प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
आणखी एक प्रकार.- कांहीं ठिकाणीं यापेक्षां अगदीं वेगळा प्रकार असतो. तो प्रकार उदाहरणानेंच स्पष्ट करूं. ‘दीक्षितो न ददाति न जुहोति’ या वचनानें ‘दीक्षा घेतलेल्या माणसानें दान देऊं नये, होम करूं नये’ असें सांगितलें आहे. परंतु ‘दानहोम करावेत’ हेंहि शास्त्रानेंच सांगितलें आहे. येथें शास्त्रानें परस्परविरूद्ध विधान केलें म्हणून विकल्प होत नाहीं. कारण पुरुषार्थाकरितां दानहोम करण्यास सांगितलें आहे. आणि यज्ञाकरितां दानहोम करूं नका म्हणून सांगितलें आहे. येथें दोनहि विधानें एकविषयक नसल्यामुळे विकल्प होत नाहीं. तथापि एखादें दान वगैरे जरी दीक्षितानें केलें तरी तें दानहोमासारखें कर्म अनर्थहेतुक होत नाहीं. कारण तें कर्म आसक्तीमुळें होत नसून शास्त्रानें विहित म्हणून होत असतें. परंतु स्वस्त्रीगमनादि जीं कर्मे आसक्तीमुळें प्राप्त आहेत, आणि शास्त्रानें निषिद्ध आहेत, तीं केल्यास कतूस वैगुण्य प्राप्त होतें. यावरून आसक्तीमुळें शास्त्रनिषिद्ध कर्माचें अनुष्ठान केल्यास तें कर्म अनर्थहेतुक होय व निषेध हेहि पुरूषार्थसाधक आहेत हें सिद्ध झालें.