प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                    

कर्मस्मरणास मन्त्राची जरूरी.- मंत्र म्हणजे प्रयोगसमकालीन गोष्टीचें स्मरण करून देणारा वेदभाग होय. मन्त्रांचें उच्चारण अदृष्ट फल उत्पन्न होण्याकरिंता करावयाचें नसून केवळ स्मरणाकरितांच आहे. कारण, दृष्ट फल संभवत असतां अदृष्टाची कल्पना केव्हांहि करावयाची नाहीं. तथापि दृष्ट गोष्ट करण्यास मन्त्राचीच जरूरी आहे अशांतला बिलकुल भाग नाहीं असें ठरल्यास मन्त्रभाग निरर्थक ठरतो. तसें होणें इष्ट नसल्यामुळें या ठिकाणीं'मन्त्रानींच स्मरण केलें पाहिजे'या नियम विधीचा आश्रय करावा लागतो.