प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
अर्थवादवाक्यें.- आतां अर्थवादासंबंधीं विचार करूं, प्राशस्त्य किंवा निन्दा या दोहोंपैकीं एकाचें प्रतिपादन करणारें जें वाक्य त्यास अर्थवादवाक्य म्हणतात.
‘स्वाध्यायोऽध्येतव्य:’ या वाक्यानें सकल वेदांचें अर्थज्ञानाकरितां अध्ययन करावें असें सांगितलें आहे. त्यांतच अर्थवादवाक्येंहि येतात. त्यांचा अर्थ तर असंभाव्य असतो. परंतु तेवढयावरून तो वेदभाग निरर्थक आहे असें म्हणतां येत नाहीं. म्हणून विधेयभागाशीं स्तुतिरूपानें आणि त्याज्य भागाशीं निंदारूपानें अर्थवाद वाक्याला अर्थवत्व आहे असें सिद्ध होते. मूळ अर्थ स्तुतिनिन्दानुरूप अर्थ लक्षणेनें घ्यावा लागतो.