचें स्तोत्र]

''मी तुला हांक मारीन तेव्हां माझ्या न्याय करणा-या देवा, माझें एक. ज्या तूं मला पेचांतून मुक्त केलें, तो तूं मजवर कृपा कर व माझी प्रार्थना ऐक. २ अहो जनहो, माझें गौरव अपमान कोठवर असें राहील ? तुम्हांला पोकळ गोष्टी आवडणार काय? तुम्ही लबाडीला अनुसरणार काय? [सेला]  ३ परमेश्वरानें तर आपणासाठीं भक्तिमान निवडला आहे हें तुम्ही जाणा. मी परमेश्वराला हांक मारीन तेव्हां तो ऐकेल. ४ धाक धरा, पाप करूं नका. आपल्या अंथरूणावर आपणाशीं संभाषण करा, मौन धरा [सेला] ५ नीतिरूप यज्ञ करा आणि परमेश्वरावर भरंवसा ठेवा. ६ आम्हांस चांगल्याचा अनुभव कोण घेऊं देईल असें म्हणणारे पुष्कळ आहेत, हे परमेश्वरा, तूं आपलें मुखतेज आम्हांवर पाड. ७ त्यांचें धान्य व द्राक्षारस विपुल झालीं तेव्हांच्या त्यांच्या आनंदापेक्षां माझ्या मनांत तूं अधिक आनंद उत्पन्न केला आहे. ८ मी स्वस्थपणें अंग टाकून लागलाच गाढ झोंपीं जातो, कारण तूं मला अगदीं एकांतात निर्भय ठेवितोस.'' [स्तोत्रसंहिता अ. ४].

''बाबेलेच्या नद्यांजवळ आम्ही बसलों असतां, तेथें सियोनेची आठवण होऊन रडलों. २ तेथील वाळूजांवर आम्हीं आपल्या वीणा टांगून ठेविल्या; ३ कारण तेथें आमचा पाडाव करणा-यांनीं आम्हांस गाणीं गाण्यास सांगितलीं होतीं, आम्हांस लुटणा-यांनी मौज करण्यास सांगितली होती. ते म्हणाले आम्हांसाठीं सीयोनेंतलें एक गाणें गा. ४ आम्हीं परक्या स्थळीं परमेश्वराचें गाणें कसें गावें ? ५ हे येरूशलेमे जर मी तुला विसरलों तर माझा उजवा हात आपली क्रिया विसरो. ६ जर मीं तुझी आठवण ठेविली नाहीं, जर मीं यरूशलेमला माझ्या आनंदाच्या शिखरावर चढविलें नाहीं, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. ७ तिचा पाया तळापर्यंत उघडा करा, उघडा करा, असें म्हणणा-या अदोमी लोकांला उद्देशून हे परमेश्वरा, यरूशलेमच्या दिवसाची आठवण ठेव. ८ अगे ओसाड होणारे बाबेलेच्या कन्ये, तूं आम्हांशीं केलेल्या कृत्यांची जो फेड करील, त्याची केवढी धन्यता ! ९ जो तुझीं बाळकें धरून खडकावर आपटून त्यांचा चुराडा करील, त्याची केवढी धन्यता !'' (स्तोत्रसंहिता अ. १३७).

हिब्रूंच्या प्राचीन वाङ्‌मयामध्यें स्तोत्रसंहितेंत सुंदर भाग होत तरी नीतिसूत्रांचे अस्तित्व ही एक गोष्ट विशेष आहे. ती सूत्रें वाचतांना थोर चिनी तत्त्ववेत्त्यांची आठवण होते. मासल्याकरितां त्यांतील कांहीं उतारे येथें देतों.

''खोट्या तागडाचा परमेश्वराला वीट हो, खरें वजन त्याला प्रिय आहे. २ गर्व आला कीं अप्रतिष्ठ आलीच, नम्रांच्या ठायीं ज्ञान असतें. ३ सरळांचा सांत्विकपणा त्याला संभळून नेतो, कपट्यांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो. ४ क्रोधाच्या दिवशी धन उपयोगीं पडत नाहीं. धार्मिकता मरणापासून सोडविते. ५ सात्विकांची धार्मिकता त्यांचा मार्ग नीट करते, दुर्जन आपल्या दुष्टतेनें पतन पावेल. ६ सरळांची धार्मिकता त्यांला सोडवील, कपटां आपल्या कामनेनें पाशांत सांपडतील. ७ दुर्जन मेला म्हणजे त्याची आशा नष्ट होते, बळकटांची अपेक्षा नाहींशी होते. ८ धार्मिक संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागा दुर्जन येतो. ९ अधार्मिक आपल्या तोंडानें आपल्या शेजा-याचा नाश करतो, धार्मिक आपल्या ज्ञानानें मुक्त होतो. १० धार्मिकाचे कुशल असतें. तेव्हां नगर उल्लासतें, दुर्जन नाश पावतात तेव्हां उत्साह होतो. ११ सरळांच्या आशीर्वादानें नगराची उन्नति होते, दुर्जनांच्या मुखानें त्याचा विध्वंस होतो. १२ जो आपल्या शेजा-याला तुच्छ मानितो तो बुद्धिशून्य आहे, सुज्ञ मनुष्य तर उगाच राहतो. १३ बाता मारीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, आत्म्यानें जो विश्वासू तो गोष्ट गुप्त ठेवितो, १४ शाहणा पुढारी नसल्यामुळें लोक पतन पावतात, सुमंत्रा बहुत असले म्हणजे कल्याण होतें. १५ कोणी परक्याला जामीन झाला तर तो हानि पावेल, हातावर हात देणें ज्याला नावडतें आहे तो निर्भय राहतो. १६ कृपाळु स्त्री सन्मान संपादन करते. बलात्कारी धन संपादन करतात. १७ दयाळु मनुष्य आपल्या जिवाचें हित करतो, निर्दय तर आपल्या देहावर संकट आणितो. १८ दुर्जन जें कर्मफल मिळवितो तें असत्य असतें, जो नीति पेरितो त्याचें फळ सत्य असतें. १९ जो नीतीनें स्थिर त्याला जीवन प्राप्त होतें, जो दुष्कर्मामागें लागतो तो आपणावर मृत्यु आणतो २० जे मनानें कुटिल त्यांचा परमेश्वराला वीट आहे, सात्विक मार्गाचे त्याचा आनंद आहेत. २१ दुर्जन शिक्षेवांचून असणार नाहीं याविषयीं मी हातावर हात देतों, धार्मिकांचा वंश तरेल. २२ डुकर आणि त्याच्या नाकांत सोन्याची नथ, सुंदर स्त्री आणि तिच्या अंगीं तारतम्य हीनता हीं एकच. २३ धार्मिकांची इच्छा शुभच असते, दुर्जनांची आशा आढ्यतेची असते. २४ पेरतो आणि द्रव्य वाढवितो असा एक आहे, आपणाला योग्य अशा उपभोगांतहि काटकसर करतो असा एक आहे, तरी परिणाम दरिद्रच. २५ उपकारी मनाचा पुष्ट होतो, जो पाजता त्याला पाजतात. २६ जो धान्य अडकवून ठेवितो त्याला शाप देतात, जो धान्य विकतो त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात पडतो. २७ जो हित पाहण्यास झटतो तो आवडत्या गोंष्टीचा शोध करतो, जो अहित पाहतो त्याला तेंच प्राप्त होईल. २८ जो आपल्या धनावर भरंवसा ठेवितो तो पडेल, धार्मिक नव्या पालवीप्रमाणें प्रफुल्लित होईल. २९ जो घरच्यांस दुःख देतो त्याला वारा हेंच वतन मिळेल, मूर्ख शाहण्या मनाच्या मनुष्याचा चाकर होईल. ३० धार्मिकाचें फळ जीवनाचें झाड आहे, ज्ञानी आत्म्यांस वश करतो. ३१ पहा, धार्मिकाला पृथ्वीवर कर्मफल मिळत, तर दुर्जनाला व पातक्याला विशेषकरून मिळेल.'' (नीतिसूत्रे अ. ११)

''राजाचें मन पाटाच्या पाण्याप्रमाणें परमेश्वराच्या हातीं आहे. त्याला वाटेल तिकडे तो तें वळवितो. २ मनुष्याचें सर्व मार्ग त्याच्या दृष्टीनें नीट आहेत, अंतःकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. ३ धर्मानें व न्यायानें वागणे, हें परमेश्वराला यज्ञापेक्षां मान्य आहे. ४ चढेल दृष्टि, व फुगीर अंतःकरण असा जो दुर्जनांच्या शेताचा उपज तो पाप आहे. ५ उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात, व जो काणी उतावळी करतो तो दारिद्रयकडे धाव घेतो. ६ लबाड जिभनें मिळविलेलें धन उडून जाणारी वाफ आहे. ते मिळविणारे मृत्यूला आंमत्रण करतात. ७ दुर्जनांचा बलात्कार त्यांस उडवून टाकील, कारण त्यांनीं न्यायानें वागण्याचें नाकारलें आहे. ८ अपराधग्रस्तांचा मार्ग फार कुटिल असतो, जो शुद्ध त्याचें वर्तन सरळ असतें. ९ भांडखोर बायकोबरोबर घरांत एकत्र राहण्यापेक्षां, धाब्याच्या एका कोप-याला बसणें पुरवलें. १० दुर्जनाचें मन वाईट इच्छितें, शेजा-यावर तो कृपादृष्टि करीत नाहीं. ११ उपमर्द करणा-यास शासन कर म्हणजे भोळा शाहणा होतो, सुज्ञांस शिक्षण दिलें म्हणजे तो ज्ञान पावतो. १२ न्यायी (परमेश्वर) दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो, तो दुर्जनाला विपत्तींत पाडतो. १३ गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटें घालितो, तोहि आरोळी करील पण कोणी ऐकणार नाहीं. १४ एकांतीं दिलेली देणगी राग शमविते, पदरांत झांकलेलीं लांच तीव्र कोप शमविते. १५ न्यायानें वागणें हा धार्मिकाचा आनंद आहे. अधर्म करणा-यास हें नाश असें वाटतें. १६ ज्ञानपथापासून जो बहकतो, त्याला विश्रांति म्हटली तर मेलेल्यांच्या मंडळींत मिळेल.'' (नीतिसूत्रे अ. २१).

''हींहि शलोमोनाचीं नीतिसूत्रें आहेत, यहूदाचा राजा हिज्किया याच्या मनुष्यांनीं यांचा संग्रह केला. २ कोणतीहि गोष्ट गूढ ठेवणें यांत देवाचें गौरव आहे, एखाद्या गोष्टीचा शोध लावणें यांत राजांचें गोरव आहे. ३ उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळें पृथ्वीचा व राजांच्या मनाचा थांग लागत नाहीं. ४ रूप्याचा गाळ काढून टाक, म्हणजे त्याचें सोनारासाठीं चांगले पात्र निघतें. ५ राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचें सिंहासन धर्मांत स्थापित होईल. ६ राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवूं नको, थोर लोकांच्या जागीं उभा राहूं नको. ७ कोणा सरदारास येतां पाहून त्या समोरून तुला खालच्या जागीं घालविणें, यापेक्षां वर येऊन बैस, असें तुला म्हणावें हें बरें. ८ फिर्यादीस गाण्याची उतावळी करूं नको, केलीस आणि तुझ्या शेजा-यांनीं तुझी फजिती केली तर परिणामीं काय करावें असें तुला होईल. ९ तुझा व तुझ्या शेजा-याचा वाद असला तर तो चालीव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडूं नको. १० फोडल्या तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील. ११ रूपेरी करंडींत सोनेरी फळें, तसें सममोचित भाषण आहे. १२ सोन्याचे कर्णभूषण आहणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना. तसे सुज्ञ उपदेश व लक्ष देणारा मान हे आहेत. १३ कापणीच्या समयी जसें बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद आपणास पाठविणा-याला आहे, तो आपल्या धन्याचा जीव गार करतो. १४ मेघ व वारा असून वृष्टि नाहीं, या प्रमाणें कपटी देणग्यांची आढ्यता मिरविणारा आहे. १५ धीर धरल्यानें न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते. १६ तुला मध सांपडल्यास पोटापुरता खा, जास्त खाल्लास तर तुला वांति होईल. १७ शेजा-याच्या घरीं आपले पाऊल कधींमधीं घाल, नाही तर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील. १८ जो शेजा-याविरुद्ध खोटी साक्ष देतो, तो घण, तलवार, व तीक्ष्ण बाण असा आहे. १९ संकटसमयीं विश्वासघातक्यावर भरंवसा ठेवणें, हें तुटलेल्या दांताने खाणें, लचकलेल्या पायानें चालणें असे आहे. २० थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणें, सज्जीखारावर शिरका घालणें आणि खिन्न हृदयापुढें गायन करणे ही सारखीं आहेत. २१ तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला खायाला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी पिण्यास दे. २२ असें केल्यानें त्याच्या मस्तकावर निखा-यांची रास घातल्यासारखे त्याला होईल आणि परमेश्वर तुला प्रतिफल देईल. २३ उतरण वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधिष्ट करते. २४ भांडखोर बायकोबरोबर घरांत एकत्र राहण्यापेक्षां धाव्याच्या एका कोप-याला बसणें पुरवलें. २५ तान्हेल्या जीवाला गार पाणी, तसेंच दूर देशाहून आलेलें चांगलें वर्तमान आहे. २६ दुर्जनापुढें स्थानभ्रष्ट झालेला धार्मिक हा गढूळ केलेला घरा, बिघडलेलें जलकुंड यांप्रमाणें आहे. २७ मधाचें अतिसेवन करणें बरें नाहीं; कठिण गोष्टींचा शोध करण्यांत गौरव आहे. २८ ज्या मनुष्याचा आत्मा स्वाधीन नाहीं, तो गांवकुसूं नसलेल्या पडित गांवासारखा आहे.'' (नीतिसूत्रें अ. २५ वा).
 
''मस्सा लोकांचा राजा लमूएल याचीं त्याला आईनें शिकविलेलीं वचनें. २ माझ्या मुला, मी काय सांगूं ? माझ्या पोटच्या लेंकरा मी काय सांगूं ? माझ्या नवसाच्या लेंकरा, मी काय सांगूं? ३ तूं आपलें वीर्य स्त्रियांस देऊं नको, राजांचा नाश करणा-या अशांस आपल्या राजकारभारांत वश होऊं नको. ४ हे लमूएला, द्राक्षारस पिणें राजांस शोभत नाही, राजांस नाहीं शोभत. मद्य कोठें असें विचारणें सरदारांस शोभत नाहीं. ५ ते प्याले तर नियमशास्त्र विसरून पीडिलेल्यांचा न्याय विपरीत करतील. ६ मरणाच्या लागास आलेल्यांस मद्य दे. खिन्न मनाच्यांस द्राक्षारस दे. ७ त्यानें पिऊन आपलें दारिद्र विसरावें, त्याच्या हालाचें त्याला विस्मरण व्हावें. ८ मुक्यासाठीं नष्टप्राय झालेल्यांस न्याय मिळण्यासाठीं, आपले मुख उघड. ९ आपलें मुख उघड, धर्मानें न्याय कर, गरीब व गरजवंत यांस न्याय मिळूं दे. १० सदगुणी स्त्री कोणला प्राप्त होते? मोत्यांहून तिचें मोल फार आहे. ११ तिच्या पतीचें मन तिजवर भरंवसा ठेवितें, त्याला संपत्तीचा तोटा पडत नाहीं, १२ ती आमरण त्याचें हित करिते, अहित करीत नाहीं. १३ ती लोंकर व ताग खटपटीनें मिळविते आणि आपल्या आनंदित हातांनीं काम करिते. १४ ती व्यापारी गलबतासारखी आहे, ती आपली अन्नसामुग्री दुरून आणिते. १५ रात्र सरली नाहीं तोंच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करिते व आपल्या दासींस त्यांच्या अन्नाचा वांटा देते. १६ शेताची चवकशी करून तें ती विकत घेते, ती आपल्या हातच्या कमाईनें द्राक्षमाळा लाविते. १७ ती बलरूप पट्ट्यानें आपली कंबर बांधते. ती आपले बाहु नेटानें कामास लाविते. १८ आपला उद्योग फायदेशीर आहे हें तिला कळतें; तिचा दीप रात्रीस मालवत नाहीं. १९ ती चाती आपल्या हातीं घेते, ती हातांनीं चरकी धरते. २० ती गरीबांसाठीं मूठ उघडते, गरजवंतास हात देते. २१ आपल्या कुटुंबाविषयीं तिला बर्फाचें भय वाटत नाहीं, कारण तिचें सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेलें असतें. २२ ती आपणासाठीं वेटबुटीदार पलंगपोस करिते, तिचें वस्त्र सूक्ष्म तागाचें व जांभळें आहे. २३ तिचा पति वेशींत देशाच्या वडील मंडळींत बसला असतां तेव्हांस लक्षांत येतो. २४ ती तागाचीं वस्त्रें करून ती विकते, व्यापा-यांस कमरबंध विकत देते. २५ बल व प्रताप हींच तिचीं वस्त्रें आहेत, ती पुढील काळाविषयीं निश्चित राहते. २६ तिच्या तोंडांतून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेंत दयेचें शिक्षण असतें. २७ ती आपल्या कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देते; ती आळसाचें अन्न खात नाहीं. २८ तिचीं लेंकरें उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराहि उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, २९ बहुत स्त्रियांनीं सदगुण दाखविले आहेत, तूं तर त्या सर्वांत वरचढ आहेस, ३० सौंदर्य, कपट व सुरूपता व्यर्थ आहे, परमेश्वराचें सद्भय बाळगणा-या स्त्रीची प्रशंसा होते. ३१ तिच्या हातचें श्रमफल तिला असो, तिचीं कृत्यें भर वेशींत तिचीं प्रशंसा करोत.'' (नीतिसूत्रें अ.३१)

या यहुदी लोकांच्या वाङ्मयांत सुंदर स्थलें अनेक आहेत. त्यांपैकीं कांहींचे तरी येथें अवतरण केलें पाहिजे येथें थोडेसे उतारे घेतों त्यांवरून वाङ्मयाची आवेशयुक्तता व नीतीकल्पना याची कांहीं तरी माहिती होईल.

शलोमोनानें रचलेलें गतिरत्न.

''२ तो मला मुखचुंबन देवो. तुझें प्रेम द्राक्षारसाहून मधुर आहे. ३ तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो; तुझें नांव सिंचन केलेलें सुगंधी अत्तरच होय; म्हणूनच कुमारी तुजवर प्रेम करितात. ४ माझ्या चित्ताचें आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्यामागून धांवत येऊं: राजानें मला अंतःपुरीं आणिलें आहे. आम्ही तुझ्याठायीं आनंदोत्सव करूं; तुझें प्रेम द्राक्षारसाहून अधिक वर्णूं. त्या एकानष्ठपणें तुजवर प्रीति करीत आहेत.''
 
''५ यरुशलेमनिवासी कन्यांनो, मी काळीसांवळी पण सुरूप आहे; केदराच्या डे-यासारखी, शलोमोनाच्या पडद्यासारखी मी काळी आहें. ६ मी काळीसांवळीं आहें हें मनांत आणूं नका, कारण मी उन्हानें होरपळलें आहें. माझे सहोदर बंधू मजवर संतप्त झाले; त्यांनीं मला द्राक्षमळ्याची राखण करावयास ठेविलें; पण माझ्या मळ्याची निगा मीं ठेविली नाहीं. ७ माझ्या प्राणसख्या, मला सांग तूं आपला कळप कोठें चारितोस? दुपारीं त्यास कोठें बसवितोस ? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मीं कां भ्रमत रहावें?

''८ हे परमसुंदर स्त्रिये, तुला हे ठाऊक नसेल तर तूं त्या शेरडांमेंढरांच्या पावलांच्या मागोमाग जा; मेषपालांच्या मागोमाग जा; मेषपालांच्या राहुट्यांपाशीं आपली करडें चारीत रहा.

''९ माझ्या सखे, मी तुला फारोच्या रथाच्या अश्विनीसारिखी लेखितों. १० गोफांनीं तुझे गाल व रत्नहारांनीं तुझा कंठ सुरेख दिसत आहे. ११ आम्ही तुजसाठीं चांदीच्या टिका लाविलेले सोन्याचे गोफ करूं.'' (अध्याय १).

''३ वनवृक्षांमध्यें जसा सेवीवृक्ष तसा तरूणामध्यें माझा वल्लभ. त्याच्या छायेंत बसून मला आनंद झाला; त्याचें फळ मला स्वादिष्ट लागलें. ४ त्यानें मला आपल्या पानगृहांत आणिलें; त्यानें मजवर प्रेमध्वजा फडकाविली. ५ मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम करा; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊं द्या. मी प्रेमज्वरानें पीडित झालें आहें. ६ त्याचा डावा हात माझ्या डोईखालीं आहे; त्याचा हात मला अलिंगीत आहे.

७ यरुशलेमच्या कन्यांनों, तुम्हांस वनांतील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगतें, माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय विघ्न आणूं नका; तो हवा तितका वेळ राहूं द्या. किंवा'' (अ.२).

''रात्री मी शय्येवर पडलें असतां माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली; मी त्याला चोहोंकडे पाहिलें; पण तो मला दिसला नाहीं. २ माझ्या मनांत आलें कीं, आतां उठून शहरभर फिरावें. माझ्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून व गल्ल्यांतून करावा, मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाहीं. ३ शहरांत गस्त घालणारे जागले मला भेटले; मी त्यांस विचारलें. माझा प्राणप्रिय तुम्हांस कोठें दिसला काय ? ४ त्यांस सोडून मी अंमळ पुढें जातें तों माझा प्राणप्रिय मला भेटला. मीं त्याला धरून ठेविलें; मीं त्याला माझ्या मातृगृहीं, माझ्या जननीच्या कोठडींत आणीपर्यंत सोडिलें नाहीं.

''५ यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांस वनांतील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगतें कीं, माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणूं नका, विघ्न आणूं नका, तो हवा तितका वेळ राहूं द्या.

६ गंधरस व ऊद, सौदागरांकडील एकंदर सुवासिक द्रव्यें यांच्या सुगंधानें युक्त असें धुराच्या स्तंभासारखें रानांतून हें येत आहे तें काय ? ७ पाहा, ती शलोमोनाची पालखी येत आहे; तिच्याबरोबर साठ वीरपुरूष चालत आहेत; ते इस्त्राएलांच्या वीरपुरूषांपैकीं आहेत. ८ ते सगळे खड्गधारी व युद्धकुशल आहेत; रात्रीच्या समयीं प्राप्त होणा-या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेस तलवार लटकलेली आहे. ९ शलोमोन राजानें आपणासाठीं लबानोनी लांकडाची एक पालखी करविली आहे. १० तिचे दांडे रूप्याचे आहेत, तिची पाठ सोन्याची आहे; तिची गादी जांभळ्या रंगाची आहे. तिचा अंतर्भाग यरूशलेमेच्या कन्यांच्या प्रमानें विभूषित केला आहे. ११ सीयोननिवासी कन्यांनो, बाहेर या, शलोमोन राजास पहा. त्याच्या विवाहदिनीं, त्याच्या मनास उल्लास झाला त्या दिवशीं त्याच्या मातेनें त्यास घातलेल्या मुकुटानें मंडित झालेला असा हा पहा'' (अ.३).

''हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेंत आलों आहें; मी आपला गंधरस व सुगंधीं द्रव्ये लुटिलीं आहेत. मी आपलें मधूनें थबथबलेलें पोळें खाल्लें आहे. मी दुग्ध व द्राक्षारस ही सेविलीं आहेत, मित्रहो, खा, प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.

२ मी निद्रिस्थ आहे. तरी माझें मन जागृत आहे. ऐका ! माझा वल्लभ दार ठोकति आहे ! त्याचा शब्द माझ्या कानीं पडत आहे. तो म्हणतोः ''माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, मला दार उघड. माझें डोकें दंवानें थबथबलें आहे; माझीं झुलपें रात्रीच्या दहिंवरबिंदूंनीं भरून गेलीं आहेत. ३ मीं पेहराव उतरला आहे, तो पुन्हां कसा घेऊं? मीं पाय धुतले आहेत ते पुन्हां कसें मळवूं ? ४ माझ्या वल्लभानें झरोक्यांतून आपला हात आंत घातला, तेव्हां माझें हृदय त्याच्यासाठीं कळवळलें. ५ माझ्या वल्लभास दार उघडण्यासाठीं मी उठलें तेव्हां अर्गळीच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातांस लागला, माझ्या बोटांवरून त्याचा द्रव थिबकला. ६ मीं माझ्या वल्लभासाठीं दार उघडिलें, आणि पाहतें तों तो निघून गेला होता. तो बोलत होता तेव्हां माझा जीव ठिकाणावर नव्हता; मीं त्याचा शोध केला पण तो सापडला नाहीं, मीं त्याला हाका मारिल्या पण त्यानें ओ दिली नाहीं. ७ नगरांत फिरणारे जागले मला भेटले; त्यांनीं मला मार देऊन घायाळ केलें; तटाच्या रखवालदारांनीं माझ्या दुशालू हिसकावून घेतला. ८ यरुशलेमेच्या कन्यांनों, मी तुम्हांस शपथ घालून विनंति करतें कीं, माझा वल्लभ तुम्हांस आढळला तर त्याला सांगा मला प्रेमज्वर लागला आहे.

''९ स्त्रियांतल्या परम सुंदरी, तुझ्या वल्लभांत इतरांहून अधिक तें काय आहे? तूं आम्हांस शपथ घालितेस ते तुझ्या वल्लभांत इतरांहून अधिक तें काय आहे ?

१० माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे. तो लाखांत मोहरा आहे. ११ त्याचें शिर बावनकशी सोन्यासारखें आहे. त्यांची झुलपें कुरळ व डोमकावळ्यासारखीं काळीं कुळकुळीत आहेत. १२ त्याचे डोळे ओढ्यांच्या कांठांवरील होल्यांसारखे आहेत; ते दुधांत डुंबत असून नीट जडलेले आहेत. १३ त्याचे गाल सुगंधोत्पादक वनस्पतीचे ताटवे आहेत; त्याचे ओठ कमलाप्रमाणें असून त्यांतून गंधरस स्त्रवतो. १४ त्याचे हात पुष्परागानें खचलेल्या सुवर्णनलिकाच होत; त्याचें पोट नीलमणि जडलेल्या हस्तिदंतफलकासारखें आहे. १५ त्याचे पाय सुवर्णाच्या कोंदणांत बसविलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत. त्याचा बांधा लबानोनासारखा आहे; तो गंधसरूसारखा उमदा आहे. १६ त्याची वाणी मधुर आहे. तो सर्वपरी मनोहर आहे. यरूशलेमेच्या कन्यांनो, असा माझा वल्लभ, माझा सखा आह'' ! [गीतरत्न, अ. ५].

यहुद्यांच्या प्राचीन वाङ्मयाच्या स्वरूपावलोकनाची पूर्णता त्यांच्यावर परसत्तेचा प्रसंग आला असतां जी विलापगीतें रचली गेलीं त्यांचा मासला दिल्याशिवाय होणार नाहीम म्हणून विलापपंचकांतील कांहीं भाग येथें देतों.

''हाय हाय, भरवस्तीची नगरी ती कशी एकाकी बसली आहे, राष्ट्रांमध्यें जी राणी, ती कारभार देणारी कशी झाली आहे? ती रूदन करते, तिच्या गालांवर अश्रू वहात आहेत, तिच्या वल्लभांपैकीं तिचें सांत्वन करणारा कोणी नाहीं. तिच्या सर्व मित्रांनीं तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत. यहूदा जुलुमानें व भारी दास्यानें पाडावांत गेली आहे; ती राष्ट्रामध्यें बसली आहे, तिला चैन नाहीं, तिचा पाठलाग करणारांनीं तिला संकटावस्थेंत गाठिलें. पर्वणीस जाणारे कोणी नाहींत म्हणून सियोनोचे मार्ग शोक करीत आहे; तिच्या वेशीं उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकील आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत व ती स्वतःकष्टी आहे. तिच्या शत्रूंस वर्चस्व मिळालें आहे, तिचा द्वेष करणारे चैनींत आहेत ; कारण तिच्या बहुत अपराधांमुळें परमेश्वरानें तिला पीडा लावली आहे. वै-यापुढें तिची लेंकरें पाडावांत गेलीं आहेत. सीयोनकन्येचें तेज सर्व गेलें आहे; तिचे सरदार चारा नसलेल्या हरणीसारखे झाले आहेत. ते पाठलाग करणारापुढें निर्बल होऊन पळाले आहेत. यरूशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या प्राचीन काळापासून असलेल्या रम्य वस्तूंचे स्मरण करते. जुलूम करणा-याच्या हातीं तिचे लोक लागले तेव्हां तिला कोणी साहाय्य नव्हता, हें तिच्या शत्रूंनीं पाहिलें, ती निर्व्यापार झाली म्हणून त्यांनीं तिची थट्टा मांडली, यरूशलेमनें अघोर पातळ केलें आहे म्हणून ती किळसवाणी झाली आहे. जे तिचा आदर करीत ते तिला तुच्छ मानीत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे. ती उसासे टाकते, ती पाठमोरी झाली आहे.'' (पहिलें विलापगीत १-८).

प्रवक्त्यांचें वाङ्मय आवेशपूर्ण असून प्राचीन यहूदी वाङ्मयांतील तो एक अत्यंत सुंदर भाग आहे. यांत इस्त्राएल लोकांत पापाचरण टाळण्यास उपदेश केला आहे, आणि खरा ईश्वर टाकून वाटेल त्या दैवताची पूजा करण्याबद्दल निषेध केला आहे. मधून मधून लोकांस धाक घालण्यासाठीं त्यांच्यावर अशीं अरिष्टें येतील म्हणून भविष्यें केलीं आहेत. प्रवक्त्यांच्या वाङ्मयांतील एकदोन उतारे येथें देतों.

''पहा परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे. तिला ओसाड करीत आहे. तिला विरूद्ध करीत आहे, व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे. तेव्हां जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनणीची विकत घेणाराची तशी विकत देणाराची, सावकाराची, तशी कुळाची, धनकोची तशी रिणकोची स्थिति होईल. पृथ्वी अगदीं रिकामी होईल, तिची लुटालूट होईल; कारण परमेश्वर हें वचन बोलला आहे. पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झालें आहे. पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत. पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनीं नियमांचें उल्लघन केलें आहे. विधीचे अतिक्रमण केलें आहे. व सनातन करार मोडला आहे. यास्तव पृथ्वी शापानें ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगीत आहेत; पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेस उरले आहेत. नवा द्राक्षारस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहे हर्षितमनाचे उसासा टाकीत आहेत. डफांचा हर्षनाद बंद पडला आहे, उत्सव करणान्यांचा कल्ला थांबला आहे, किनरीचा हर्षनाद बंद झाला आहे. ते गात गात द्राक्षारस पीत नाहींत, मद्यपींस मद्य कडू लागतें. व्यवस्थाभ्रष्ट नगर भंग पावलें आहे. प्रत्येक घर बंद पडलें आहे. कोणाचाहि आंत रिघाव होत नाहीं. बाहेर रस्त्यांत द्राक्षारसासाठीं ओरड चालली आहे, सर्व उत्सव मावळला आहे, पृथ्वीचा हर्ष लोपला आहे. नगरांत जी कांहीं उरली ती मोडतोड. वेशीचा चकनाचूर झाला आहे. जईत झाडें हालविल्यावर व द्राक्षांचा हंगाम आटोपल्यावर सर्वा वेंचतांनां जशी थोडीशीं फळें राहतात तसें पृथ्वीवरील राष्ट्रांचें होईल. ते उच्च स्वरानें गजर करितील, परमेराच्या प्रभावास्तव समुद्रांतून गजर करतील. यास्तव उगवतेकडल्या लोकांनीं, परमेश्वराचें गौरव करा, समुद्रतीरस्थहो, इस्त्राएलाचा देव परमेश्वर याच्या नांवाचें गौरव करा. (यशया, अ. २४).

पुन्हां परमेश्वराचें वचन मला आलें कीं, मानवपुत्रा यरूशेलेमेची अमंगळ कृत्यें तिच्या लक्षांत आणून दे. असें म्हण, प्रभू परमेश्वर यरूशलेमेस म्हणतो, तुझें मूळ व उत्पत्ति हीं कनान देशांतली आहेत. तुझा बाप अमोरी व तुझी आई हत्तीण होती. तुझ्या जन्माविषयीं म्हटलें तर तूं जन्मलीस तेव्हां तुझा नाळ कापला नाहीं, तुला पाण्यानें धुवून स्वच्छ केलें नाहीं तुझ्या अंगाला मीठ चोपडलें नाहीं. व तुला बांळंत्यांत गुडाळिलें नाहीं. तुझी करूणा येऊन यांतलें कोणतेंहि करावें अशी तुजवर कोणाचीच दयादृष्टी झाली नाहीं. तर तूं जन्मलीस तेव्हां तुला अमंगळ समजून शेतांत टाकून दिलें होतें. मी तुजजवळ जातांना तुला आपल्या रक्तांत लोळतांना पाहिलें, तेव्हां मी तुला म्हणलों, तूं आपल्या रक्तांत लोळत आहेस तरी जग; असेंच मी तुला म्हणलों. शेतांतलें बीज वाढून सहस्त्रपट होतें, तशी मी तुझी वृद्धी केली. तूं वाढून उंच झालीस तुला ऊर फुटला, तुझे केंस वाढले, तरी तूं उघडीनाघडी होतीस. मी तुजजवळून जातांना तुला पाहिलें तों ती वेळ तुझ्या प्रेमाविकासाची होती. तेव्हां मी तुजवर पार घालून तुझी नग्नता झांकली. प्रभु परमेश्वर म्हणतो, तेव्हां मी शपथ वाहून तुजशीं करार केला व तूं माझी झालीस. मीं तुला पाण्यानें न्हाणिलें, तुजवरचे रक्त धुवून काढिलें आणि तुला तेलानें माखलें तुला वेलबुट्टीचीं वस्त्रें लेवविलीं. उत्तम चामड्याचा जोडा तुझ्या पायीं चढविला तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचें वस्त्र गुंडाळिले. तुला रेशमी ओढणी पांघरविली. मीं तुला दागिन्यांनीं सजविली, तुझ्या हातांत बांगड्या घातल्या, व गळ्यांत गळसरी घातली. तुझ्या नाकांत नथ घातली. कानांत बाळ्या घातल्या तुझ्या डोईला उत्तम शिरोभूषण घातलें. तूं सोन्यारूप्यानें नटली होतीस तुझा पेहराव, ताग, रेशमी, व जरतारी यांचा होता. तुला भोजनास सपीठ, मथ व तेल ही असत. तूं अतिसुंदर होतीस. तुझ्या सौंदर्यामुळें तुझी कीर्ति सर्व राष्ट्रांत गेली. कारण ती तुला दिलेल्या तेजानें तुझें सौदर्य अप्रतिम झालें, असें प्रभू परमेश्वर म्हणता.

तूं जर आपल्या सौंदर्यावर भरंवसा ठेवून आपल्या कीर्तींच्या जोरावर शिंदळकी केली. आल्यागेल्याशीं शिंदळकीचा सपाटा उडविलास. तुझें सौदर्य त्यांस लुटावयास सांपडले, तूं आपली वस्त्रें घेऊन रंगी बेरंगी उंचस्थानें आपणासाठीं सजविली आणि कधीं झाली नाहीं व कधी पुन्हां व्हावयाची नाहीं अशीं शिंदळकी त्यांवर केली. मीं तुला दिलेल्या सोन्यारूप्याचे शोभिवंत दागिने घेऊन तूं त्याच्या पुरूषमूर्ती केल्या व त्यांशीं शिंदळकी केली तूं आपली वेलबुट्टीचीं वस्त्रें घेऊन त्यास लेवविली मी दिलेल्या तेलाचा व धुपाचा त्यांस नैवेद्य दाखविली. मी तुला दिलेली भाकर, सपीठ, तेल व मध हीं जी मी तुला चारीत असें, ती तूं त्यापुढें सुगंधासाठीं अर्पिलीं हें खरोखर घडलें. असें प्रभू परमेश्वर म्हणतो. मजपासून तुला पुत्रकन्या झालीं, तीं तूं घेऊन त्यांस बळी म्हणून अर्पिलीं. ह्या तुझ्या शिंदळक्या तुला पुरेशा झाल्या नाहींत. म्हणून तूं माझे पुत्र वधिले, त्या मूर्तीला खाद्य होण्यासाठीं तूं त्यांस अग्नींत होमिलें काय ? ही सर्व अमंगळ कृत्यें व शिंदळक्या करितांना तूं आपल्या लहानपणीं आपल्या रक्तांत लोळत होतीस याची तुला कधीं आठवण झाली नाहीं. तूं हीं इतकीं दुष्कर्में केल्यावर (प्रभु परमेश्वर म्हणतोः तुला धिःकार असो) असें झालें कीं, तूं आपणासाठीं कमानदार घर बांधिलें, रस्त्यारस्त्यांनीं तूं आपणासाठीं उंच स्थानें केलीं. तूं रस्त्यांच्या नाक्यावर आपलीं उंचस्थानें बांधिलीं, आपलें सौंदर्य भष्ट केलें, सर्व आल्यागेल्यांना आपले पाय पसरून मनस्वी शिंदळकी केलीस मोठ्या अंगाचे तुझे शेजारी मिसरी यांशी तूं शिंदळकी केलीस. तेव्हां मला चिडविण्यासाठीं तूं मनस्वी शिंदळकी केलीस. तेव्हां पाहा, मी आपला हात तुजवर उगारून तुझें नित्याचें उन्न कमीं केले आणि तुझा द्वेष करणा-या पलिष्ट्याच्या कन्यांला तुझें शिंदळकीचें वर्तन लज्जास्पद वाटतें, त्याच्या स्वाधीन तुला केलें. तुझी तृप्ति म्हणून कधीं होत नाहीं, या करितां तूं अश्शू-यांशींहि शिंदळकी केली. तरीहि तुझी तृप्ति होईना. प्रतिकनान असा जो खारद्यांचा देश तेथपर्यंत तूं मनस्वी शिंदळकी चालविली तरी त्यानेंहि तुझी तृप्ति होईना. प्रभू परमेश्वर म्हणतो, तूं स्वच्छंदी वेश्येच्या कृतीप्रमाणें हें सर्व केलें. तेव्हां तुझे मन किती दुर्बल आहे !

म्हणून अगे वेश्ये, परमेश्वराचें वचन ऐक. प्रभू परमेश्वर म्हणतो, तूं आपला पैका उधळला, आपल्या जारांशीं शिंदळकी करून आपली लाज दाखविली, तूं आपल्या मूर्तीशीं अमंगळ कृत्यें केली आणि आपल्या लेकरांचें रक्त त्यांस अर्पिलें म्हणून, पहा, ज्यांस तूं खुश केलें, प्रेमपात्र व द्वेषपात्र असे जे तुझे सर्व जार, त्यांस मी चोहोंकडून तुजविरुद्ध जमा करीन, त्यांपुढें तुझी लाज उघडी करीन म्हणजे ते तुझी सारी लाज पाहतील. जारिणी व रक्तपाती स्त्रिया यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करीन, आणि क्रोधानें व ईर्षेनें मी रक्तपात करीन. मी तुला त्यांच्या हातीं देईन, म्हणजे ते तुझीं कमानदार घरें उध्वस्त करितील, तुझीं उंच स्थानें पाडून टाकितील; तुझीं वस्त्रें हिरावून घेतील व तुझें उंची जवाहीर काढून घेऊन तुला नागवी उघडी करून सोडितील. ते तुजविरुद्ध मंडळी जमवून आणून तुला धोंडमार करितील व आपल्या तलवारीनीं तुझे तुकडे करतील ते तुझीं घरें अग्नीनें जाळतील आणि बहुत स्त्रियां देखत तुला शासन करितील ह्याप्रकारें तुझी शिंदळकी बंद करीन, आणि या पुढें तूं कोणास वेतन देणार नाहीस. तेव्हां तुजवरचा माझा संताप मी शांत करीन. (यहज्केल पृ.९६३ अ.१६.)